आपण मन लावून स्वयंपाक करतो. तो सगळा स्वयंपाक चविष्ट व्हावा यासाठी आपली धडपड असते. एकवेळ मसाले कमी, तिखटपणा कमी असला तरी चालतो पण मीठ कमी पडलं तर सारे पदार्थ बेचव लागतात. चिमटीभर मीठ काय कमाल करते ना! मीठ हा स्वयंपाकातला अगदी छोटा घटक. पण त्याशिवाय अन्नाची चवच हरवते.
भाजी, आमटी, चटण्या, लोणची या प्रत्येकात मिठाचे अस्तित्व सूक्ष्म असलं तरी निर्णायक असतं. मीठ चव वाढवतच नाहीतर ते चवीला दिशा देतं. आंबटपणा संतुलित करते, कडूपणा मवाळ करते आणि गोड पदार्थांना छान उठाव देते.
हो गोड पदार्थांमध्येदेखील चिमूटभर मीठ हवेच. समोर आलेला पदार्थ दिसायला रंगरूपाने सुंदरच दिसतो. पण घास घेताच काहीतरी कमी असल्याची जाणीव होते. मिठाच्या कमतरतेमुळे त्याची चव नाहीशी होते. कारण मीठ हे जिभेवरच्या स्वादग्रंथींना जागं करतं. म्हणूनच मिठाशिवाय स्वयंपाक बेचव वाटतो.
कारण त्यात केवळ चव नाही, तर परंपरा, अनुभव आणि भावनांचाही अभाव असतो. मीठ चवींचा ‘संवाद’ घडवून आणतं. जणू संगीतामध्ये ताल नसेल तर सूर असूनही रचना विस्कळीत वाटते. तसंच मीठ हे स्वयंपाकातला ताल सांभाळण्याचं काम करतं.
भारतीय संस्कृतीत मिठाला खूप वेगळे महत्त्व आहे. ते जीवनाचं प्रतीक आहे. ‘मिठाला जागणे’, ‘मी तुमचं मीठ खाल्लंय’ असे शब्दच निष्ठा आणि कृतज्ञतेचा अर्थ सांगून जातात. मिठाचं अस्तित्व, त्याचं महत्त्व फक्त चवीपुरतं मर्यादित नाही. भाजी शिजवताना घातलेलं मीठ भाजीतून पाणी सोडायला मदत करतं, डाळ लवकर शिजते, मांस-मासे मिठामुळे मऊ होतात.
लोणचं, पापड, सुकी मासळी यामध्ये मीठ पदार्थ टिकवून ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे मीठ हे स्वयंपाकातील तांत्रिक घटकही आहे. मिठातून शरीराला आवश्यक असलेले सोडिअम मिळतं, जे स्नायूंच्या हालचाली, रक्तदाब आणि मज्जासंस्थेसाठी महत्त्वाचे असते.
मात्र अति प्रमाणात मीठ खाल्ले तर आरोग्यास घातक ठरू शकते. म्हणूनच स्वयंपाकात मिठाचे महत्त्व योग्य प्रमाणात वापरण्यात आहे. कमीही नाही, जास्तही नाही. स्वयंपाकात मिठाचा योग्य अंदाज लागणं हे गृहिणीच्या कौशल्याचं लक्षण मानलं जातं. पण मिठाची ही महती जाणवायला वर्षाचा शेवटचा काळ उजाडला. कारण तशा घटनादेखील घडल्या.
वर्षभर चविष्ट पदार्थांवर, वेगवेगळ्या रेस्टॉरंटवर लिहून झाल्यावर वर्षाच्या शेवटी मला मीठ आठवायलादेखील एक निमित्त मिळालं. पणजीत सुरू असलेल्या ‘सेरेंडिपिटी’ आर्ट महोत्सवात ‘गोव्यातील मिठाचे भविष्य’ या विषयावर एक सखोल चर्चा झाली. या चर्चेमुळे मिठाशी संबंधित असंख्य गोष्टींची मनात जुळवाजुळव सुरू झाली.
आपल्या भारतीय समाजजीवनात मिठाला आपण स्वयंपाकापलीकडे महत्त्व दिलं असलं तरी आज आपल्या ताटात कोणतं मीठ असतं? आपण बाजारातून कोणतं मीठ आणतो? एखाद्या मोठ्या नावाजलेल्या ब्रँडेड मिठाच्या रूपात आपण विष तर आणत नाही ना?
अशा साऱ्या प्रश्नांचा कल्लोळ ही चर्चा ऐकून सुरू झाला. गोव्यातल्या मिठागरांवर आणि तिथं तयार होणाऱ्या मिठावर संशोधन केलेल्या डॉ. सविता केरकर, गुजरात कच्छ भागातील ‘आगरिया’ समूहासोबत काम करणाऱ्या पंक्ती जोग आणि मिठागरांना भेट देण्याचा, मिठागरांची माहिती देण्याचा कार्यक्रम करणाऱ्या तौलिया डिसोझा या तिघींनी मीठ आणि आपलं जीवन, मीठ आणि गोवा, मीठ आणि समाज अशी सविस्तर मांडणी केली.
पणजीहून मडगावला जाताना मेरशीच्या रस्त्यालगत गावठी मीठ विकायला ठेवलेलं दिसतं. अनेकजण दुरूनच बघून पुढे निघून जातात. काळसर, मातूळ रंगाचं दिसणारं मीठ बघून नाक वाकडं करतात. पण मिठाच्या या काळ्या - मातूळ रंगातच त्याचं निरोगीपणा, पोषणमूल्य दडलेलं आहे.
ते आहे तसं वापरल्याने आपल्याला कोणतीच हानी पोहोचत नाही उलट अनेक आजार दूर होतात. रंगरूपाने पांढरेशुभ्र, हाताला न चिकटणारे ‘रिफाइंड’ केलेल्या दाणेदार मिठाच्या वापरामुळे आपण ‘डिमेन्शिया’ सारख्या आजारांना निमंत्रण देत आहोत अशी माहितीदेखील सविता केरकर यांनी यात दिली.
दर महिन्याला आपण किरणामालात कितीतरी महागडे जिन्नस विकत घेत असतो. या किराणामालाच्या यादीत मीठ हे अगदी शेवटी येतं. त्याचं या यादीत तेवढं महत्त्वदेखील वाटत नाही. त्याच खरं महत्त्व पदार्थातच जाणवतं. मिठाचं महत्त्व माहीत असूनही आपण त्याकडे काणाडोळा करत असतो.
१९६४साली गोव्यात २०० अधिक मिठागरे होती आणि आज फक्त १६ मिठागरे अस्तित्वात आहेत हे सविता केरकर यांनी सांगताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. मिठागरांची संख्या घटतेय हे साहजिक आहे कारण गोव्यात मिठागरांच्या जागी रेस्टॉरंट आणि बार सुरू होऊ लागले आहेत.
नुकतेच हडफड्यातील भयानक जळीतकांड ज्या रेस्टॉरंट आणि बारमध्ये घडले तेदेखील मिठागरांच्या जागेत बांधले होते. पर्यटनाच्या अतिरेकापायी आपण जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर मिठागरे बुजवून त्याजागी आपल्याच समाध्या बांधून ठेवत आहोत. भविष्यात मिठागरांच्या जमिनीत ‘सॉल्ट’ नावाचे रेस्टॉरंट सुरू झाल्यास आपल्याला आश्चर्य वाटायचे काही कारण नाही. हेच याचे कुरूप विडंबन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.