रात्रीच्या काळोखात उद्योग-धंद्यावरून वाहनाने घरी परतणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नाही. रस्त्यांवरून धावणाऱ्या आलिशान गाड्यांमधील कधी कोण मद्यधुंद लाडला अंगावर येईल व जिवाची गाठ शिवाशी होईल सांगता येत नाही. दोनापावला येथे दोघांना यमसदनी धाडणारे मिनी कुपर, बीएमडब्ल्यूचे काळीज चिरणारे ‘कार’नामे लोक अद्याप विसरलेले नाहीत. त्यात रेन्ट अ कार, बाईकने झोप उडवलीय.
रेन्ट बाईकवर गुगल मॅपमध्ये गुंग झालेली पर्यटकांची जोडपी कधी रस्त्यात मागे-पुढे होतील अन् अपघात घडेल याचा भरवसा नाही. ‘रेन्ट अ कार’ व्यवसाय निष्पाप स्थानिकांच्या जिवांवर उठला आहे. मद्यपान करून रात्री भाड्याच्या गाड्या बेफाम हाकणे सर्रास झाले आहे. दारुड्या चालकांवर कुणाचा वचक उरलेला नाही.
शिर्लिमबांध येथे पादचारी महिलेला बेदरकार पर्यटक कार चालकाने जे उडवले, त्याची भयचकित करणारी फीत अंगावर काटा आणते. मृत महिलेच्या सरणाची राख थंडही होत नाही तोवर भाडेतत्त्वावर पोसलेल्या बेफाम संस्कृतीने शिवोलीत तरुणाचा बळी घेतला. मृत तरुण घरातील कर्ता होता. वृद्ध आई-वडिलांचा आधार होता. सरकार दोषीवर काय कठोर कारवाई करणार आहे?
पर्यटकांना भाड्याने दिल्या जाणाऱ्या गाड्या मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे माहीत असूनही सरकारने आतापर्यंत काय केले? मृत्यूचे सत्र असे थांबणार नाही. सरकारचे लकवा मारलेले धोरण त्यास कारणीभूत आहे. ठरावीक धनदांडग्या व्यावसायिकांच्या, राजकीय पुढाऱ्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीतील नपुंसकता नवश्रीमंतांचे वांझोटे चोचले पुरवते. त्यातून प्रसवत काहीच नसले, तर निष्पाप गोमंतकीयांचे रक्त रस्त्यावर स्रवते.
रेन्ट अ कार, बाईकच्या भस्मासुरावर लोकांमधून शरसंधान होऊ लागताच मायकल लोबो अस्वस्थ झाले. पर्यटनातील दलदल उतू गेली, की त्यांना उमाळे येतातच. मद्यपान करून वाहन चालवणे व रेन्ट अ कार व्यवसाय या भिन्न बाबी असल्याचा त्यांचा पवित्रा संधिसाधूपणा आहे. वरकरणी युक्तिवाद टिकणारा नाही. बहुतांश रेन्ट अ कारचे अपघात मद्यपी चालकांमुळेच झालेत. अशी वाहने चालविणाऱ्यांना गोव्यातील भागांची माहिती नसते. तरीही बेफाम वाहने हाकली जातात.
एखादा जीव गेला की चर्चेचा धुरळा उडतो अन् पुढे धूळ बसते. त्यावर विधानसभेतही खल झाला आहे. ‘रेन्ट अ कार वा बाईक चालविणाऱ्या व्यक्तीने केलेल्या अपघातात कुणाचा मृत्यू झाल्यास त्या व्यवसाय मालकाला अटक करण्यात येईल’, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी केली होती. आतापर्यंत किती जणांना अटक झाली? उत्तर नकारार्थी मिळेल. मालकांना कारवाईतून वाचविणारी शक्कल लढवून पर्यटक चालकांकडून ‘जोखीम हमीपत्रा’ची तरतूद करण्यात आली, ज्यामुळे व्यावसायिक नामानिराळे राहतील.
एका एका व्यावसायिकांकडे दीड-दीड हजार रेन्ट अ कार, बाईकचे परवाने! काय चालले आहे? शिवाय या व्यवसायातील विधीनिषेधांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. भाडेतत्त्वावर दिली जाणारी वाहने हे व्यावसायिक कुठे लावतात? कशी ठेवतात? ग्राहकांना कशी देतात? वाहन चालकांकडे आवश्यक कौशल्य असल्याची चाचणी होते का? याकडे कुणीच गंभीरपणे पाहत नाही. वाहतूक खाते, वाहतूक पोलिस निष्क्रीय बनलेत. दुसरीकडे सरकार रस्ते अपघात कमी करण्याचे लक्ष्य ठेवते. ही कुचकामी दुटप्पी भूमिका लोकांच्या जिवावर बेतते.
आमची मागणी आहे, रेन्ट अ कार, बाईक व्यवसाय बंद करा. कारण, सरकारचे त्यावर नियंत्रण उरलेले नाही. रेन्टेड बाईकही पुरे झाल्या, नवे परवाने बंद करा. सध्या ‘रेन्ट अ कार’ परवान्यांची संख्या उत्तर गोव्यात २,१८१ तर दक्षिण गोव्यात १,०६० इतकी आहे. शिवाय २०२२ पासून आतापर्यंत ३,८९१ ‘रेंट अ बाईक’चे नवे परवाने दिले गेले. तेही अधिकतर ठरावीक मालकांना. दरवेळी कायदे कठोर करण्याची भाषा होते, पण कायदे असून उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी करणारे पोलिस खिसे गरम करून तडजोड करतात. शिर्लिमबांध, शिवोलीतील थार मालकांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
भाडेतत्त्वावर चालणाऱ्या वाहनांची स्पीड गव्हर्नन्स यंत्रणा का धूळ खाते, याचे उत्तरही सरकारने द्यावे. उत्तर भारतातून येणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांचाही बजबजपुरीत हात आहे. बेदरकार चालकांना वाचविण्यासाठी त्यांची बोटेही फोनवर लीलया फिरतात. किनारी भागातील आमदारांनी पर्यटन नासवले आहे.
सावंतवाडीतील पर्यटकांना मारहाण होते, त्यांची पोलिस दखल घेत नसल्याने महामार्ग अडवावा लागतो; कोलवा येथे हॉटेलात पर्यटकांच्या खोलीत कामगार शिरतात, त्यासाठी पर्यटकांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची मदत घ्यावी लागते तर कुठे आहे आपली कायदा व सुव्यवस्था? एका बाजूने असुरक्षित असलेला सामान्य पर्यटक तर दुसऱ्या बाजूने पर्यटनाच्या नावाखाली नियम शिथिल केल्यामुळे, प्रसंगी दुर्लक्ष केल्याने मद्यधुंद व बेफाम धावणारा पर्यटक; दोन्ही बाजूंनी नुकसान गोव्याचे व गोमंतकीयांचेच होते.
पण याची बूज कुणाला आहे? आदळून, ठोकरून, चिरडून मेलेल्या निष्पाप गोमंतकीयांच्या रक्तावर आणखी किती खिसे गरम होत राहणार? व्हेनिस, रोम आणि लिस्बन येथे स्थानिकांनी मोर्चे काढून ’पर्यटकांनी परत जावे’ अशा घोषणा दिल्या होत्या. स्पेनमधील कॅनरी बेटे, बार्सिलोना आणि मालगा येथे स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर अनियंत्रित पर्यटनाविरोधात निदर्शने केली आहेत. पर्यटनावर जगणारे स्थानिक पर्यटनाच्याच विरोधात रस्त्यावर उतरतात, तेव्हा परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव होते. गोवाही हळूहळू त्याच मार्गाने प्रस्थान करत आहे. ‘पर्यटनच नको’ ही भूमिका घेत गोंयकार रस्त्यावर उतरण्यापूर्वी सावध होणे गरजेचे आहे. पर्यटन निश्चितच हवे, पण ते जीवघेणे नको!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.