Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

खरी कुजबुज, खरी रमेश तवडकरांना अंबाबाई पावणार?

Khari Kujbuj Political Satire: उघड सत्य आहे की, मायकल लोबो हे टॅक्सीचालकांची बाजू घेऊन पक्ष आणि सरकारला अडचणीत आणत आहेत, त्यामुळे पक्षश्रेष्ठी चांगलेच धास्तावले आहेत.

Sameer Amunekar

रमेश तवडकरांना अंबाबाई पावणार?

‘देव तारी त्याला कोण मारी’ , असे म्हणतात ते खरे. राज्यात सध्या राजकीय बदलाचे वारे वाहू लागलेय. काही मंत्र्यांची विकेट जाणार व काही नवे मंत्री पीचवर उतरणार हे आता निश्चित झाले आहे. सभापती तथा काणकोण मतदारसंघाचे आमदार रमेश तावडकर सध्या आपल्या खास कार्यकर्त्यांसह तीर्थाटन करीत आहेत. तवडकरांनी काणकोणच्या कार्यकर्त्यांसह महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन आपली मनोकामना व्यक्त केली. गोविंदांच्या जागी तवडकर आले तर त्यांना अंबाबाई पावली, असेच म्हणावे लागणार. आता पाहूया रमेश सरांची आंगवण पूर्ण होते की नाही ते!

‘लोबो फॅक्टर’कडे नजर

उघड सत्य आहे की, मायकल लोबो हे टॅक्सीचालकांची बाजू घेऊन पक्ष आणि सरकारला अडचणीत आणत आहेत, त्यामुळे पक्षश्रेष्ठी चांगलेच धास्तावले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर एक मोठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी थेट मायकल लोबो यांना भेटायला बोलावले होते. अर्थात, मायकलच्या कार्यकर्त्यांकडून टॅक्सीचालकांची बाजू घेत असल्याने त्यांना बोलावले होते, अशी चर्चा सुरू झाली आहे. पुढील काळात मायकल लोबो टॅक्सीचालकांची बाजू अजून किती हिरिरीने घेतात, की पक्षाची ‘शिस्त’ म्हणून पक्षाच्या आणि सरकारच्या निर्णयांना पाठिंबा देतात, हे पाहणे खरंच मजेशीर ठरणार आहे. गोव्याच्या राजकारणात हा ‘लोबो फॅक्टर’ आता काय रंग दाखवतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात!

घोडकिरेकर उवाच!

गोमेकॉतील आंदोलनात यशस्वी मध्यस्थी केल्याचा दावा करणारे डॉ. मधू घोडकिरेकर अधिष्ठातापद भरल्यानंतर जाहीरपणे व्यक्त होणार की, नाहीत याकडे अनेकांचे डोळे लागून राहिले होते. सरकारी सेवेत असताना त्यांनी बोलण्याचे धाडस दाखवले होते. त्यामुळे आता त्यांची अभिव्यक्ती काय याविषयी चर्चा होती. ती कोंडी त्यांनीच फेसबुकवर चार ओळी लिहून फोडली. त्यांनी लिहिले आहे, की गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वात प्रतिष्ठितपदाचा आणि गोवा राज्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या सन्मानाची पुनर्प्रतिष्ठा केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे मन:पूर्वक आभार. आंदोलक डॉक्टरांच्या भावनांच्या कल्लोळात दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्री म्हणून आपण गांभीर्याने दखल घेतलीत आणि अखेर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला कायमस्वरूपी अधिष्ठाता लाभला, हे खरोखर समाधानकारक आहे. या ओळींमधल्या रिकाम्या जागेतील अर्थ उलगडण्याचा प्रयत्न कोणी केल्यास हाती काय लागेल?

शेवटी फातोर्डाचा दामबाब पावला

ही गोष्‍ट आहे सरकारी उच्‍च माध्‍यमिक विद्यालयात शिकविणाऱ्या एका शिक्षकाची. आपल्‍या अधिकाराचा गैरवापर केल्‍याचा आरोप ठेवून त्‍याच्‍या हाताखाली काम करणाऱ्या एका शिक्षिकेने त्‍याच्‍या विरोधात असंख्‍य तक्रारींचा मारा केला. याचाच परिणाम म्‍हणून त्‍या शिक्षकाची बदली करण्‍याचा आदेश जारी करण्‍यात आला. हा शिक्षक स्‍वत:ला कुंकळकरिणीचा भक्‍त म्‍हणवून घेतो. पण सध्‍याच्‍या राजकीय परिस्‍थितीत फातोर्डाच्या दामबाबाचा शब्द चालणार याची पक्‍की माहिती असल्‍याने त्‍याने स्‍वत:ला या दामबाबाच्‍या पायावर घालून घेतले आणि दामबाबही त्‍यामुळे प्रसन्न होऊन त्‍यांनी दोतोरांकडे बोलून हा बदली आदेश म्‍हणे स्‍थगित करून ठेवला. त्‍या शिक्षकालाही म्‍हणून दोष देऊन चालणार नाही. कारण सेवाकाळ संपण्‍यासाठी तीन महिने बाकी असताना ज्‍या ठिकाणी त्‍याची बदली केली तिथे त्‍याला अन्‍य एका अधिकार्‍याच्‍या हाताखाली काम करावे लागले असते. आजपर्यंत ‘हम करेसो कायदा’ हीच भूमिका निभावणाऱ्या त्‍या शिक्षकाला दुसऱ्याच्‍या हाताखाली काम करणे म्‍हणजे त्‍याचे नाक कापण्‍यासारखे झाले नसते का? ∙∙∙

पणजीत नव्‍या पाहुण्‍याचं आगमन

गाेवा हे पर्यटन क्षेत्र असल्‍याने वेगवेगळ्‍या राज्‍यातील पर्यटक गोवा दर्शनासाठी येतच असतात. आता ही गोवा दर्शनाची चटक शेजारच्‍या राज्‍यातील पक्ष्यांनाही लागली की काय, असे वाटण्‍याजाेगी परिस्‍थिती काल पणजीत आलेल्‍या एका पक्ष्यामुळे निर्माण झाली. काल दोनापावला-पणजी येथील ग्रीन रोझरी हायस्‍कूलच्‍या बाहेर असलेल्‍या एका झाडावर चक्‍क हॉर्नबिल पक्षी बसलेला दिसला. वास्‍तविक हॉर्नबिल गोव्‍यात दिसत नाहीत. तर शेजारच्‍या कर्नाटक राज्‍यातील दांडेली भागात ते मुबलक प्रमाणात दिसतात. तिथलाच एक हा पर्यटक पक्षी गोव्‍यात आला तर नसावा ना असे काहींना वाटल्‍याशिवाय राहिले नाही. माजी आयपीएस अधिकारी बॉस्‍को जॉर्ज यांना हा नवा पाहुणा आपल्‍या कॅमेऱ्यात कैद करण्‍याचा मोह काही आवरता आला नाही. ∙∙∙

फेरीबोट बुडाल्याचा फटका

‘बेती’ फेरीबोट बुडाली आणि नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांचे सरसकटपणे म्हणणे स्वीकारण्याबाबत सरकारी पातळीवर साशंकता निर्माण झाली आहे. एरव्ही त्या खात्याबाबत त्यांचे निर्णय अंतिम असत. रोरो फेरीबोट दर पत्रकाचेही तसेच आहे. त्यांनी दिलेले दर सरकारने आधी स्वीकारले होते. आता खुद्द मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पर्यटकांच्या वाहनांसाठी ३०० रुपयांचा तिकीट दर आकारण्याविषयी शंका उपस्थित केली आहे. मुख्यमंत्री या प्रकरणी निर्णय घेतील, असे सांगून फळदेसाई यांनी बरेच काही सांगितले आहे. ‘बेती’ फेरीबोटीचे हे कवित्व नदी परिवहन खात्यात आणखीन काही काळ गुंजत राहील, असेच दिसते.

‘आयात’ केलेल्यांना मंत्रिपदे नकोत!

भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते चांगलेच नाराज आहेत. त्यांची खासगीत सुरू असलेली चर्चा आता उघडपणे ऐकू येऊ लागली आहे. आपल्या पक्षासाठी आम्ही वर्षानुवर्षे घाम गाळला, निष्ठेने काम केलं. आता बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना थेट मंत्रिपदं दिली, तर आम्ही पक्षावर विश्वास कसा ठेवायचा?, असा सवाल अनेक कार्यकर्ते विचारत आहेत. सध्या भाजपमध्ये जोरदार चर्चा आहे की, ‘आयात’ केलेल्या नेत्यांना मंत्रिपद देण्याऐवजी, पक्षासाठी झटणाऱ्या जुन्या नेत्यांना संधी मिळावी. भाजप कार्यकर्त्यांच्या नजरा केवळ मंत्रिमंडळ विस्ताराकडेच नाही, तर पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडेही लागून आहेत. आता भाजप नेतृत्व आपल्या कार्यकर्त्यांची ही चर्चा किती गांभीर्याने घेतं आणि त्यावर काय तोडगा काढतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ∙∙∙

सरकारचा मास्टरस्ट्रोक

‘गोमेकॉ’च्या अधिष्ठातापदी डॉ. जयप्रकाश तिवारी यांची नियुक्ती करून सरकारने ‘मास्टर स्ट्रोक’ मारला आहे. याआधी डॉ. प्रदीप नाईक यांची अधिष्ठातापदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना कार्मिक खात्यात हजेरी लावण्यास सरकारने भाग पाडले होते. त्या खात्यात हजेरी लावतच ते सेवानिवृत्तही झाले होते. त्यानंतर तिवारी यांची नियुक्तीही सरकारने अशीच अधांतरी ठेवली होती. त्यामुळे डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याकडे प्रभारी अधिष्ठातापदाचा ताबा देणे सरकारला शक्य झाले होते. आताही तसाच प्रकार भविष्यात होऊ नये, यासाठी डॉ. तिवारी यांच्याकडे प्रभारी ताबा न देता त्यांची पूर्णवेळ अधिष्ठातापदी नियुक्ती करण्याचा समंजसपणा सरकारने दाखवला आहे. गोमेकॉत आता राजकीय हस्तक्षेप नाही, असा संदेशही देण्याचा सरकारचा प्रयत्न यामागे आहे, अशी चर्चा गोमेकॉ वर्तुळात मंगळवारी होती.

बेतोडा पंचायतीतही ‘अविश्‍वास’चे लोण

फोंडा तालुक्यात सध्या अविश्‍वास ठरावाचे पेव फुटले आहे. बेतकी खांडोळा पंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांविरुद्ध अविश्‍वास दाखल होऊन तो संमत झाला असतानाच आता बेतोडा पंचायतीच्या सरपंचाविरुद्धही अविश्‍वास दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या सरपंच, उपसरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव आणल्यानंतर फोंडा तालुका जरासा शांत झाला होता, आता परत एकदा अविश्‍वासाचे पेव सुरू झाल्यामुळे ते किती पंचायतींपर्यंत पोचते ते पहावे लागेल.

गोवा फॉरवर्ड कुंकळ्ळीत दरबार भरवणार?

राजकारणात यशस्वी होण्यासाठी जनाधाराची गरज असते. राजकारणी महत्त्वाकांक्षी असायलाच हवा. महत्त्वाकांक्षा सत्यात उतरवायची झाल्यास पाय पसरावेच लागणार. याच उद्देशाने गोवा फॉरवर्ड पक्षाने राज्यात फॉरवर्ड दरबाराच्या रूपाने पाय पसरायला सुरवात केली आहे.पेडण्यापासून नावेलीपर्यंत फॉरवर्ड चे बॅनर लागले आहेत. मात्र, गोवा फॉरवर्ड कुंकळ्ळी मतदारसंघात दरबार भरवणार का? कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसपासून सुरू झाला व जेव्हा गोवा फॉरवर्ड भाजपबरोबर सत्तेत होता तेव्हा युरी आलेमाव गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांच्या सहयोगाने समांतर आमदार म्हणून वावरत होते. आता युरी यांच्या मतदारसंघात गोवा फॉरवर्ड आपला विस्तार वाढवणार का, असा प्रश्‍न कुंकळ्ळीकरांना पडणे स्वाभाविक नाही का?

‘एनईपी’ ‘सीसीई’च्या मार्गाने न जावो!

नियोजन करणे वेगळे व नियोजनाची अंमलबजावणी करणे वेगळे असते.आपण अनेक वेळा चांगले नियोजन करतो, मात्र अंमलबजावणीत मागे राहिल्याने अपयशी ठरतो. जेव्हा आपल्या देशात शिक्षण हक्क कायदा लागू झाला तेव्हा आपण आठवीपर्यंत ‘सीसीई’ पद्धत अंमलात आणली होती. आता देशात ३८ वर्षांनी नवीन शिक्षण धोरण आपण स्वीकारले आहे. एनईपी राष्ट्रीय शिक्षण धोरण विद्यार्थी हितार्थ आहे. मात्र जसे विद्यार्थी, पालक शिक्षक व शाळाचालक ‘सीसीई’ ची अंमलबजावणी करण्यात कमी पडल्याने ही पद्धत अपयशी ठरली. आता हीच गत ‘एनईपी’ची झाली नाही, म्हणजे मिळवली. ∙∙∙

फोंड्यात अनेकांच्या ‘गुडघ्याला बाशिंग’

विधानसभा निवडणूक पावणे दोन वर्षांवर येऊन ठेपली असतानाच आता फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघात हौसे, नवसे, गवसे आमदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधू लागले आहेत. एनकेनप्रकारेण मतदारांचे आपल्याकडे लक्ष कसे वळवता येईल, यावर या इच्छुक उमेदवारांनी आपले ‘लक्ष्य'' केंद्रीत केले आहे. त्यामुळे फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघात सध्या स्पर्धा, इव्हेंट वगैरेंचे आयोजन केले जात आहे. महिलांना गोळा करून कार्यक्रम होत आहेत, मात्र त्याचा कितपत विधानसभा निवडणुकीसाठी उपयोग होतो, ते पहावे लागेल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT