डॉ. नाऊ वरक
मनोहर पर्रीकरांच्या उत्तरार्धात गोव्यात जर राजकीय सत्ता टिकवून ठेवायची असेल तर काही सुरक्षित मतदारसंघांची गरज आहे, याची जाणीव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला झाली. ज्या ठरावीक मतदारसंघातून विशिष्ट लोकप्रतिनिधी सतत निवडून येतात, अशा मतदारसंघास राजकीय पक्ष सुरक्षित मतदारसंघ मानतात.
असे मतदारसंघ हे दीर्घकाळ सत्ता टिकवून ठेवण्याचे एक माध्यम आहे. कॉंग्रेसमधील १९६९मधील फूट, जनसंघाचे निवडणुकांमधील अपयश, साम्यवादी विचारसरणीची घसरण आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे १९९०मधील जागतिकीकरण या प्रमुख कारणांमुळे भारतीय पक्षपद्धती घराणेशाहीकडे झुकली.
आज काही राजकीय घराणी राजकीय पक्षांची गरज बनलेली आहेत. राजकीय पक्ष आणि राजकीय घराणी यांमधील संबंध हे वैचारिक असतातच असे नाही.
२०१४नंतर अशा बऱ्याचशा घराण्यांनी कॉंग्रेसला झिडकारून भाजपशी मनोमीलन केले. गोवाही यास अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर गोव्यातील प्रमुख राजकीय पक्ष आणि राजकीय घराणी यांमधील समीकरणे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
उत्तर गोव्यातील सत्तरीतील पर्ये आणि वाळपई, फोंड्यातील मडकई तर दक्षिण गोव्यातील मडगाव सर्वांत अधिक सुरक्षित मतदारसंघ वाटतात. या मतदारसंघांतील आमदार शेजारील मतदारसंघ प्रभावित करतात. प्रतापसिंग राणे यांनी २०२२ची विधानसभा पर्ये मतदारसंघातून न लढवता राजकारणातून निवृत्ती स्वीकारली.
तद्नंतर त्यांचे चिरंजीव आणि वाळपईचे आमदार विश्वजित राणे यांची सत्तरी तालुक्यातील राजकारणाचे ‘उत्तराधिकारी’ म्हणून ओळख निर्माण झाली. २०१७मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या विश्वजित यांनी राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक जिंकली. तेव्हापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे विचार कसे पूरक आहेत, हे विविध माध्यमांद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न करतात.
संघाशी निगडित ‘पांचजन्य’ या साप्ताहिकास राणेंनी ‘इको-टुरिझम’विषयी मुलाखत दिली व आपले नेतृत्व पर्यावरणास अनुकूल आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
भाजपने २०१९नंतर ‘मराठा’ ही अस्मिता अधोरेखित करणारे प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे हे दोन चेहरे पुढे आणले. राणे हे भाजपचे प्रमुख नेतृत्व म्हणून पुढे येऊ लागले. इतक्यात सत्तरी तालुक्यात शेळ-मेळावली येथे प्रस्तावित गोवा-आयआयटी कॅम्पस विरोधातील तीव्र आंदोलनाने २०२२च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणे यांना अडचणीत आणले,
तरीही ते ८,०८५ अशा मताधिक्याने निवडून आले. लगेचच नगरनियोजन व वनमंत्री म्हणून कार्यभार हाती घेऊन पर्यावरणास हानिकारक प्रकल्पांवर कारवाई करण्याची तंबी देऊ लागले. मोरजी येथील टेकडीवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी समाजमाध्यमांतून सार्वजनिक केले.
तसेच तत्कालीन कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते मायकल लोबो संबंधित हॉटेलांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या. राणे यांची सक्रियता क्षणभंगुर ठरली. सप्टेंबर २०२२मध्ये लोबो, पत्नी डिलायला लोबो व इतर कॉंग्रेस आमदार यांनी भाजपप्रवेश केला.
२०२४च्या निवडणुकीआधी भाजपला लोकसभा मतदारसंघ सुरक्षित करायचे होते. त्यामुळे उत्तर गोव्यात लोबो घराणे तसेच दक्षिण गोव्यात दिगंबर कामत यांचा मतदारसंघ महत्त्वाचा होता. जरी दक्षिण गोव्यात भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो पराभूत झाल्या तरीही भाजपची मते २०१९च्या तुलनेत कमी झाली नाहीत.
राणे, लोबो आणि बाबूश मोन्सेरात या तीन घराण्यांचा भाजपमध्ये भरणा झाल्यामुळे २०२४मध्ये श्रीपाद नाईक उत्तर गोव्यातून निर्विवादपणे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मात्र, राजकीय सत्तेच्या चढाओढीत कमी फरकाने पराभूत झालेली कवळेकर, कांदोळकर आणि आलेमाव ही घराणी पुन्हा एकदा सत्तासंघर्ष नेटाने लढवत आहेत.
जसजशी २०२७ विधानसभा निवडणूक जवळ येत आहे, तसतसे या राजकीय घराण्यांमधील रस्सीखेच पुन्हा सुरू होऊ लागली आहे. डिसेंबर २०२५मध्ये झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्तरी तालुक्यातील तिन्हीही मतदारसंघात राणे पुरस्कृत उमेदवार विजयी झाले. या विजयीसभेत राणे यांनी हा ‘बहुजन’ समाजाचा विजय असल्याचे सांगितले.
तसेच आपली ‘बहुजन’ ही अस्मिता ठळकपणे मांडली. पहिल्याच प्रयत्नात मनोज परब यांनी २०२२ला वाळपईमधून विश्वजित यांचे मताधिक्य कमी करून २४% मते मिळविली होती. नगरनियोजन कायद्यातील ‘३९-अ’ या वादग्रस्त कलमाविरोधात परब यांच्या रेव्होल्यूशनरी गोअन्स पक्षाच्या आमदाराने सुरू केलेले आमरण उपोषण आणि आंदोलनामुळे राणे यांच्या प्रतिमेस स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर ठेच पोहोचली आहे. २०२७मध्ये विश्वजित आणि मनोज यांची पुन्हा एकदा लढत पाहायला मिळू शकते.
२०२२च्या निवडणुकीत ४० पैकी १० आमदार १,०००पेक्षा कमी मतांनी जिंकले होते. तसेच सुमारे दोन हजारांपेक्षा कमी फरकाने जिंकणाऱ्या आमदारांचा आकडा लक्षणीय आहे.
फोंड्याचे रवि नाईक ७७ मतांनी जिंकले होते, तर सेंट आंद्रेचे विरेश बोरकर ७६ मतांनी विजयी झाले होते. कळंगुट आणि मडगाव मधून २०२२मध्ये कॉंग्रेस तिकिटावर निवडून आलेले मायकल लोबो आणि दिगंबर कामत मोठ्या फरकाने निवडून आले होते. २०२७साठी मडगावमध्ये बरेच दावेदार जोमाने काम करत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत राजकीय घराणी वरचढ ठरताहेत, की पक्षांचे संघटनात्मक कौशल्य कामी येते ते पाहावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.