डॉ. नाऊ वरक
सध्या रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्षातील तरुण नेत्यांच्या शिवराळ भाषेमुळे भाषेच्या तामसिकतेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे इतर पक्षांतील नेत्यांच्या सालस भाषेवरही तेवढ्याच चिकित्सकतेने पाहण्याची गरज आहे. आधुनिक लोकशाहीचा राजकीय सभ्यता निर्माण करण्यावर भर असला पाहिजे.
गोव्याच्या राजकारणातील असभ्य आणि शिवराळ भाषेमुळे गोव्यातील राजकीय संस्कृती बदलत आहे. मराठी आणि कोकणीमधील भाषावादापेक्षा राजकीय भाषा येथील जनतेमध्ये लोकप्रिय होत आहे. खरेच अचूक, प्रामाणिक आणि स्पष्ट भाषा चांगली असते का? त्याचप्रमाणे चूक, अप्रामाणिक आणि अस्पष्ट भाषा वाईट असते का? या दोन प्रश्नांची योग्य तपासणी झाली पाहिजे. राजकारणात सौम्य शब्दप्रयोग किंवा कटू शब्दप्रयोग यांच्या परिणामकारकतेची तीव्रता व व्यापकता समजून घेणे आवश्यक आहे. सोज्वळ भाषा बोलणारे गुणी राजकारणी किंवा क्रोधीत भाषा बोलणारे अवगुणी असा भेद राजकारणात करता येत नाही.
भाषिक सालसता आणि सतंप्तता हि राजकीय हित साध्य करण्याची साधने आहेत. सध्या रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्षातील तरुण नेत्यांच्या शिवराळ भाषेमुळे भाषेच्या तामसिकतेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे इतर पक्षांतील नेत्यांच्या सालस भाषेवरही तेवढ्याच चिकित्सकतेने पाहण्याची गरज आहे. आधुनिक लोकशाहीचा राजकीय सभ्यता निर्माण करण्यावर भर असला पाहिजे. १९४६ मध्ये जॉर्ज ऑर्वेल यांनी ‘पॉलिटिक्स अँड द इंग्लिश लँग्वेज’ या निबंधात मानवी चेतना, राजकीय निर्णय आणि राजकीय हेराफेरी यामध्ये भाषेचे योगदान अधोरेखित केले.
त्यांच्या मते भाषेचा ऱ्हास आणि राजकीय विचारांचा ऱ्हास यांचा एकमेकांशी परस्पर संबंध आहे. या दोन्ही प्रक्रिया एकमेकांना बळकटी देत असतात. भाषेची सालसता हि भाषेची प्रगती ठरवू शकत नाही. ऑर्वेलच्या मते, राजकीय संवाद हा तटस्थ असू शकत नाही. भाषिक सालसतेत किंवा तामसिकतेत संदिग्ध राजकीयता दडलेली असते. ऑर्वेलच्या तर्कानुसार राजकीय नेते व पक्षांची भाषा तपासणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ दोन विधाने घेऊया. पहिले विधान ‘आरजी अवैध परप्रातीयांच्या विरोधात आह’. दुसरे विधान ‘आरजी भांडवलशाही व नवउदारमतवादाच्या विरोधात आहे’. पहिले वाक्य संदिग्ध आहे. तर दुसऱ्या वाक्यात राजकीय वैचारिकता स्पष्ट दिसते. दुसरे वाक्य आरजीने केव्हाही म्हटल्याचे आढळत नाही.
ऑर्वेलच्या मते राजकीय नेते भावनिक परिस्थिती निर्माण करण्यासाठी अनेक रूपके वापरतात. भावनिक रूपकांमुळे भविष्यात कोणती परिस्थती उद्भवेल याबद्दल त्यांच्याकडे ठोस माहिती नसते. अशाच भावनांतून ‘गोव्याला सिलिकॉन व्हॅली करणार’ अशी घोषवाक्ये समोर येतात. १९९४ मध्ये शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मुंबईला सिंगापूर करण्याची घोषणा केली होती. तर मनमोहन सिंग यांनी मुंबईला ‘शांघाय’ बनवू असे म्हटले होते. याला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांना विदेशातील विद्यापीठे आणून ‘तिसरी मुंबई’ म्हणजेच ‘एज्यु सिटी’ बनवायची आहे.
आरजीचे ‘नीज गोंयकारांचे’ गोवा आणि भाजपची ‘सिलिकॉन सिटी'' या दोन्ही टोकाच्या भावनिक कल्पना असल्याचे दिसून येते. युरोपात पूर्वी नेते बुद्धिजीवी दिसण्यासाठी किंवा लोकांना कल्पना पटवून देण्यासाठी कल्पनांचे ग्रीक किंवा लॅटिन मूळ अधोरेखित करायचे. त्याचप्रमाणे भारतातही आता शब्दांचे किंवा कल्पनांचे संस्कृत किंवा आदिवासी मूळ अधोरेखित केले जाते. या रूपकांच्या माऱ्यात सामान्य माणसाची विवेकबुद्धी गप्प बसण्यातच धन्यता मांडते.
गोव्यात पक्षांतराचा इतिहास पाहता या सर्व पक्षांतरांचे मूळ आहे ‘विकास’. पक्षांतराची कृती जरी तामसिक असली तरी भाषा सालस असते. दिगंबर कामत यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये पक्षांतर केल्यानंतरची भाषा सालस होती. ते म्हणाले, ‘ते परत देवळात गेले. त्यांनी देव व देवींना विचारले की त्यांना भाजपमध्ये पक्षांतर करायचे आहे. मी काय करू? आमच्याकडे प्रसाद घ्यायची पद्धत आहे. देव म्हणाला, तू पुढे जा! काळजी करू नकोस.’ त्यांच्याप्रमाणेच इतर आमदारांनीही अशीच सालस कारणे मतदारांना दिली असतील.
राजकारणी खोटे बोलतात हे सर्वमान्य आहे. सत्य माहीत असताना ते लपविण्यात व त्याचा विपर्यास करण्यात राजकारणी धूर्त असतात. या संदर्भात अमेरिकन तत्वज्ञ हॅरी फ्रँकफर्ट यांचे ‘ऑन बुलशीट’ हे पुस्तक महत्वपूर्ण आहे. त्यांच्या मते धूर्त राजकारण्यांपेक्षा थापा मारणारे नेते खूप धोकादायक असतात. त्यांना खऱ्या- खोट्याशी देणे-घेणे नसते. सत्य समोर आणण्यापेक्षा त्यांना स्वतःची प्रतिमा तयार करणे हा प्रमुख उद्देश्य असतो. आपण जे बोलतो ते भविष्यात शक्य आहे का नाही याचेही काही पडलेले नसते. याउलट खोटे बोलणे हि हेतुपुरस्सर कृती असून त्याचा प्रभाव विशिष्ट कालखंडापुरती मर्यादित असतो. या प्रक्रियेस कुटील राजनीती म्हणता येईल. एका विशिष्ट परिस्थतीतीत खोटे बोलणारा व्यक्ती आपली चूक सुधारू शकतो.
दडविलेले असत्य बाहेर काढू शकतो. थाप ही खरे आणि खोटे यामधील फरकच मान्य करत नाही. थाप सत्याचे अस्तित्वच नाकारते. सततची पक्षांतरे गोव्याला थापांच्या राजकारणाकडे नेऊ शकतात. फेसबूक आणि इतर समाजमाध्यमांवरील प्रतिक्रियांची भाषा पाहता गोव्यातील मतदार थापांच्या राजकारणाला बळी तर पडत नाही ना? असे भीतीदायक चित्र दिसत आहे. त्यामुळे गोव्यात सध्या थापांचे राजकारण सुरु आहे का? याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत भाषेतील सालसता, तामसिकता आणि थापा या तीन गोष्टी न्याहाळल्या पाहिजेत. तरच गोव्याची राजकीय सभ्यता अबाधित राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.