अॅड. सूरज मळीक
गोव्यात अरबी समुद्राशी मिसळणाऱ्या नदीच्या मुखापासून त्याच्या उगमाच्या दिशेने जिथेपर्यंत खारे पाणी आहे तेथे खारफुटीच्या वैविध्यपूर्ण वृक्षांनी समृद्ध जंगल पाहायला मिळते. नदीच्या दोन्ही काठाच्या कडेने असलेल्या क्षार पाण्यात तसेच दलदल भागात या सदाहरित वृक्षांची वाढ झालेली दृष्टीस पडते.
अनेक ठिकाणी नदी पात्राच्या मध्यभागी जेव्हा गाळ साचतो तेव्हा तेथे या वृक्षाच्या बिया मातीत रुजून येतात आणि हां हां म्हणता त्याचे कांदळवनामध्ये रूपांतर होते. त्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी हे वृक्ष भरपूर क्षेत्रात भरगच्च वाढल्याने जणू काही लहानलहान बेटे तयार झाल्यासारखी दिसतात.
भरती व ओहोटीच्या प्रक्रियेतून समुद्रातील क्षार पाण्याचा शिरकाव नदी पात्रात सतत होत असतो. नदीतील गोड पाण्यात क्षार पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात मिसळत असल्यामुळे येथील वृक्ष वनस्पतीच्या सांनिध्यात वैविध्यपूर्ण जैविक संपदा पाहायला मिळते.
गोव्यात तिळारी, मांडवी, डिचोली, उगे यासारख्या नदीच्या गोड्या पाण्यात ज्या प्रमाणे मेण कुमयाची झाडे ठिकठिकाणी उगवलेली दिसतात त्याचप्रमाणे समुद्राच्या दिशेने असलेल्या क्षार पाण्यात खारफुटी उगवलेली दिसतात. त्यामुळे वृक्षाकडे पाहिल्यावरसुद्धा गोड व क्षार पाण्यातील जैविक संपदेतील फरक लगेच लक्षात येतो.
गोवा - कोकणात खारफुटीच्या जंगलात प्रामुख्याने आढळणाऱ्या सुंदरी प्रजातीच्या कांदळवनामुळे गोव्याच्या सुंदर भूमीचे नैसर्गिक प्रकोपांपासून रक्षण होत आलेले आहे. या परिसंस्थेचे हे कार्य येथील लोकमानसाने प्राचीन काळापासून ओळखले होते.
त्यामुळे या खारफुटीला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू नये म्हणून लोकधर्मातील संकेतानुसार त्यांचे रक्षण केले. काही झुडपातील काही प्रजातींची मुळे विशेषत: पाण्यातून वर आलेली दिसतात तर काही प्रजातींची मुळे उंच वाढून बाजूला पसरलेली दिसतात.
गोव्यातील कोळी, खारवी व इतर कष्टकरी समाजातील लोकमानसाचे जीवन आर्थिकदृष्ट्या मासेमारीवर अवलंबून असल्याने त्यांची नाळ क्षार नदी व समुद्राशी जुळलेली आहे.
त्यामुळे मासे, खेकडे, कालवा, खुबे, यांसारख्या अन्नाच्या घटकांची रसद प्राप्त करण्यासाठी त्यांना नदीतील खारफुटीच्या कुशीत कमी पाणी असलेल्या ठिकाणी होडी थांबवून पाण्यात उतरणे सोपे होते. शापोरा नदीत खारफुटीच्या जंगलात होडी नेण्यासाठी विशेष मार्ग बनवलेले आहेत. नदी काठावर वास्तव्य करणाऱ्या पुरुष व महिला या खारफुटीच्या कुशीत कमी पाण्यात होड्या घेऊन जाताना दिसतात.
गोव्यात आखाडा या सांतइस्तेव्ह बेटावरील मानसाने खारफुटीचे महत्त्व जाणले होते. पूर्वी जेव्हा मान्सूनमध्ये मुसळधार पाऊस पडायचा तेव्हा हा प्रदेश चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला असायचा. त्यामुळे इतर गावापासून येथील लोकमानसाचा संपर्क क्वचितच व्हायचा.
अनेक वेळा पूरस्थिती उद्भवल्यावेळी याच खारफुटीने त्यांचे रक्षण केले. या नैसर्गिक परिसंस्थेच्या योगदानामुळे साखळ्यो नामक लोकदैवताच्या माध्यमातून त्यांनी खारफुटीचे जंगल आणि तेथील शतकोत्तर इतिहास असलेल्या झाडांचे श्रद्धेने पावित्र्य जपले होते. त्याचबरोबर हुपळी या नावाने परिचित असलेले खारफुटीचे झाड म्हणजे एकेकाळी लोकदैवताचे नैसर्गिक मंदिर ठरले होते.
ज्या ठिकाणी खारफुटीची झुडपे असतात तेथे समुद्र व जमीन यामध्ये जणू एक नैसर्गिक हिरवीगार भिंत तयार होते, जी त्याच्या काठाशी असलेल्या जमिनीचे धूप होण्यापासून रक्षण करते. खारफुटीच्या जंगलामुळे इतर वनस्पती त्याचबरोबर पाण्यात आढळणाऱ्या जलचरांचे रक्षण होते.
मासे, कोळंबी, खेकडे यांची सतत पैदास होत असल्याने त्यांची संख्या नियंत्रणात राहते. खारफुटीची झाडे एकदा वाढू लागल्यावर ती लगेच आजूबाजूला पसरू लागतात. त्यामुळे पाण्यातील अनेक घटकांना जगण्यासाठी सुरक्षित नैसर्गिक अधिवास लाभतो. त्यामुळे त्यांच्या प्रजाती नष्टप्राय होण्याचा धोका कमी असतो.
भारतात जगातील सर्वाधिक खारफुटीचे जंगलक्षेत्र सुंदरबन येथे असून हा देशाचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या पट्टेरी वाघाचा समृद्ध अधिवास आहे. येथील ‘बनबीबी’ नामक अदृश्य शक्ती या जंगलात संचार करते. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर दुसऱ्या क्रमांकाचे जंगल असल्याचे सांगितले जाते.
सागराच्या कुशीत भरपूर क्षार असलेल्या पाण्यात हे वृक्ष तग धरून उभे राहतात. या जंगलात जैविक संपदेचे वैविध्यपूर्ण दर्शन घडते. समुद्राच्या लाटा, वादळ, वारा यांच्यापासून किनारपट्टीचे संरक्षण करण्याचे कार्य खारफुटी पूर्वापार करत आलेली आहे.
त्यामुळे आज हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीतून वाचवण्याचे कार्य खारफुटींनी केले आहे. खारफुटीच्या लाकडाचा वापर लहान-मोठ्या आकाराचे जहाज बांधण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे अन्नाचा स्रोत म्हणून त्याची फळे उपयोगी येतात. दमा आणि त्वचा विकारावरती या वृक्षाच्या घटकांचा औषध म्हणून उपयोग केला जातो.
पूर्वी खारफुटीतील तिवर नामक वनस्पतीच्या पानांचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जायचा. अन्न, चारा, औषधाचे स्रोत असणाऱ्या खारफुटीच्या जंगलाचे नैसर्गिक सौंदर्य देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करीत आहे.
आज गोवा वन खात्याने पणजी येथील ओवरे खाडीच्या परिसरात खारफुटीच्या आधारे पदपथ बांधलेला आहे. त्यामुळे १,१०० चौरस मीटरच्या क्षेत्रातील या खारफुटीचे जवळून दर्शन घेणे आज सोपे झालेले आहे. खारफुटीच्या विविध प्रजातींबरोबर सकाळ-संध्याकाळ येथे पक्ष्यांच्या विविध प्रजातीचे दर्शन घेत या वृक्षांच्या छायेतून चालत जाणे खरोखरीच मनाला तृप्त करणारा आनंद देते.
पाण्यात उभे असलेले हे जंगल हिवाळ्यात समुद्रमार्गे स्थानांतरित होऊन आलेल्या पक्ष्यांसाठी आश्रयस्थान बनतात. हजारोंच्या संख्येने परदेशांतून आलेले हे पक्षी चोडण येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यात स्थायिक झालेले पाहायला मिळतात. येथे आपल्या पिल्लांना जन्म देण्यासाठी त्यांना पोषक हवामान आणि नैसर्गिक अधिवास लाभतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.