मिलिंद म्हाडगुत
पूर्वी कला अकादमीतल्या कोकणी नाट्य स्पर्धांना होणारी गर्दी आठवल्यास आता या स्पर्धांचा उलटा प्रवाह तर सुरू नाही ना, असे वाटू लागले आहे. यंदा तर ही कोकणी नाट्य स्पर्धा केव्हा सुरू झाली आणि केव्हा संपली, हेसुद्धा अनेकांना कळले नाही.
कला अकादमीतर्फे फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात झालेल्या ५१ व्या कोकणी नाट्यस्पर्धेचे नुकतेच सूप वाजले. पण जाता जाता ही स्पर्धा अनेक प्रश्न निर्माण करून गेली. दर स्पर्धेगणिक ढासळत चाललेली स्पर्धक संख्या तसेच प्रेक्षकांची संख्या स्पर्धेच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उमटून गेली. ४८ व्या कोकणी नाट्य स्पर्धेत २४ संस्थांनी भाग घेतला होता, तर ४९ व्या स्पर्धेत ही संख्या २० वर आली. गेल्या वर्षीच्या सुवर्ण महोत्सवी नाट्य स्पर्धेत फक्त १७ नाट्यप्रयोग सादर झाले होते, तर यंदाच्या ५१ व्या नाट्य स्पर्धेत ही संख्या १३ वर घसरली. यातून गेल्या चार वर्षांत स्पर्धेत भाग घेणाऱ्या संस्थांच्या संख्येचे कसे आकुंचन होत चाललेय, हे अधोरेखित होते.
यंदा तर याबाबतीत एक निचांकच गाठला गेला आहे. प्रेक्षकांबाबतही असेच म्हणता येईल. एक-दोन नाट्यप्रयोग सोडल्यास इतर प्रयोग यावेळीही रिकाम्या खुर्च्यांनाच दाखवावे लागले. एका ज्येष्ठ रंगकर्मीने याचा दोष तिकीट दराला दिला. शंभर रुपये हा दर सर्वांना परवडणारा नसल्याने उपस्थिती कमी होत चालल्याचे त्याचे म्हणणे होते. ही एक बाजू झाली; पण ही एकमेव बाजू नव्हे. गेल्या वर्षी उजेडात आलेल्या परीक्षक लाच प्रकरणामुळे अनेकांचा या स्पर्धांवरचा विश्वासच उडत चालल्याचे दिसत आहे. हे लाच प्रकरण उजेडात येण्यापूर्वीही लोक याबाबत बोलत होतेच. पण त्याला ठोस असे व्यासपीठ नव्हते.
पण दैनिक ‘गोमन्तक’ने अकादमीच्या अ गट नाट्य स्पर्धेतील परीक्षक लाच प्रकरण उजेडात आणल्यापासून तो एक ‘पब्लिक इश्यू’ बनू लागलाय. कला अकादमीने याबाबत कोणताच अधिकृत खुलासा न केल्यामुळे या प्रकरणाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागलेय. यामुळे सध्या सर्वच परीक्षकांना संशयाच्या नजरेने पाहिले जाऊ लागले आहे. सगळेच परीक्षक असे असतात, असे कुणीच म्हणणार नाही. अनेक प्रामाणिक परीक्षक असतात, हे कोणीही मान्य करेल. पण ‘ओल्यासोबत सुकेही जळते’, तसे परीक्षकांबाबतही होऊ लागलेय.
याच करता कला अकादमीने तेव्हाच जर या प्रकरणाला संयुक्तिक न्याय दिला असता तर जे संशयाचे सावट पसरले आहे ते नक्कीच कमी होऊ शकले असते. पण तसे न झाल्याने सध्या सगळी स्पर्धाच संशयाच्या भोवऱ्यात दिसत आहे. उपस्थिती कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे नाट्यसंहिता. सध्या काही अपवाद सोडल्यास मूळ नाट्यसंहिता कमी दिसू लागल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या वाङ्मयचौर्य प्रकरणामुळे लोकांना ‘असली क्या और नकली क्या है’ हेच समजेनासे झाले आहे. पण याबाबतीत कला अकादमी कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाही. स्पर्धा झाली की कार्य संपले, अशीच त्यांची भूमिका असल्यासारखे दिसते.
पूर्वी कला अकादमीतल्या कोकणी नाट्य स्पर्धांना होणारी गर्दी आठवल्यास आता या स्पर्धांचा उलटा प्रवाह तर सुरू नाही ना, असे वाटू लागलेय. यंदा तर ही कोकणी नाट्य स्पर्धा केव्हा सुरू झाली आणि केव्हा संपली, हेसुद्धा अनेकांना कळले नाही. आता यावर अकादमी काही ठोस उपाययोजना करेल का, हाच प्रश्न आहे. मुळात तशी मानसिकता त्यांच्या ठायी आहे की नाही, याचेही उत्तर मिळवावे लागेल. परीक्षकांसोबत प्रेक्षकांनाही परीक्षणाचा भाग करणे, हा उपाय अनेकांनी सुचवला होता. तसे नियमितपणे येणारे दहा प्रेक्षक निवडून त्यांना परीक्षणाच्या प्रक्रियेत समाविष्ट करून घेतले तर स्पर्धा संशयाच्या भोवऱ्यातून थोडीफार तरी बाहेर पडू शकेल, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे त्या रंगकर्मीने सूचना केल्याप्रमाणे तिकिटाचा दरही कमी करण्याचे बघितले पाहिजे.
संहितेबद्दल बोलायचे झाल्यास मागे नाट्य संहितेची कार्यशाळा झाली होती. त्यात प्रभावी नाट्यसंहिता कशी लिहावी, यावर फोकस टाकण्यात आला होता; पण त्याचे प्रतिबिंब या स्पर्धेत काही उमटलेले दिसले नाही. या स्पर्धेतील बहुतेक संहिता या रूपांतरितच होत्या. त्यामुळे अस्सल ‘गोवन टच’ असलेल्या संहितांची आजही आवश्यकता भासत आहे व त्या दृष्टीने अकादमीने प्रयत्न केल्यास ते कोकणी रंगभूमीच्या दृष्टीनेच नव्हे, तर कोकणी चळवळीच्या दृष्टीनेही एक सकारात्मक पाऊल ठरेल. पण परीक्षक लाच प्रकरणाबाबतचा अकादमीचा त्रयस्थ दृष्टिकोन पाहिल्यास ते नुकत्याच पार पडलेल्या कोकणी नाट्यस्पर्धेने निर्माण केलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहतील की का, याबद्दल शंकाच वाटते. मात्र, आता जर अकादमीने योग्य पावले उचलली नाही तर स्पर्धांवर पसरत चाललेला हा अंधार अधिकच गडद होत जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.