Goa drug overdose deaths Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

आणखी किती जीव गेल्यावर डोळे उघडतील?

Goa drug overdose deaths: ‘ड्रग्ज आणि मृत्यूचे नंदनवन’ ही गोव्याची झालेली ओळख आम्हांला चालणार नाही. आम्ही ती खपवून घेणार नाही. का खपवून घ्यावी? सरकारला यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आणखी किती बळी गेलेले हवे आहेत?

गोमंतक ऑनलाईन टीम

जवळजवळ नऊ दहा वर्षांपूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या आसपास एका रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्टीत ’ओव्हरडोज’मुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला आणि ’ड्रग्जचे नंदनवन’ या नव्या नावलौकिकाने गोवा जगप्रसिद्ध झाला. त्या दरम्यान मनोहर पर्रीकर पणजी पोटनिवडणुकीला सामोरे जात होते. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यानंतर त्यांना, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या बेकायदेशीर आहेत आणि तिथेच अंमली पदार्थांचे सेवन व वितरण होते याचा साक्षात्कार झाला होता. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनीही म्हटले होते की, ‘जिथे संगीत आहे, तिथे अंमली पदार्थ आणि दारूच्या अतिसेवनाची शक्यता असते. त्यामुळे आम्ही रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांवर वेळेची बंधने घालू, कारवाई करू!’ हे सर्व होऊन आता एक दशक उलटले आहे, काडीचाही फरक पडला नाही!

२०१४साली एका ईडीएम महोत्सवात कोसळल्यानंतर मुंबईतील एका महिलेचा मृत्यू झाला. २०१९साली तीन तरुणांचा मृत्यू झाला, त्यापैकी दोन संगीत महोत्सवाच्या प्रवेशद्वारावरच दगावले. डिसेंबर २०२४मध्ये, मूत्रपिंडाला झालेली इजा आणि ’एडेमा’मुळे दिल्लीतील एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात एका बेकायदेशीर पार्टीत इंदूरच्या २१ वर्षीय मुलाचा ’ओव्हरडोज’मुळे मृत्यू झाला. हे समजायला काही ‘रॉकेट सायन्स’ लागत नाही की, या पार्ट्या आणि संगीत महोत्सवांचा ’क्लब-ड्रग्ज’शी खोलवर संबंध आहे. ईडीएम संगीताच्या तालावर पूर्ण रात्र नाचण्याची ऊर्जा मिळवण्यासाठी हे ड्रग्ज घेतले जातात.

उत्तर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर हिप्पींनी सुरू केलेल्या ’रेव्ह’ पार्ट्यांची जागा आता ईडीएमने घेतली आहे, ज्याला ’गोवा ट्रान्स’ म्हणून ओळखले जाते. पूर्वी या पार्ट्यांसाठी परदेशी नागरिक गर्दी करायचे, पण गेल्या दशकापासून नवश्रीमंत भारतीय, विशेषतः तरुण आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

’इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’मधील एका शोधनिबंधानुसार, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे भारतात अचानक ‘नवश्रीमंतांची’ एक पिढी तयार झाली आहे. कामाचा प्रचंड ताण आणि वेगवान जीवनशैलीमुळे येणारा सामाजिक एकटेपणा यातून तात्पुरती सुटका मिळवण्याच्या गरजेतून हे तरुण अशा मार्गांकडे वळतात. हेच आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या मृत्यूंचे कारण आहे. आयोजक अशा कार्यक्रमांमध्ये ’एक्स्टसी’ सहज उपलब्ध करून देतात.

कानठळ्या बसवणाऱ्या संगीताच्या तालावर जराही न थांबता रात्रभर थिरकण्यासाठी हे ड्रग्ज वापरले जातात. कडक एनडीपीएस कायदा असूनही, अंमलबजावणी यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे किंवा आयोजकांशी ‘मेतकूट’ करून स्वत:ची तुंबडी भरण्यात दंग आहे. या व्यवसायात गर्भश्रीमंत सामील आहेत. अलीकडची ’बिर्च बाय रोमिओ लेन’ची शोकांतिका याचेच उदाहरण आहे. मी असेही वाचले आहे की, कोकेन आणि केटामाइनचे मिश्रण असलेले ’कॅल्विन क्लेन’ हे ड्रग्ज गोव्यातच तयार केले जाते!

अशा संगीत महोत्सवांचे मुख्य आकर्षण ’सायकेडेलिक ट्रान्स’ असते. वेगवान तालावर नाचण्यासाठी ‘एमडीएमए’ आणि ‘एक्स्टसी’सारख्या उत्तेजकांचे सेवन केले जाते. या विरोधात लढताना आणि वैद्यकीय सुरक्षा पुरवताना अमेरिकेच्याही नाकी नऊ आले होते. वाढत्या मृत्यूंमुळे तिथे २००३साली ’रेव्ह ऍक्ट’ लागू झाला. ज्यामध्ये बेकायदेशीर ड्रग्जला परवानगी देणाऱ्या जागामालकांवर २,५०,००० डॉलर्स किंवा नफ्याच्या दुप्पट दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली.

युनायटेड किंगडममध्ये १९९३च्या एका वादग्रस्त संगीत महोत्सवानंतर १९९४साली कायदा करून आवर्तनामध्ये (पुन्हा पुन्हा) वाजत राहणाऱ्या संगीतलहरींवर बंदी घालण्यात आली होती. जरी अशा कायद्यांमुळे संगीत उद्योगावर गदा येत असल्याचे सांगून निदर्शने झाली, तरी तिथली सरकारे आपल्या शिस्त आणि कायदा-सुव्यवस्था यावर ठाम राहिली.

अगदी पाश्‍चिमात्त्य देशांतही, कडक कायदे लागू झाले आणि बेकायदेशीर पार्ट्या पूर्णपणे बंद झाल्या, असे झाले नाही. पण त्यांच्या आयोजनावर त्या देशांनी बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे, त्या मर्यादित झाल्या आहेत. आता अनेक ठिकाणी अशा पार्ट्या परवाना असलेल्या ठिकाणीच होतात, त्यातून सरकारला महसूल मिळतो, शिवाय वेळेचे आणि आवाजाचे नियम पाळले जातात. भेसळयुक्त ड्रग्जमुळे होणारे मृत्यू टाळता यावेत यासाठी अलीकडेच ब्रिटनमध्ये ड्रग्ज तपासणीचे परवाने दिले जात आहेत.

नृत्य करणे ही मानवी उपजत प्रवृत्ती आहे आणि पर्यटन उद्योगात संगीत व नृत्याला महत्त्वाचे स्थान आहे. परंतु, त्यामुळे तरुण-तरुणींचे जीव जाणे योग्य नाही. जर अमेरिका आणि ब्रिटनसारखे देश कडक पावले उचलू शकतात, तर आपण ते सहज करू शकतो. पण, दुर्दैवाने आपण खूपच मागे पडलो आहोत. आपल्याकडे ‘बार अँड रेस्टॉरंट्स’चा वापर ‘नाइटक्लब’ म्हणून केला जातो आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संगीत महोत्सवांना प्रोत्साहन दिले जाते.

यावर नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे. ‘ड्रग्ज आणि मृत्यूचे नंदनवन’ ही गोव्याची झालेली ओळख आम्हांला चालणार नाही. आम्ही ती खपवून घेणार नाही. का खपवून घ्यावी? सरकारला यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आणखी किती बळी गेलेले हवे आहेत? एकदा तेवढी संख्या सांगून टाका, मग लेख खरडण्यासाठी डोकेफोड करण्याचे आमचे तरी त्रास वाचतील!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराईच्या व्रतासाठी वाळपईत बाजार, धोंड तळावर साफसफाई; मंडप उभारण्याचेही काम सुरू

गोव्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश! 23 लाखांचं साहित्य जप्त; लोन एजंट बनून अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या 7 भामट्यांना अटक

Surya Gochar 2026: ग्रहांच्या राजाचा मेष राशीत महाप्रवेश! 'या' 6 राशींसाठी सूर्य ठरणार भाग्याचा निर्माता; संपत्तीत होणार मोठी वाढ

सर्वण येथील नैसर्गिक 'झर' नामशेष होण्याच्या मार्गावर, प्रवाह मंदावला; स्थानिक पंचायत व अन्य यंत्रणांनीही दुर्लक्ष केल्याने नाराजी

VIDEO: “एका XXसाठी 7,000 रूपये” पर्यटनाच्या नावाखाली गोव्यात देहविक्रीचा बाजार? रशियन तरुणीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT