Verna Cricket Ground Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

अग्रलेख: धारगळ की वन म्हावळिंगे? भिजत घोंगडे; वेर्ण्यात उभारलेले सुसज्ज क्रिकेट मैदान

Verna Cricket Ground: राजकारण घुसले की क्रीडा क्षेत्राचा खेळखंडोबा होतो, यादवी माजते. पण यादवांसारखे समर्पित व्यक्तिमत्त्व उभे ठाकते तेव्हा क्रिकेटचे अद्ययावत मैदान उभे राहते.

गोमन्तक डिजिटल टीम

समाजोपयोगी कार्याच्या निमित्ताने मुरगावात लोकाभिमुख ठरलेले कमलाप्रसाद यादव हे नाव वेर्णा येथे साकारलेल्या अद्ययावत क्रिकेट मैदानाच्या उद्घाटनानंतर गोव्यासह लगतच्या राज्यांत सध्या चर्चेत आहे. क्रिकेटला ग्लॅमर आहे, त्यात पैसा आहे. त्याचमुळे असावे फुटबॉलवेड्या गोव्यात क्रिकेटची क्रेझ वाढते आहे.

फातोर्डा स्टेडियम क्रिकेटसाठी ‘अनफिट’ ठरल्यानंतर राज्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना रसिक मुकले आहेत. गेली तेरा वर्षे गोवा क्रिकेट असोसिएशनच्या तख्तावर सरकार समर्थक बसले; पण, सुसज्ज क्रिकेट स्टेडियमच्या गर्जना करण्याशिवाय हाती काही लागले नाही.

इच्छाशक्ती असल्यास मार्ग सापडतो हे कमलाप्रसाद यादव यांनी वेर्णा येथे ५ हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टँडसह मैदान उभारून जीसीएला दाखवून दिले आहे. तशी इच्छाशक्ती दयानंद नार्वेकरांकडे होती. त्यामुळेच पर्वरीतील मैदान बनले, जेथे रणजी सामने होतात. नार्वेकरांना बाजूला केल्यानंतर ती दृष्टी लोपली.

गोवा क्रिकेट असोसिएशनने धारगळ येथे लीजवर स्टेडियमसाठी जमीन घेतली, प्रत्यक्षात तेथे एक वीटही उभारली गेली नाही. मध्यंतरी वन म्हावळिंगेत जीसीएने जमीन खरेदी केली. तद्नंतर धारगळ की वन म्हावळिंगे, ह्याच मुद्यावर चर्चा अनिर्णित राहिली आहे. त्यामागे कुणाचे छुपे हेतूही असू शकतील. परंतु उभारणीऐवजी नुकसान उदयोन्मुख खेळाडूंचे आहे. गोव्यात उत्तम प्रतिभा आहे; परंतु ती गुणवत्तेत परावर्तित का होत नाही, ह्याचा विचार जीसीएने कधी केलेला नाही.

झगमगाट, खर्च केल्याने गुणात्मक उंची गाठता येत नाही. धारगळमध्ये आवश्यक परवाने घेण्यात आलेत. म्हावळिंगेत शून्यापासून सुरुवात असेल. स्टेडियम ही गरज आहे, परंतु क्रिकेटच्या ‘इकोसिस्टम’मधील ती प्राथमिक अवस्था आहे. योग्य नियोजन व उपयोग न झाल्यास स्टेडियम पांढरा हत्ती ठरतो. गोव्यात क्रिकेट खेळले जात असले तरी संस्कृती रुजलेली नाही, हे सत्य स्वीकारले जाईल, तेव्हा प्रगतीच्या दिशेने पावले पडतील.

त्यासाठी मेहनत व नि:स्वार्थ भावना हवी. निरंजन शहासारख्या धुरीणाने सौराष्ट्र क्रिकेटला दाखवलेले सुवर्णदिनू आदर्शवत आहेत. चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, जयदेव उनाडकटसारखे खेळाडू घडले ते निरंजन दूरदृष्टीमुळे. गोव्यात पावसाळा अधिक. जिथे पाऊस जास्त तेथे वर्षभर इनडोअर सराव सुरू असतो. खेळाडू घडविण्यासाठी लहान वयात त्यांना हेरून सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

वयोगटनिहाय सामने सातत्याने व्हायला हवेत. क्रिकेट स्टेडियम, साधनसुविधा, प्रशिक्षक त्यासाठी महत्त्वाचे ठरतात. कमलाप्रसाद यांनी खासगी तत्त्वावर साकारलेले मैदान कौतुकास्पद आहेच, त्याला अकादमीची जोड लाभून साधनांचा कसा वापर होतो, यावर यश अवलंबून आहे. कमलाप्रसाद यांची दोन्ही मुले क्रिकेटमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करतात. ‘बाळकडू’चे महत्त्व यादव यांना कळले.

गोवा क्रिकेटची धुरा पुन्हा चेतन देसाई-बाळू फडके समर्थकांकडे आली आहे. मुख्यमंत्री समर्थक रोहन गावस देसाई स्पर्धेतून ‘बाद’ झाले असले तरी जीसीए पदाधिकाऱ्यांना सरकारच्या वळचणीला जावेच लागते आणि झालेही तसेच. ह्या युतीचा सकारात्मक वापर व्हावा. गोव्यात नवे स्टेडियम साकारायचे झाल्यास सोबत जिम्नेशियमसह इतर सुविधांनी युक्त मैदानेही उभारण्याचे प्रयोजन करावे. एक व्यक्ती जे करू शकते ते सरकार सुसज्ज यंत्रणा हाताशी असूनही करू शकत नाही, यातच सारे आले. राजकारण घुसले की क्रीडा क्षेत्राचा खेळखंडोबा होतो, यादवी माजते. पण यादवांसारखे समर्पित व्यक्तिमत्त्व उभे ठाकते तेव्हा क्रिकेटचे अद्ययावत मैदान उभे राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Captaincy: "आम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यायचीय", रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढलं? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

Goa Politics: "हे दोघेही गोव्याच्या लोकांना मूर्ख बनवतायत", अरविंद केजरीवालांचा पाटकर- CM सावंतांवर हल्लाबोल

रश्मीका-विजयने गुपचूप उरकला साखरपूडा; दोन महिन्यात होणार 'शुभमंगल सावधान'!

Rishabh Pant: 100 कोटींचा 'मालक'! दिल्लीत 2 कोटींचे आलिशान घर, 4 शहरांत प्रॉपर्टी... ऋषभ पंतची Net Worth ऐकून चक्रावून जाल

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

SCROLL FOR NEXT