Goa Rakhan Yatra 27 days journey Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Congress Rakhan Yatra: काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून काय साध्य झाले? 27 दिवसांच्या प्रवासानंतरही अनुत्तरित प्रश्न कायम

Goa Congress Rakhan Yatra Analysis: आज राज्यात भाजपबाबत सकारात्मक वातावरण आहे, असे कुणीच म्हणणार नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

मिलिंद म्हाडगुत

Goa Political News: आज राज्यात भाजपबाबत सकारात्मक वातावरण आहे, असे कुणीच म्हणणार नाही. पण म्हणून हे वातावरण काँग्रेसला पूरक वा पोषक आहे, असे म्हणणेही अतिशयोक्तीचे ठरू शकेल. आणि पूरक वातावरण निर्माण करण्यात ही ‘राखण यात्रा’ यशस्वी ठरली, असेही वाटले नाही.

गेले २७ दिवस सुरू असलेल्या काँग्रेसच्या राखण यात्रेची रविवार,१८ रोजी सांगता झाली. यात्रा समाप्त झाली खरी, पण या यात्रेने काय साध्य केले हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला. मुळात अशा प्रकारच्या यात्रा काढून गोव्याचे किंबहुना कोणत्याही राज्याचे रक्षण होते का, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. या यात्रेत सत्ताधारी भाजपवर अनेक आरोप करण्यात आले. पण हे आरोप करताना त्याच्या मुळाशी जाणे पक्षाने टाळले. किंबहुना हे आरोप गांभीर्याने केले आहेत, असे वाटलेच नाही. म्हणूनच तो हवेत तीर मारण्याचा प्रकार वाटला.

आज राज्यात भाजपबाबत सकारात्मक वातावरण आहे, असे कुणीच म्हणणार नाही. पण म्हणून हे वातावरण काँग्रेसला पूरक वा पोषक आहे, असे म्हणणेही अतिशयोक्तीचे ठरू शकेल. आणि पूरक वातावरण निर्माण करण्यात ही राखण यात्रा यशस्वी ठरली, असेही वाटले नाही. या यात्रेच्या समारोपाला लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पाचारण करण्यात आले. पण त्यांनीही अपेक्षाभंग केला.

मूळ मुद्द्यांना हात घालण्याऐवजी ते रिंगणाभोवतीच फिरत राहिले. आगामी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असणार, धोरणे काय असतील यावर ते एकही शब्द बोलले नाहीत. भाजपला वाईट म्हणताना सत्ता मिळाली तर या वाईट पणाचा आपण कसा अंत करू शकतो, हे त्यांनी सांगायला हवे होते. त्यांनीच नव्हे तर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने या यात्रेत तसे प्रयत्न केलेले दिसले नाहीत.

काँग्रेसला मत देणे म्हणजे भाजपलाच मदत करणे, असे सध्या गोमंतकीय जनतेचे मत व्हायला लागले आहे. आणि त्यात चूक आहे, असे कुणीच म्हणणार नाही. आज जे भाजपचे मंत्री आहेत, त्यातले बहुतेक मंत्री हे काँग्रेसमधून आयात केलेले आहेत. २०१७ साली लोकांनी काँग्रेसचे १७आमदार निवडून दिले होते. शेवटी राहिले होते फक्त तीन आमदार. २०२२ सालीही तसेच झाले.

निवडून आलेल्या ११ आमदारापैकी ८ आमदार भाजपमध्ये गेल्यामुळे आता शिल्लक आहेत, फक्त तीन. अशा परिस्थितीत २०२७ साली असे होणार नाही, याची कोण खात्री देऊ शकेल का? खरंतर काँग्रेस पक्षाने या यात्रेत आमदारांच्या गद्दारी बद्दल जनतेची जाहीर क्षमा मागायला हवी होती. पण क्षमा मागण्याऐवजी ते फुटीर आमदारांना दूषणे देण्यातच मश्‍गुल होते. पण खरं सांगायचं तर काँग्रेस पक्षाकरता ही एक प्रथा होऊ लागली आहे. त्यामुळे एखाद-दुसऱ्याला दूषणे देऊन काहीही साध्य होणार नाही. २००७ साली बहुजन समाजाचे नेते रवी नाईक यांना डावलून दिगंबर कामत यांना मुख्यमंत्री करणे ही काँग्रेसची घोडचूक होती आणि त्याचेच फळ काँग्रेस सध्या भोगतो आहे, असे जे परवा भंडारी समाजाचा एक नेता बोलला तेही विधान अंतर्मुख करायला लावणारे आहे.

पण म्हणून या वा अशा अनेक चुकांतून काँग्रेसने काही बोध घेतला आहे, असेही नाही. इनामदारी गेली पण मिशांना तूप लावण्याचे काही गेले नाही तशातला हा प्रकार. आणि ही राखणयात्रा हे याचे ज्वलंत उदाहरण. या यात्रेत बरेच बिगरगोमंतकीयही होते, हेही नाकारता येत नाही. आणि विशेष म्हणजे या लोकांना ‘राखण यात्रा’ म्हणजे काय, या यात्रेचा हेतू काय हेही माहीत नव्हते. आता याकरता काँग्रेस काही माध्यमांना दोष देताना दिसत आहे. पण अशा लोकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया बरेच काही सांगून गेल्या.

म्हणूनच काँग्रेसने आधी आपल्या पायाखाली काय जळते हे बघायला हवे. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असे करता कामा नये. आज काँग्रेसजवळ पेडणेपासून काणकोणपर्यंतच्या जनमानसात स्थान असलेला असा एकही नेता नाही ही वस्तुस्थिती आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर काही नेते उमेदवारी मिळवण्याकरता काँग्रेसमध्ये येतीलही. पण यातले निवडून आले तर किती टिकतील, हे काँग्रेस सांगू शकेल का? हे पाहता या राखण यात्रेने उत्तर नसलेले अनेक प्रश्न उभे करून ठेवले आहेत. यातून काँग्रेस समोर वैऱ्याची मोठी रात्र उभी असल्याचे प्रतीत होऊ लागले आहे. आता येणाऱ्या दोन तीन महिन्यांत पक्ष यातून कसा मार्ग काढतो, हे बघावे लागेल. आणि योग्य मार्ग काढला नाही तर मात्र पक्षाची स्थिती ‘नळे फुंकीले सोनारे इकडून तिकडे गेले वारे’ अशी झाल्याशिवाय राहणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: कसवणकर-सुयशची मेहनत वाया; गोव्याला उत्तर प्रदेशने 68 धावांनी हरविले, पराभवाची मालिका कायम

Cancer: एआयचा नवा चमत्कार! आता चेहरा सांगणार कॅन्सर रुग्णाचे भविष्य, नव्या संशोधनाने खळबळ; 40,000,000 अधिक फोटोंचा अभ्यास

Betoda Nirankal Pollution: निरंकालच्या नागरिकांना दिलासा? औद्योगिक दुर्गंधीत घट, सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले

Panaji Theft Case: पणजीत चोरट्यांचा धुमाकूळ! पार्क केलेल्या कारची काच फोडून 'इतक्या' हजारांच्या रोकडसह PMLA खटल्यांचे पुरावे लंपास

Electric Scooter Fire Betim: चार्जिंगला लावलेली ईव्ही दुचाकी अचानक पेटली; कार आणि बुलेटचेही लाखोंचे नुकसान!

SCROLL FOR NEXT