Siddhanath Parvat Goa Stream Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Opinion: झऱ्यांची व्यवस्था नीट राखली नाही तर श्रावणबाळासह आपल्याला ‘पाणी पाणी’ म्हणत प्राण सोडावे लागतील..

Siddhanath Parvat Goa: श्रावण मेल्याने त्याचे आईबाप ‘पाणी पाणी’ म्हणत जीव सोडतात. भूतलावर प्रत्येकाला जगण्यासाठी पाण्याची गरज आहे म्हणून निसर्गाने पावलोपावली पाण्याची व्यवस्था निर्माण केली आहे.

Sameer Panditrao

तळावलीचा प्रवास संपवून मी वाडीच्या रस्त्याने खालच्या भागातील जुवारीच्या काठावरील पडीक शेती आणि त्या खालच्या भागातील कांदळवनाची हिरवळ पाहत जात होतो. अडुळशे बोरी गावची सीमा ओलांडून बा. भ. बोरकरांच्या घराकडील भागातून मुख्य रस्त्याने सिद्धनाथ पर्वताच्या दिशेने ओहोळाच्या उगमाकडे जाताना मला बोरीच्या ओहोळाने आपले दर्शन दिले.

पुढे नवदुर्गा देवळाकडील भला मोठा तलाव आणि त्यात फुललेली कमळे नजरेस पडली. कवी कुलगुरू कालिदासाच्या निसर्गकाव्यावर आधारित बाकीबाब बोरकरांनी रचलेल्या कवितांचे शब्द खळाळून वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजातून तालासुरांच्या संगीताने नवदुर्गा देवीला आळवीत असल्याचा भास झाला. फोंडा तालुक्याने बोरी गावाला निसर्गरम्य हिरव्यागार उंच डोंगराचे वरदान दिले आहे.

त्या डोंगरावरून वाहणाऱ्या ओहोळाचा उगम पाहिला म्हणजे भगीरथाने हिमालयातून खाली आणलेल्या पवित्र गंगेची आठवण होते आणि मैदानी भागातील नवदुर्गा देवळाकडील तलाव बघून पाण्यासाठी श्रावण बाळाची आईबाबांवरील भक्ती डोळ्यांसमोर उभी राहते. तो आपल्या माता पित्याला घेऊन काशीला जाताना तहान लागली म्हणून पाणी आणण्यासाठी तलावावर जातो, आणि दशरथ राजाच्या ध्वनिवेधक बाणाला बळी पडतो. श्रावण मेल्याने त्याचे आईबाप ‘पाणी पाणी’ म्हणत जीव सोडतात.

भूतलावर प्रत्येकाला जगण्यासाठी पाण्याची गरज आहे म्हणून निसर्गाने पावलोपावली पाण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. आपण ही ओहोळांची, झऱ्यांची नैसर्गिक व्यवस्था नीट राखली नाही, तर आपल्या श्रावणबाळासह आपल्याला ‘पाणी पाणी’ म्हणत प्राण सोडावे लागतील. आपल्या पूर्वजांनी पाण्याचे महत्त्व ओळखले होते. घराशेजारी विहीर, भाटां-कुळागरांत एखादी झर अगर तळी निर्माण करून त्यांनी पाणी सांभाळले. आपली वनराई, बाग, अगर शेती फुलवली. आज बोरी गावच्या सिद्धनाथ पर्वतास पाहिल्यास पूर्वजांचे विचार भविष्याची दिशा दाखवतात.

गोव्यात सर्वांत उंच सिद्धनाथ डोंगर, दुसरा सावईवेरेचा खेतको डोंगर, आणि तिसऱ्या स्थानी केपे पारोडेचा चंद्रनाथ डोंगर. सिद्धनाथ डोंगराच्या पायथ्याकडील वर्तुळात बोरी, शिरोडा, कोनशे, निरंकाल, आणि बेतोडा गावे वसली आहे, त्या गावातून वाहणाऱ्या ओहोळाचा उगम सिद्धनाथ पर्वतावरील घनदाट जंगलातील विशाल वनराईत झाला आहे. वेगवेगळे वृक्ष, वनऔषधी वेली, झुडपे त्या डोंगराच्या कुशीत वाढत आहे.

सिद्धनाथ पर्वताच्या कुशीतून वाहणाऱ्या ओहोळांचे पाणी पिण्यास येणारे बिबटे, कोल्हे, ससे, डुक्कर, मेरू, अस्वले, रानमांजर, गवे, त्या जंगल परिसरात दिवसरात्र हिंडत असतात. सिद्धनाथ पर्वताच्या शिखरावरील महादेव मंदिर परिसरातून चौफेर नजर फिरविल्यास जुवारीचे पात्र, फोंडा शहर आणि इतर परिसराचे दर्शन घडते. हिमालयातील उंच शिखरावर ज्याप्रमाणे ध्यानस्थ शिवशंकर बसलेला आहे, त्याचप्रमाणे बोरी गावच्या शिखरावर आमच्या पूर्वजांनी सिद्धनाथाची स्थापना करून त्याच्या चरणाकडून वाहणाऱ्या पाण्याचे पावित्र्य राखले.

उतारावरील टप्प्याटप्प्यावर नैसर्गिक बंधारे उभारून पाणी अडवले. हे पाणी वळवून पाटाने लांब नेऊन परशुरामाच्या संदेशाचे पालन करीत सुपारी, माड, आंबा, फणस, काजू, मिरी, कोकम, जायफळ, जाम, बिंबल, करमळ, ओटम, मावळींग, तोरिंग, केळी अशा प्रकारच्या फळफळावळीची कुळागरे निर्माण केली. माणूस आणि जैवविविधतेला प्राणवायू आणि सावली देण्याचे महान कार्य करणारी वृक्षसंपदा टिकवण्याचे कष्टप्रद काम आमच्या पूर्वजांनी केले. बोरी गावात कष्टकरी कुटुंबात बुद्धिचातुर्याने सरस्वतीची सेवा करणारेही जन्मास आले.

त्या सांबसदाशिवाच्या आत्म्यातून बाहेर पडणारी गंगा जणू सिद्धनाथ पर्वतावरून झऱ्याच्या रूपाने वाहते हे चित्र त्यांनी अंतरंगात साठवले. हे चित्र शब्दस्वरांचा साज चढवून वसुंधरेच्या सौंदर्याचे गुणगान करू लागले. सिद्धनाथ आणि नवदुर्गेला रसाळ सुमधुर भक्ती अर्पण करणाऱ्या बाकीबाब बोरकरांचा जन्म बोरी गावातच झाला. इथले डोंगर, कुळागरे, शेती, बागायती, पाणी, तलाव, ओहळ नदी, कांदळवन, कष्टकरी, पाळीव जनावरे, पशू, पक्षी या साऱ्यांच्या कौतुकाचे वर्णन त्यांनी वसुंधरेला कवितेतून सजवताना केले आहे.

सिद्धनाथ पर्वतावरून वाहणारा ओहळ मैदानी भागात एकच असल्याचे दिसत असले तरी तो अनेक लहान लहान ओहोळांनी मिळून बनला आहे. बोरीच्या ओहोळाचा उगम सिद्धनाथ देऊळ परिसरात भूतल, जंगल भागात होतो. तिथून तो खाली अन्ना आमलेकडून तन्ना आमली परिसराला पाणी देत उड्डागाळ भागात पोहोचतो. त्या ठिकाणी त्याला ओटी डोंगरावरून येणारा ओहळ मिळतो. तो ओहळ आफ्रामेंत कुळागराला पाणी देतो.

पुढे मुख्य ओहळ प्रवास करीत खालच्या भागात वयले तळ्याकडे पोहोचतो. त्या परिसरात त्याला भस्मा डोंगराकडून वाहणारा ओहळ मिळतो. तो आपल्या प्रवासात देवाच्या तळाकडील सिद्धनाथ कुळागराला पाणी देत मुख्य ओहोळास मिळतो. त्याच परिसरात मुख्य ओहोळास मड्यानी उगम पावलेला आणि सावरभाट भागात उगम पावलेला झऱ्याच्या रूपातील ओहळ असे दोन ओहळ खालच्या भागात वरच्या तळ्याकडे मुख्य ओहोळास मिळतात.

तळे परिसरात ओहोळाच्या पात्रात नैसर्गिक बंधारा घालून आमचे पूर्वज शेती लागवड करीत होते. तन्न्याकडून मुख्य ओहळ प्रवाहाने तळसाय परिसरात पोहोचतो. त्या परिसरात त्याला वाटंगगाळ परिसरात उगम पावलेला ओहळ तिथल्या परिसराला सिंचन करीत खाली तळसाय या ठिकाणी मिळतो. पुढे मुख्य ओहोळास कुडयाळ भागात उगम पावलेला ओहळ मिळतो. त्या खालच्या प्रवासात अन्य एक ओहळ सुर्मुशीकडून कलमामळ परिसरात मुख्य ओहोळात सामील होतो आणि मुख्य ओहळ मैदानी भागातील देवीच्या तळ्याकडे पोहोचतो.

नवदुर्गा देवीच्या तळ्याचे पाणी खालच्या शेतीस वापरत होते. वरील ओहोळाशिवाय वागशी ओहळ, चिचे ओहळ, शेणवी ओहळ, गाळी रुमणे ओहळ हे चार लहान आकाराचे ओहळ मुख्य ओहोळास मिळून मुख्य ओहोळाचा प्रवाह मोठा होतो. पुढे तो उशे शेतीला पाणी देऊन खाली पेडाकडे परिसरात मुख्य रस्ता ओलांडून मठ्यान पोहोचतो.

त्या परिसरात कारकीतळीकडे उगम पावलेला ओहळ पाणीवाडा परिसरातील कुळागर, बागायतीला सिंचन करीत खाली येत गणपती देवळाकडे मुख्य ओहोळास येऊन मिळतो. मुख्य ओहोळाच्या पुढील प्रवासात त्याच्या पात्रात नैसर्गिक बंधारा घालून अवाढव्य बोर खाजनास पूर्वज पाणी वापरत होते. शेतातून प्रवास करीत मुख्य ओहळ तिथल्या शेतातील खळीमधून खाऱ्या पाण्यात सामील होत जुवारी नदीच्या किनाऱ्याकडील बांधावर उभारलेल्या मानशीच्या दारातून पाणी नदीत जाते.

आपले पूर्वज शेतात गोड चवीचे भात बियाणी पेरून ते पिकवून मळणी करून, उकडून वायनात कांडून तांदूळ बनवायचे. त्या तांदळाची भाकरी, भात, उकड्या तांदळाची पेज बनवून जेवायचे. बाईमाणसे शेतात जाऊन कुर्की झुडपाचे फूटभर लांब कोंब आणून त्यांची भाजी करून खात असत. नदी तटावर फुलणारी सफेद कांदळे आणून त्यांच्या माळा करून माळत असत. सुवासिक बकुळ फुले, सुरंग, केवडा माळून फुगडी, धालो, दिवज उत्सव साजरे होत असत. या सर्व गोष्टी आठवल्या म्हणजे ओहोळाच्या काठावर लिहिणाऱ्या बाकीबाबांची आठवण होते आणि नकळत त्यांच्या कवितेची सुंदर ओळ ओठावर खेळते.

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे

कड्या-कपाऱ्यांमधून घट ़फुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या-फणसाची रास

़फुली फळांचे पाझर फळी ़फुलांचे सुवास

माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी

पाना-़फुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी

माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविण ़फुले

भोळा भाबडा शालिन भाव शब्दाविण बोले

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात

वाढी आईच्या मायेने सोन-केवड्याचा हात!!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT