Goa Water Management Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

1106 च्या ताम्रपटात उल्लेख असलेला गंडगोपाळ तलाव, करमळीचे सुलभातीचे तळे; गोवापुरीच्या जलव्यवस्थापनाचा लौकिक पुन्हा गवसेल?

Goa Water Management: गोवापुरीचा हा लौकिक, गोवामुक्तीनंतर संवर्धन आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आत्मीयतेनं नियोजनबद्ध प्रयत्न झाले नाहीत आणि त्यामुळे त्यातला अधिकाधिक वारसा झपाट्याने विस्मृतीत गेलेला पाहायला मिळतो.

राजेंद्र केरकर

गोव्याची भूमी साक्षात देवभूमीच्या लौकिकास एकेकाळी पात्र झाली होती. त्याला इ्थल्या भूमिपुत्रांचे निसर्ग आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाचे भान रोखून जगत असलेले जीवन कारणीभूत होते.

पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टीचा कुशीत छोट्याछोट्या असंख्य नद्यांच्या कुशीत पहुडलेल्या या भूमीत राहणाऱ्या कष्टकऱ्यांनी वृक्षवेली, दगडधोंडे, नदीनाले यांच्यात देवत्वाचा अंश अनुभवत असताना पर्यावरणीय संस्कृतीवर आपले जीवन समृद्ध केले होते. युरोपातल्या पोर्तुगाल या गरीब देशातून महासागर ओलांडून आलेल्या दर्यावदी पोर्तुगिजांचे पाय गोव्याला लागण्यापूर्वी ही भूमी आर्थिकदृष्ट्या संपन्न होती.

अकराव्या शतकात त्या काळची तिसवाडीतल्या जुवारी नदीच्या किनारी वसलेली गोवापुरी, कदंबांनी स्थापना केलेली गोवापुरी हे राजधानीचे शहर भरभराटीला पोहोचले होते.

शिवचित्त पेरमाडी देवाच्या कर्नाटकातल्या देगाव येथे सापडलेल्या दानपत्रात म्हटलेले आहे की, जयकेशीच्या काळात गोवापुरीच्या(गोवा वेल्हा) रस्त्यांवरून पंडितांच्या पालख्यांची गर्दी व्हायची.

या पालख्यांच्या दांड्यांना जवाहर जडवले होते आणि त्यात बसलेल्या पंडिताच्या कानातले डूल पालखीला बसलेल्या हेलकाव्यांबरोबर हालत असत. दुसऱ्या षष्ठदेवाच्या ताम्रपटात, गोवापुरीतले रस्ते गर्दीने नेहमी फुललेले असत.

सुंदर उद्याने व उपवने, मोठमोठे वाडे, शीतल तलाव, गजबजलेले बाजार, घोड्यांचे तबेले आणि सुंदर गणिकांची वस्ती यांनी गोवापुरीचे सौंदर्य वृद्धिंगत झाले होते. आणखी एका ऐतिहासिक पुराव्यानुसार गोवापुरी इंद्राच्या स्वर्गनगरीपेक्षाही अधिक सुखसंपन्न असल्याचे उल्लेख आढळतात.

गोवापुरी या शहरात उन्हाळ्यात पाणी आटल्यावर गंडगोपाळ तलावाच्या पाण्याचा वापर होत असावा. ११२५च्या एका शिलालेखात बोमीसेट्टीला (महासामंत बोमदेवाला) एका तलावाच्या डागडुजीसाठी काही जमीन दान दिल्याचा जो उल्लेख आढळतो तो गुहल्लदेवाने केलेल्या दानाबाबत आहे.

११०६च्या आणखी एका ताम्रपटात गुहल्लदेवाच्या सेवेतील केलिवमनि गोपकपट्टण शहरात गंडगोपाळ ललाव बांधल्याचा उल्लेख आहे. या साऱ्या संदर्भावरून गोवा कदंब राजवटीतल्या राज्यकर्त्यांनी इये परंपरागत असलेल्या तलावाद्वारे पाण्याचे संवर्धन आणि विनियोग करण्याला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते.

करमळी रेलवेस्थानकाहून नेवराहून पिलार जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला सुलाभाटीचा तलाव आहे. २०१०साली जेव्हा जलसंसाधन खात्याने या तलावाचे सुशोभीकरण करण्याचे काम आरंभले तेव्हा चिखलात पुरलेली चामुंडा देवीची सुंदर पाषाणी मूर्ती आढळली होली होती.

१२५५च्या एका दानपत्रात गोवा कदंब राजा षष्ठदेव (तृतीय) याच्या कारकिर्दीत सुलाभाटीचा ’सुलीभाट्टी’ असा उल्लेख आढळतो. त्याकाळी येथे अस्तित्वात असलेल्या राजबिदीचा उपयोग करून व्यापारी गोवापुरी जात असायचे.

या सुलाभाटीच्या तलावाच्या परिसरात चिनी मातीच्या भांड्यांचे तुकडे त्याचप्रमाणे शिवलिंग, गणपती, शिवपार्वती, सर्पाकृती आदी पाषाणी मूर्ती आढळलेल्या आहेत. या तलावाच्या परिसरात सुमारे डझनभर मूळ आफ्रिकेतल्या बाओबाब म्हणजे गोरखचिंचेचे जुने वृक्ष उभे होते. आज तेथे त्यातले काही मोजके बाओबाब वृक्ष तेथे पाहायला मिळतात.

बाओबाबचे हे वृक्ष जुन्या काळी आफ्रिकेसारख्या प्रदेशातून पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या गोव्यात आलेल्या प्रवासी किंवा यात्रेकरूंनी या वृक्षांची रोपे आणली असावीत. आज इथले बाओबाब वृक्ष आणि तत्सम पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार इथल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संचितांची प्रचिती येते.

गोवापुरीच्या विविध ठिकाणच्या भग्न मंदिरांच्या सान्निध्यात इथल्या भूमिपुत्रांनी आपल्या शेतीच्या सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून डोंगर टेकडीच्या पायथ्याशी सुलाभाटीच्या तलावाची निर्मिती केली असावी.

आज सुलाभाटीचा हा मानवनिर्मित तलाव, गेल्या काही वर्षांपासून सांडपाणी, केरकचरा, मलमूत्रविसर्जन आणि अन्य प्रकारच्या केरकचऱ्याला बेशिस्तपणे इथे टाकल्याने हा संजीवक तलाव संकटग्रस्त झालेला पाहायला मिळतो. एका बाजूला आगशीशी संलग्न असणाऱ्या सुलाभाटीचा आणि दुसऱ्या बाजूला सांतान भाटीत असणाऱ्या तलावांमुळे परिसरातल्या लोकांना पेयजल आणि सिंचनाच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले नव्हते.

गोव्यात प्राचीनकाळी राजकर्त्यांनी जेथे राजधानी आणि अन्य कारणांसाठी नगरे स्थापन केली तेथे बारमाही पाण्याची उपलब्धता होईल याचा गांभीर्याने विचार केला होता. त्यामुळेच जुवारी नदीच्या काठावरती उभी असलेली गोवापुरी देश विदेशातल्या प्रवासी आणि यात्रेकरू यांच्यासाठी सातत्याने आकर्षण बिंदू ठरले होते .

जलसिंचनाची सुविधा पारंपरिक तंत्रज्ञानाद्वारे त्या काळी उपलब्ध झाल्याने भाताचे दाणेगोटे, फळफळावळ, भाजीपाला यांचा अभावानेच तुटवडा भासायचा . पेयजल आणि जलसिंचन यांची उपलब्धता असल्याकारणाने गोवापुरी राजधानी शहराचा लौकिक वृद्धिंगत व्हायचा , त्याला व्यापार, उद्योगधंदा यांना चालना देण्यासाठी केलेले प्रयत्न सफल ठरले होते.

गोवापुरीच्या लौकिकाला भाळून इथे उद्योग, व्यवसायानिमित्त शेजारच्या राज्यांतून आलेले लोक, त्याचमुळे स्थायिक झाले होते. परंतु कालांतराने मूर्तिभंजक आक्रमणकर्त्यांच्या झंझावातात इथल्या लोकांना मोठ्या प्रमाणात विध्वंसाला सामोरे जाण्याची पाळी आली. त्याचमुळे आजही गतकालीन पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक संचितांचे असंख्य तुकडे त्याचप्रमाणे भग्नावशेष विखुरलेले पाहायला मिळतात.

जुवारी नदीला समांतर असणारे जुन्या काळच्या चिरेबंदी बांधकामाचे जीर्णावशेष त्याचप्रमाणे जेथे शतकोत्तर वर्षांच्या इतिहासाची स्मृती जागवणारे मूर्तींचे जीर्णावशेष बेशिस्तीत विखुरलेले पाहायला मिळतात. गोवापुरीचा हा लौकिक, गोवामुक्तीनंतर संवर्धन आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आत्मीयतेनं नियोजनबद्ध प्रयत्न झाले नाहीत आणि त्यामुळे त्यातला अधिकाधिक वारसा झपाट्याने विस्मृतीत गेलेला पाहायला मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

SCROLL FOR NEXT