राजेंद्र पां. केरकर
आगलोटच्या जंगलात वाघाचा मृत्यू होऊन, एका महिन्याचा काळ लोटलेला असताना त्याची खबर व्याघ्र गणनेच्या कार्यात व्यग्र असणाऱ्या वन खात्याच्या वन्यजीव विभागाला न लागणे, यातूनच गोव्यातल्या वन्यजीव विभागाचा कारभार किती बेभरवशांचा झालेला आहे, त्याची प्रचिती येते.
आज वैश्विक व्याघ्र दिन. २०१० पासून हा दिवस जगभरातील पट्टेरी वाघांच्या प्रतिकूल स्थितीला पोहचलेला नैसर्गिक अधिवासाचा प्रश्न आणि एकंदर दुर्बल होत चाललेले त्यांचे अस्तित्व या संदर्भात जागृती करण्याच्या दृष्टीने साजरा केला जात आहे. भारतात सध्या २०२६ च्या व्याघ्र गणनेच्या प्राथमिक अंदाजानुसार पट्टेरी वाघांची संख्या वाढलेली असली, तरी त्यांच्यासाठी सध्या उपलब्ध असलेला नैसर्गिक अधिवास अपुरा ठरत असल्याने, वाघ आणि मानव यांच्यातला संघर्ष विकोपाला गेल्याने, सध्या दोन्ही बाजूने निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती चर्चेचा गंभीर विषय बनलेली आहे.
गोव्यासारख्या राज्यात सध्या किती वाघ आहेत, यासंदर्भातील आकडेवारी व्याघ्र गणनेच्या प्राथमिक अंदाजानुसार उपलब्ध झालेली नसल्याने, त्याबाबत निश्चित संख्या सांगणे कठीण झालेली असली, तरी आजमितीस गोव्यातल्या सत्तरी, धारबांदोडा आणि सांगेच्या जंगलांत वाघांचे अस्तित्व मात्र वारंवार अधोरेखित झालेले आहे.
गोव्यात वाघांचे अस्तित्व सत्तरीत असल्याबाबत वारंवार बातम्या प्रकाशित होत असताना, वन खात्याने त्याच्याकडे कानाडोळा केल्याने, तृणहारी रानटी जनावरांच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात २००९ साली चक्क वाघ अडकून त्याच्या निघृणरित्या केरी सत्तरीत करण्यात आलेल्या शिकारीचा विषय देशभर चर्चेला आला. पण त्यासंदर्भात गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्यात वन खाते अपयशी ठरले.
त्याचाच जणूकाही गैरफायदा घेतल्याने २०१९ साली पुन्हा सत्तरीतील गोळावली येथे चार वाघांची विष घालून केलेल्या हत्येचा विषय पुन्हा उद्भवला. जहाल विष मृत पाळीव जनावरांच्या कलेवरांवर घातल्याने, त्या मांसाचे भक्षण केल्याने, एक वाघिण आणि तिचे दोन बछडे आणि एक निम्न प्रौढ वाघाचा मृत्यू उद्भवला या प्रकरणातल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वनाधिकाऱ्याला तडकाफडकी जबाबदारीतून मुक्त केल्याने, हे प्रकरण कोर्टासमोर आणण्यात वन खात्याला यश न आल्याने, ते अनुत्तरीत राहिलेले आहे.
२०२६ च्या व्याघ्र गणनेचे प्राथमिक स्तरावरती सर्वेक्षण चालू असताना, धारबांदोडा येथील आगलोटच्या खाजगी जंगलात झालेल्या वाघाचा मृत्यू प्रकाशात आला. साकोर्डा ग्राम पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आगलोट येथील मृत वाघाचे जे अवशेष प्राप्त झाले होते, ते पुढील चिकित्सेसाठी डेहराडून येथील वन्यजीव संस्थेकडे पाठविण्यात आल्याचे वन्यजीव विभागाने सांगितले.
परंतु या घटनेला दोन महिने लोटले असताना,अद्याप वन खात्यामार्फत कोणतीच ठोस माहिती देण्यात आलेली नाही, ही चिंताजनक बाब आहे. २००९ ते २०२६ पर्यंतच्या काळात गोव्यात सहा वाघांचा मृत्यू ही साक्षरतेचे देशात लक्षणीय प्रमाण असलेल्या राज्याच्या दृष्टीने लांछन ठरलेले आहे. आगलोटच्या जंगलात वाघाचा मृत्यू होऊन, महिना लोटलेला असताना त्याची खबर व्याघ्र गणनेत व्यग्र असणाऱ्या वन खात्याच्या वन्यजीव विभागाला न लागणे, यातूनच गोव्यातल्या वन्यजीव विभागाचा कारभार किती बेभरवशांचा झालेला आहे, त्याची प्रचिती येते.
उत्तर गोवा वन्यजीव विभागांतर्गत महावीर, म्हादई, बोंडला व चोडणचे पक्षी अभयारण्य, मोले राष्ट्रीय उद्यानाचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची गरज असताना, महत्वपूर्ण विभागाचा कारभार जणूकाही दुर्बल करण्यासाठीच की काय, वन खात्याने या विभागाची अतिरिक्त जबाबदारी उत्तर गोवा प्रादेशिक उपवनपालांकडे सोपवली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ५ वर्षांपासून सतत व्याघ्र संवर्धनासाठी ज्या दूरगामी सूचना केल्या आहेत.
त्यांकडे हेतुपुरस्पर दुर्लक्षाचा उपद्व्याप चाललेला आहे, ही चिंतेची बाब आहे. वन खात्याचा हा कारभार पट्टेरी वाघांच्या अस्तित्वाला मारक ठरल्यानेच, २००९ ते २०२६ याकाळात ६ वाघांची हत्या होऊनही गुन्हेगार उजळ माथ्याने फिरताहेत. गोळावलीत ४ वाघांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस येऊन, सहा वर्षे लोटलीत. परंतु या प्रकरणातील गुन्हेगारांवर कारवाईसाठी वन खात्याने, हे प्रकरण न्यायालयापुढे दाखल केलेले नाही. आगलोट येथे वाघाचा मृत्यू होऊन, दोन महिने लोटले असूनही, अहवाल प्रसिद्ध झालेला नाही, यातून वनखात्याच्या कारभाराची प्रचिती येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.