Shidam tree Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Germal tree Goa: काणकोण या कर्नाटकातल्या कारवार जिल्ह्याशी सीमा भिडणाऱ्या तालुक्याच्या मुख्यालयापासून जवळ श्रीस्थळ येथे श्रीदेव मल्लिकार्जुन हे ऐतिहासिक मंदिर स्थित आहे.

Sameer Panditrao

अ‍ॅड. सूरज मळीक

गोव्याच्या एका टोकाला वसलेल्या काणकोण या कर्नाटकातल्या कारवार जिल्ह्याशी सीमा भिडणाऱ्या तालुक्याच्या मुख्यालयापासून जवळ श्रीस्थळ येथे श्रीदेव मल्लिकार्जुन हे ऐतिहासिक मंदिर स्थित आहे. या मंदिराच्या केवळ २०० मीटर परिघात एक महाकाय वृक्ष वसलेला आहे. श्रावण, भाद्रपदात हा वृक्ष एका महाकाय छत्रीगत भासतो.

पर्जन्यवृष्टीचा होणारा मुसळधार मारा हा वृक्ष झेलत असतो. श्रीस्थळ येथील मल्लिकार्जुनाचे भाविक त्याच्या भक्तीकरिता या वृक्षाच्या सांनिध्यात राहतात. त्यांना या वृक्षातून शेकडो वर्षापूर्वी दिव्यत्वाची प्रचिती आली असावी. त्यामुळे हा वृक्ष नसून निसर्गातल्या चिरंतन परंतु अदृश्य रूपात वावरणाऱ्या शक्तीचे निवासस्थान असल्याची जाणीव आदिम समाजाला झाली असावी. त्यामुळे शिगमोत्सवाच्या आसपास मल्लिकार्जुन देवाची धार्मिक संचिते संचिते भाविकांच्या भेटीला जेव्हा जातात तेव्हा या वृक्षाखाली काही क्षण थांबून जर्माल वृक्षाविषयी आणि तेथे निवास करणाऱ्या शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

मल्लिकार्जुन देव हा काणकोणाचा अधिपती. त्यामुळे त्याच्या कृपासावलीत विसावलेल्या शेकडो कुटुंबीयांना हा वृक्ष ऊर्जेचा स्रोत बनलेला आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा भ्रमणध्वनी मनोरे उभारली नव्हते तेव्हा कृमी, कीटक, मधमाश्या यांसारख्या असंख्य कीटकांचे जगणे समृद्ध झाले होते. त्यावेळी या वनराईचे वैभवच वेगळे होते. या वृक्षावरती आकंठ मधुरस पाहून मधमाश्या जो मधुरस गोळा करायचे त्यांचे पोळे या शिडम वृक्षावरती लटकायचे.

आदिवासी वेळीप, गावकर समाजातील लोकमानसाला हा मधुरस विशेष आवडायचा. निसर्ग आपल्याला जे काही देतो त्याचा शाश्वत पद्धतीने वापर करण्याचे ज्ञान त्यांना होते. येथील लोकमानसाने ३०० ते ४०० वर्षे या वृक्षाचे संवर्धन केलेले आहे. गोव्याचे तत्कालीन राज्यपाल श्रीधरन यांनी या वृक्षाला भेट दिल्यानंतर लोकांच्या मनात या वृक्षाप्रति नैसर्गिक आकर्षण आणि उत्सुकता निर्माण झालेली दिसते. शिगमोत्सवा दरम्यान या वृक्षाला पिवळ्या रंगाची फुले येतात या फुलांमुळे तो मधमाश्यांबरोबर इतर सजीवमात्रांना आनंद वाटत असतो.

येथील लोकमानसाला त्याचे आकर्षण झाले आणि त्यामुळे आजही आपल्याला शिगमोत्सवातील घेतात ‘जन्माला फुलला’ असे शब्द ऐकायला मिळतात. या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘टेट्रामेलस नुडीफ्लोरा’ असे आहे. नुडीफ्लोरा म्हणजेच ज्या वृक्षाच्या फुलाला पाकळ्या अगदी लहान असतात किंवा त्या फुलाला पाकळ्याच नसतात.

जर्मल वृक्ष मल्लिकार्जुन देवाने निर्माण केलेला असून त्याच्या उत्सवाप्रसंगी दरवर्षी जर्मल वृक्षाच्या फांद्या फांद्यावर लटकणाऱ्या दहा-बारा मधाच्या पोळ्यांच्या लिलाव केला जायचा. वेळीप, गावकर समाज या लिलावात सहभागी होऊन मधुर रसाने युक्त पोळ्यांचा आस्वाद घ्यायचे.

शिडम हा भरपूर उंच आकाशाला भिडणारा वृक्ष आहे. त्यामुळे गोव्यातील जंगलसंपन्न प्रदेशात झाडांच्या उंच भागात वावरणाऱ्या वन्य प्राणी, पक्षी, फुलपाखरे त्याचबरोबर इतर पूर्ण कीटकांशी त्याचे नाते आहे. आकाशात उंच भरारी घेणारे पक्षी शिडमसारख्या वृक्षावर विश्रांती घेत असताना आपल्या सुंदर आवाजाने एकमेकांशी संवाद साधत असतात. हा वृक्ष असंख्य जीवांसाठी वर्षभर निवासस्थान बनलेला असतो.

या लाकडाच्या ढोलीत मलाबारी राखाडी धनेश त्याचप्रमाणे महाकाय धनेश पक्ष्यांसह अन्य अनेक पक्षी आश्रय घेतात. उन्हाळ्यात त्यांच्या विणीचा हंगाम या वृक्षावरती पाहायला मिळतो. नर मादीला दूरवरून आणलेली फळे भरवत असताना काही फळे जमिनीवर पडलेली ह्या वृक्षाच्या सान्निध्यात आढळतात. पावसाळ्यात त्यांच्या बिया रुजून येतात. त्यामुळे या पक्ष्यांनी आणलेल्या बियांना दूर दूरवर पसरण्यासाठी हे झाड एक माध्यम बनलेले असते. त्यामुळे त्याचे या कार्यातील योगदानही महत्त्वाचे ठरते.

गोव्यात जर्माल व शिडम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वृक्षाला महाराष्ट्रातील बहुतांश भागात ‘रान भेंडी’ या नावाने ओळखले जाते. हे झाड अंदाजे ४५ मीटर इतके उंच जाते.

आकाशाला गवसणी घालणारा हा वृक्ष वादळवाऱ्यातही सुरक्षित राहतो. त्याचा देह काळा, राखाडी पांढऱ्या रंगाचा असून तो चारही बाजूंनी पसरतो. त्याची मुळे जमिनीला घट्ट धरतात आणि झाडाला खंबीर बनवतात. गोव्यातील डोंगरदरीतून वाहणाऱ्या ओहोळाच्या काठावर ही झाडे महाकाय दगडांना घट्ट धरून उभी असलेली पाहायला मिळतात. नदीतील दगड धोंड्यांना आपल्या जागीच धरून ठेवून मान्सूनमध्ये ओसंडून वाहणाऱ्या पाण्यापासून त्यांना संरक्षण देतात.

झाड म्हणजे जणू छोटेखानी जैविक विविधतेचे बेटच आहे. दूधसागर धबधब्याच्या दिशेने जाताना देखील हे झाड आपले लक्ष वेधून घेते.

सत्तरी तालुक्यातील कोपर्डे गावातील देवाची राय, करंजोळ येथील होळीयेची राय व गोव्यात इतर ठिकाणी असलेल्या रायींमध्ये या वृक्षाला देवत्व लाभलेले पाहायला मिळते. त्यामुळे कित्येक पक्ष्यांना वर्षानुवर्षे या झाडावर घरटी बांधून आपले जीवन व्यतीत करता येते. त्यांना कुणीही इजा पोहोचवत नाही.

कोपार्डेच्या देवराईच्या केगदी बनाजवळ उभे असलेले शिडमाचे झाड हे एकेकाळी या देवराई आणि परिसरात कोणकोणती वृक्षवेलींची संपदा होती, त्याची प्रचिती देत आहे . कोपार्डेची ग्रामदेवी बाह्मणी माया आणि तिच्या नावाने परिचित त्याचप्रमाणे लोकमानसाने संरक्षित केलेली ही देवराई या गावाचे धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि पर्यावरणीय संचित आहे.

या देवराईतले हे शिडमाचे महाकाय झाड आपल्यासोबत असंख्य वेलींना आधार देत असून त्यामुळे सदासर्वकाळ त्याच्यावरती नानाविविध कृमिकीटक आणि सजीवमात्रांची गर्दी पाहायला मिळते.

शिडम हे पानगळतीच्या जंगलातले झाड असून त्याच्या मुळांना जमिनीत खोलवर जाण्यासाठी भुसभुशीत मातीची गरज नसल्याने सहजपणे खाजगी जंगलात, उद्यानात त्याची पैदास होऊ शकते. त्यामुळे वनखात्याच्या काही रोपवाटिकांत त्याची रोपे उपलब्ध करून दिली जायची.

पारंपरिक वनौषधींचे जाणकार पूर्वी त्याच्या सालीचा उपयोग करायचे. याचे लाकूड मऊ असल्याने भारतात त्याला विशेष आर्थिक महत्त्व प्राप्त झालेले नाही. परंतु जगाच्या काही भागातील जंगलनिवासी मात्र त्याच्या लाकडाचा होड्या बनवण्यासाठी वापर करतात.

गोमंतकातील विविध जाती जमातींच्या लोकधर्मात झाडांना देवत्व लाभल्याने त्यांचे संरक्षण होऊन त्यावर अवलंबून असलेल्या जैविक वैभवाचे रक्षण झालेले आहे. नैसर्गिक वैभव उत्पन्न करण्याचे काम माणूसच करू शकतो. वृक्षाच्या सांनिध्यात असलेली श्रद्धास्थाने जपून ठेवून आपल्या पूर्वजांचा वारसा पुढे नेणे गरजेचे आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT