Fake Payment App Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Fake Payment App: स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवलात तर नुकसान निश्चित; 'फेक पेमेंट अ‍ॅप' स्कॅमपासून वाचण्यासाठी सजग व्हा

Fake Payment App Scam: नुसत्या नोटिफिकेशन, बीप, एसएमएस, स्क्रीनशॉट यांसारख्या गोष्टींवर विसंबून राहू नका - कारण यातली प्रत्येक गोष्ट ‘फेक अ‍ॅप’द्वारे तयार केली गेलेली असू शकते.

Sameer Amunekar

नुसत्या नोटिफिकेशन, बीप, एसएमएस, स्क्रीनशॉट यांसारख्या गोष्टींवर विसंबून राहू नका - कारण यातली प्रत्येक गोष्ट ‘फेक अ‍ॅप’द्वारे तयार केली गेलेली असू शकते. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सायबर जगात संपूर्ण सतर्कता हेच तुमचे सुरक्षा कवच आहे!

याच महिन्यातील, ११ ऑगस्टची गोष्ट. पणजी मार्केटजवळील एका दागिन्यांच्या दुकानात चार साडेचारच्या सुमारास एक माणूस आला. त्याने डॉक्टर लोक वापरतात तसला निळ्या रंगाचा ऑपरेशन ड्रेस परिधान केला होता. त्याने सोन्याची चेन, लॉकेट असे काही दागिने खरेदी केले. त्याचे बिल सुमारे १.४ लाखांच्या आसपास झाले. आपण आरटीजीएसद्वारे पेमेंट करणार असल्याचे सांगत त्याने दुकानदाराकडून त्याच्या अकाउंट डिटेल्स घेतल्या.

त्या आपल्या मोबाइलवरती टाकल्या, आणि १.४ लाखांचा पेमेंट झाल्याचा स्क्रीनशॉट दुकानदाराला दाखवला. मग तो लगबगीने दागिने घेऊन तिथून निघून गेला. काही तासानंतर त्या दुकानदाराच्या लक्षात आले, की पैसे त्याच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेच नाही. तेव्हा त्याने सरळ पणजी पोलिसांत जाऊन तक्रार केली. पोलिसांनी त्या हैदराबादच्या भामट्याला दुसऱ्या दिवशी मुद्देमालासकट कांदोळीहून अटक केली. पोलीस चौकशीअंती असे आढळून आले, की त्याच्या नावावर वेगवेगळ्या राज्यात अशाच प्रकारच्या तब्बल ९ केसेस आहेत.

हे प्रकरण UPI(यूपीआय - युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस)द्वारे केल्या जाणाऱ्या पैशांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारांना लक्ष्य करणाऱ्या ‘फेक पेमेंट अ‍ॅप स्कॅम’ या प्रकारात मोडते. या स्कॅमबद्दल आणि सायबर गुन्हेगार ते कसे अमलात आणतात हे जाणून घेण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया.

यूपीआय हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(NPCI)द्वारे विकसित केलेले एक रिअलटाइम पेमेंट (तत्काळ पैशांची देवाणघेवाण) करणारी प्रणाली आहे. यामुळे एकाच अ‍ॅप्लिकेशनद्वारे जसे की ‘गूगल पे’, ‘फोन पे’, ‘पेटीएम’, किंवा सहभागी बँकांच्या स्वतःच्या अ‍ॅपद्वारे अनेक बँकांच्या खात्यांना एकमेकांशी पैशांच्या देवाणघेवाणीच्या उद्देशाने जोडता येतात. यामुळे बँकिंगच्या अनेक सोयी, तत्काळ निधी हस्तांतरण आणि व्यापाऱ्यांना थेट पेमेंट करण्याची सुविधा वगैरे एकाच अ‍ॅप्लिकेशनद्वारे मिळतात. अगदी काही वर्षांपूर्वी ऑनलाइन व्यवहारांची ही अगदी किचकट असलेली प्रक्रिया आता अगदी शेंबडे पोरसुद्धा करू शकेल इतकी सोपी, सुलभ झालीय ती याच यूपीआयमुळे.

जानेवारी २०२५मधील एका रिपोर्टनुसार, भारतात ८०पेक्षा जास्त यूपीआय अ‍ॅप्स आणि ६४१ बँका यूपीआय नेटवर्कमध्ये सक्रिय आहेत. गेल्या पाच वर्षांत ४५० दशलक्षाहून अधिक ग्राहकांनी यूपीआयमुळे आपली पैशांचे व्यवहार करण्याची पद्धतच बदलली आहे. मग तो व्यवहार विमानाचे तिकीट विकत घ्यायचा असू द्या किंवा नाक्यावरच्या भजीवाल्याकडून भजी-बटाटवडे घ्यायचा!

यूपीआयच्या वापरातील ही प्रचंड वाढ आणि त्याद्वारे होणारी अब्जावधी रुपयांची उलाढाल पाहता ही प्रणाली सायबर गुन्हेगारांचे लाडके लक्ष्य ठरली नसती तरच नवल! यूपीआय प्रणाली वापरणाऱ्या लोकांकडून पैसे उकळण्याच्या नव्या नव्या क्लृप्त्या सायबर ठग सदैव काढतच असतात. ‘फेक पेमेंट अ‍ॅप स्कॅम’ ही त्यातलीच एक क्लृप्ती.

आता हे ‘फेक पेमेंट अ‍ॅप स्कॅम’ म्हणजे आहे तरी काय, हे पाहूया. साधे उदाहरण घ्या. जेव्हा ‘गुगल पे’ या मोबाइल अ‍ॅपद्वारे भाजीवाल्याच्या अकाउंटरवरील क्यूआर कोड स्कॅन करून मी बिलाची रक्कम चुकती करते, तेव्हा माझ्या मोबाइलवर एक विशिष्ट टोनचा नोटिफिकेशन येतो. तद्नंतर माझ्या मोबाइलच्या स्क्रीनवर पेमेंट यशस्वी झाल्याची मेसेज येते. त्याचबरोबर मी ज्याला पेमेंट केलाय त्या भाजीवाल्याच्या फोनवरही नोटिफिकेशन येते. मी माझ्या मोबाइलवरचा ‘पेमेन्ट सक्सेसफुल’ मेसेज भाजीवाल्याला दाखवते आणि निघते.

इतर अ‍ॅपद्वारे पेमेंट करणारे ग्राहकही हेच करतात. नोटिफिकेशन आले, ग्राहकाच्या स्क्रीनवर मेसेज दिसला म्हणजे पेमेंट झाला असे दुकानदाराकडून ग्राह्य धरले जाते. सततच्या ‘यूपीआय पेमेंट अ‍ॅपस्’च्या वापरामुळे आपला ह्या सिस्टीमवर विश्वास बसलाय आणि संबंधित प्रक्रियाही अंगवळणी पडलीय. त्याचमुळे असेल कदाचित, पण आजपावेतो माझ्या पाहण्यात एकही असा लहान-मोठा व्यापारी नाही जो खरेच ग्राहकांनी पैसे दिले आहेत की नाही हे आपल्या गुगल पे किंवा बँक अकाउंटमध्ये जाऊन त्याचवेळी चेक करतो. अगदी याच यूपीआय प्रणालीवरच्या विश्वासाचा आणि अंगवळणी पडलेल्या प्रक्रियेचा गैरफायदा या ‘फेक पेमेंट अ‍ॅप स्कॅम’मध्ये घेतला जातो.

कल्पना करा, ग्राहक सामान घेतो, क्यूआर कोड स्कॅन करतो, त्याच्या मोबाइलवर बीप येतो, तुमच्या मोबाइलवर नोटिफिकेशन येते, पेमेंट सक्सेसफुल अशी आपल्या मोबाइलवरील मेसेज तो तुम्हांला दाखवतो आणि लगबगीने चालू पडतो. पण पैसे मात्र तुमच्या अकाउंटमध्ये येत नाहीत. कारण या साऱ्या प्रकारात तुम्हांला टोपी घालण्यासाठी तुमचा ‘ग्राहक’ वापरत असतो एक ‘फेक पेमेंट अ‍ॅप’. अशी अनेक ‘फेक पेमेंट अ‍ॅप्स’ खासकरून ‘प्रँक (मस्करी) अ‍ॅप्स’ म्हणून प्लेस्टोर वर अगदी सहज उपलब्ध आहेत. ही खोटी अ‍ॅप्स ‘यूपीआय पेमेंट अ‍ॅप’सारखीच क्युआर कोड किंवा बँक अकाउंट इत्यादी माहिती इनपुट म्हणून घेतात. त्यानंतर खोटी नोटिफिकेशन- मॅसेजीस, एसएमएस इत्यादी त्याच क्रमाने पाठवतात.

एसएमएससुद्धा दिसायला एकदम बँकेसारखी दिसते पण ती कुठच्यातरी नंबर वरून किंवा फेरफार केलेल्या सेंडर आयडीवरून पाठवली जाते. पण बँकांकडे कनेक्ट करून खरा पेमेंट मात्र केला जात नाही आणि तुम्ही हातोहात गंडवले जाता. यातील काही स्कॅमवाले रेडिमेड अ‍ॅप्स वापरतात तर काही यूपीआयपेमेंट कुठल्याही प्रकारच्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये सहज सामावून घेण्यासाठी दिल्या गेलेल्या ‘एपीआय इंटरफेस’मध्ये बदल करून लोकांना फसवतात. काही फेक अ‍ॅप्स तर अगदी व्यापाऱ्याकडल्या ‘पेमेन्ट आउन्समेंट सिस्टम’वरतीही मेसेज पाठवण्याइतक्या प्रगत असतात.

आता यावर उपाय काय? अशा फ्रॉडपासून वाचायचे असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाने डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. येणाऱ्या सणासुदीच्या आणि पर्यायाने गर्दीच्या दिवसांत व्यापाऱ्यांनी जास्त जागरूक राहणे अपेक्षित आहे.

मोठा पेमेंट घेत असाल किंवा अनोळखी माणसांशी व्यवहार करत असाल तेव्हा तुमच्या मोबाइलवरून तुमच्या अधिकृत गुगल अकाउंट वा बँक अ‍ॅपमध्ये जाऊन प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा झालेयत की नाही याची खातरजमा करून घ्या. त्यानंतरच संबंधितांना सामान द्या किंवा त्यांच्याकडील व्यवहार पूर्ण करा. नुसत्या नोटिफिकेशन, बीप, एसएमएस, स्क्रीनशॉटसारख्या गोष्टींवर विसंबून राहू नका - कारण यातली प्रत्येक गोष्ट ‘फेक अ‍ॅप’द्वारे तयार केली गेलेली असू शकते. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सायबर जगात संपूर्ण सतर्कता हेच तुमचे सुरक्षा कवच आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

2027 मध्ये गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देऊ, मंत्रिपदाची शपथ घेताच कामत, तवडकरांची हमी; लोबो दाम्पत्य, गावडे, बाबुशची कार्यक्रमाला दांडी

Viral Video: दोन बायका अन् सहा मुलांसह पठ्ठ्याचा बाइक प्रवास, सोशल मीडियावर देसी जुगाड व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

माउथ ऑर्गनवर वाजवली राष्ट्रगीताची धून; प्रतापसिंग राणेंचा 'हा' व्हिडीओ सध्या होतोय Viral

India vs Pakistan: क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज! भारत-पाकिस्तान यांच्यात होणार महामुकाबला, आशिया कपमधील लढतीला भारत सरकारचा ग्रीन सिग्नल

Nigeria Mosque Attack: नमाजावेळी मशिदीवर गोळीबार; 50 जण ठार, 60 जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

SCROLL FOR NEXT