Dharmendra Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

अग्रलेख; 'राजा जानी' ते 'चुपके चुपके'चा प्रोफेसर! धर्मेंद्रच्या निधनाने बॉलिवूडने गमावला एक अष्टपैलू नट

Dharmendra: लोकांनी धर्मेंद्रवर भरभरून प्रेम केले. म्हणूनच तर तो बॉलिवुडात तब्बल ६५ वर्षे टिकून ३०६ चित्रपटात काम करू शकला.

गोमंतक ऑनलाईन टीम

लोकांनी धर्मेंद्रवर भरभरून प्रेम केले. म्हणूनच तर तो बॉलिवुडात तब्बल ६५ वर्षे टिकून ३०६ चित्रपटात काम करू शकला. त्याच्या निधनाने बॉलिवूडच्या एका पर्वाचा अस्त झाला आहे. बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’ला श्रद्धांजली वाहणारा विशेष लेख...

काल बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र कालवश झाला. बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा तो एक प्रमुख साक्षीदार होता. १९६१साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या बी-ग्रेड चित्रपटापासून सुरुवात करणारा धर्मेंद्र देओल गाजायला लागला तो १९६६साली प्रदर्शित झालेल्या ‘फुल और पत्थर’ चित्रपटापासून. या चित्रपटातला त्याचा तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा शाका त्या काळात तुफान गाजला होता. या चित्रपटापासूनच त्याला ‘ही-मॅन’ ही उपाधी प्राप्त झाली.

त्यानंतर धर्मेंद्रने कधीच मागे वळून बघितले नाही. त्याचा स्वतःचा असा एक प्रेक्षक वर्ग निर्माण झाला जो शेवटपर्यंत कायम राहिला. त्याचे व्यक्तिमत्त्वच असे होते की कोणीही त्याच्यावर फिदा व्हावे. म्हणूनच तर तो राजेश खन्ना, अमिताभ बच्चनच्या लाटेतसुद्धा टिकू शकला.

मारधाडींच्या चित्रपटांबरोबर गंभीर तसेच विनोदी भूमिकाही त्यांनी प्रभावीपणे साकारल्या. ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘सत्य काम’ चित्रपटातील त्याचा तो सत्यप्रिय इंजिनिअर खरोखर लाजवाब होता. त्याचप्रमाणे ‘प्रतिज्ञा’ चित्रपटातील त्याची ती विनोदी भूमिका तर आजसुद्धा अनेकांच्या मर्मबंधातील ठेव बनली आहे. या चित्रपटातले त्याने उत्स्फूर्तपणे साकार केलेले ‘मै जट यमला पगला दिवाना’ हे गाणे तर आजसुद्धा लोकांच्या ओठावर खेळताना दिसत आहे.

या गाण्यावर धर्मेंद्र असा काही नाचला आहे की ‘पुछो मत’! तीच गोष्ट ‘चुपके चुपके’ची. या चित्रपटातील त्याचा तो बॉटनीचा विनोदी प्रोफेसर तर खरोखर अफलातून होता. ड्रायव्हरचे सोंग घेऊन जिजाजी ओमप्रकाश याची फिरकी घेणारा धर्मेंद्र १९७५साली लोकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. या चित्रपटानंतर लगेच त्याचा ‘ऑल टाइम हिट’ असलेला ‘शोले’ प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याचा तो विरूही अजरामर ठरला. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘यादो की बारात’ या चित्रपटातला त्याचा तो डॅशिंग शंकर तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता.

धर्मेंद्र-हेमा मालिनी ही बॉलिवूडच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वांत लोकप्रिय जोडी. ‘शराफत’पासून सुरू झालेला या जोडीचा प्रवास १९८७सालच्या ‘जान हथेली पे’पर्यंत सुरू राहिला. यादरम्यान या जोडीने तब्बल ३२ चित्रपट बरोबर केले.

हा एक विश्वविक्रम मानला जात आहे. या जोडीचे ‘जुगनू’, ‘दोस्त’, ‘सीता और गीता’, ‘प्रतिज्ञा’, ‘राजा जानी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आझाद’, ‘नया जमाना’, ‘चाचा भतिजा’, ‘शोले’, ‘पत्थर और पायल’, ‘राजपूत’ या चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. ‘शोले’ चित्रपटातला विरू झालेला धर्मेंद्र व बसंती झालेली हेमा मालिनी यांचा प्रणय, डाकूपट असलेल्या ‘शोले’ला एक रुपेरी किनार लावून गेला होता.

१९६१साली सुरू झालेली धर्मेंद्रची फिल्मी कारकीर्द अजूनही सुरू होती. गेल्या वर्षी त्याचा ‘तेरी बातो मे ऐसा ऊलझा जिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर त्याचा शेवटचा चित्रपट ’इक्कीस’ आता पुढील महिन्याच्या २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर ‘शोले’ची नवी आवृत्तीही १२ डिसेंबरला सिनेमाघरात दाखल होणार आहे.

धर्मेंद्रच्या या प्रदीर्घ यशाचे कारण म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा. ‘दिग्दर्शकाचा अभिनेता’ म्हणून त्याची ओळख होती. त्याला राज कपूरपासून मनमोहन देसाईंपर्यंत सर्व नावाजलेल्या दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटात घेतले होते. राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातला त्याचा तो सर्कस मॅनेजर चित्रपट फ्लॉप होऊनही यादगार ठरला होता. मनमोहन देसाईंच्या ‘धरमवीर’ चित्रपटातला त्याचा तो धरम तर १९७७साली जबरदस्त हिट ठरला होता.

त्याची मारधाडच नव्हे, तर त्याचा प्रणयही अनोखा असायचा. ‘जीवन मृत्यू’ या चित्रपटातील ‘झिल मिल सितारों का आंगन होगा’ या गाण्यावरचा त्याचा व राखीचा प्रणय याची साक्ष देतो. म्हणूनच तर त्याला ‘लेडी किलर’ म्हणत असत. धर्मेंद्रला जरी दिलीप कुमार, संजीव कुमार, अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनय-निपुण नायकांच्या यादीत बसविले जात नसले, तरी त्याची लोकप्रियता वादातीत होती यात शंकाच नाही.

म्हणूनच तर त्याचे अनेक चित्रपट सिल्वर जुबली, गोल्डन जुबलीचा किनारा गाठू शकले. ‘राजा जानी’मधला त्याचा तो हेमा मालिनीला शिकविणारा राजकुमार असो, वा ‘सीता और गीता’मधला दांडगट राका असो, वा ‘पोरगी फसली रे फसली’ असे म्हणत नाचणारा ‘कहानी किस्मत की’मधला अजित असो, लोकांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केले. म्हणूनच तर तो बॉलिवुडात तब्बल ६५ वर्षे टिकून ३०६ चित्रपटात काम करू शकला.

वयाच्या ८९व्या वर्षीसुद्धा तो याचमुळे लोकांना हवाहवासा वाटत होता. आज त्याच्या निधनाने बॉलिवूडच्या एका पर्वाचा अस्त झाला आहे. धर्मेंद्रसारख्या अभिनेत्याची पोकळी भरून येणे जवळ जवळ अशक्यच. अशा या बॉलिवुडातील दिग्गज अभिनेत्याला श्रद्धांजली देताना त्याच्याच ‘दोस्त’ या चित्रपटातील ते एव्हरग्रीन गाणे याद यायला लागते.

दिल पे सहकर सितम के तीर भी,

पहन के पांव मे जंजीर भी

रक्स किया जाता है

आ बता दे ये तुझे कैसे जिया जाता है.....

- मिलिंद म्हाडगुत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terror Attack: 'लश्कर' आणि 'जैश'चा भयानक कट! काश्मीरसह दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये मोठ्या हल्ल्याचा डाव; गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर

Liquor Seized In Sindhudurg: नगरपंचायत निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कणकवलीत 7 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त; गुजरातच्या दोघांवर गुन्हा दाखल

Abhinav Tejrana: तेजराणाची 'तेजस्वी' कामगिरी! रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक 651 धावा; IPL संघ 'या' खेळाडूवर डाव लावणार?

Ayodhya Dhwajarohan: 191 फूट उंचीवर फडकणाऱ्या ध्वजात दडलाय अयोध्येचा इतिहास; 'सूर्य, ॐ, कोविदार वृक्षा'चे महत्त्व काय?

'व्याघ्र प्रकल्प नको' भूमिका चुकीची! खाणींसारखाच हाही गोव्याच्या हिताचा लढा - संपादकीय

SCROLL FOR NEXT