औरंगाबाद शहरापासून जवळच देवगिरी हा ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला जो ११८७च्या सुमारास पहिला यादव राजा भिल्लम यादव (पंचम) यांनी बांधला असल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. डोंगराळ किल्ला देवगिरीच्या परिसरात सुमारे २०० मीटर उंच असलेल्या शंकूच्या आकाराच्या टेकडीवर तसेच पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या मार्गांवर उभा आहे. यादव शासकांनी टेकडीचा बराचसा खालचा उतार कापून टाकला जेणेकरून संरक्षणासाठी ५० मीटर उभ्या बाजू सोडल्या जातील.
शिखरावर पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एक अरुंद पूल, ज्यामध्ये दोनपेक्षा जास्त लोक जाऊ शकत नाहीत आणि खडकात खोदलेला एक लांब मार्ग, ज्याचा उताराचा बहुतेक भाग हळूहळू वर जातो. मध्यभागी, प्रवेशासाठी उंच पायऱ्या आहेत, ज्याचा वरचा भाग एका जाळीने झाकलेला आहे जो युद्धाच्या वेळी वरच्या सैन्याद्वारे जळत असलेल्या मोठ्या तेलाची चूल व आग बनवण्यासाठी बनवला गेला होता.
दिल्ली सल्तनतच्या अलाउद्दीन खिलजीने १२९६मध्ये देवगिरीवर हल्ला केला आणि यादवांना मोठी खंडणी भरण्यास भाग पाडले. रामचंद्र यादवांच्या नंतर खंडणी देणे बंद झाल्यावर, अलाउद्दीनने १३०८मध्ये देवगिरीवर दुसरी मोहीम पाठवली.
ज्यामुळे पुढे १३२७मध्ये दिल्ली सल्तनतच्या मुहम्मद बिन तुघलकने आपल्या राज्याची राजधानी देवगिरी येथे नेली आणि त्याचे नाव दौलताबाद ठेवले. १३२७मध्ये सुलतानाने दौलताबाद (देवगिरी) ही आपली दुसरी राजधानी बनवली.
काही विद्वानांचा असा युक्तिवाद आहे की राजधानी तिथे नेण्यामागील कल्पना ती राज्याच्या मध्यभागी राजधानी असणे व कमी-अधिक प्रमाणात भौगोलिकदृष्ट्या वायव्य सीमेवरील हल्ल्यांपासून राजधानी सुरक्षित ठेवणे ही होती. देवगिरीची सर्वांत बाहेरील संरक्षक भिंत म्हणजे अंबरकोट. या तटबंदीमध्ये दोन संरक्षक भिंती आहेत. अंबरकोटच्या भिंतीभोवती अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांचा अद्याप अभ्यास झालेला नाही.
फारसी कागदपत्रे आणि काही मराठी संदर्भ यावरून आपल्याला जाणवते की इ.स.१२९६मध्ये अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीवर स्वारी केली. पण अनेक ठिकाणी ‘चार घटकेत रामदेवाचे राज्य अल्लाउद्दिनने घेतले’ हा उल्लेख येतो तो चुकीचा असल्याचे प्रामुख्याने जाणवते. अल्लाउद्दिनने हल्ला करण्याआधी रामदेवरायाची स्थिती काही विशेष चांगली नव्हती.
ठाणे-कोकणातील नागरशासारख्या छोट्या राजानेदेखील त्याचा पराभव केलेला होता. पण तरीही त्याने अल्लाउद्दिनविरुद्ध प्रखर लढा दिला होता व आक्रमणाला तोंड देण्याची तयारी त्याने केली होती असेही दिसते. रामदेवाने भुरदासप्रभू वानठेकर याच्याकडे सैन्याचे सर्व अधिकार दिले होते.
तर भुरदासप्रभूचा पुत्र चित्रप्रभू याच्याकडे दुय्यम सेनाधिकार होता. सुमध नावाचा रामदेवाचा प्रधान होता. इतर अनेक मराठा संस्थानिक मात्र रामदेवापासून फुटून फुटून निघाले होते. ह्याचे कारण त्यांच्यामधील वितुष्ट होते. ह्याच संधीचा फायदा घेऊन अल्लाउद्दिनने हे आक्रमण केले असावे.
अल्लाउद्दिन खुद्द स्वतःच्या हसन आणि हुसेनया दोन मुलांसह देवगिरीवर वेढा घालून हल्ला चढवला असे बखर म्हणते. जेव्हा लढाई प्रत्यक्षात जुंपली तेव्हा सुमधने युद्धातून हसन यास यमसदनी धाडले. आपल्या भावाचा वध झालेला पाहताच हुसेन यादव सैन्यावर चाल करून आला. ह्यावेळी त्याला चित्रप्रभू सामोरा गेला. ह्या हल्यात चित्रप्रभूने हुसेन यास ठार केले.
असे एका मागोमाग अल्लाउद्दिनचे दोन्ही पुत्र ठार झाले. तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली. आता खुद्द अल्लाउद्दिन त्वेषाने चालून आला आणि पुन्हा एकदा खडाजंगी सुरू झाली. ह्यावेळी लढाईत भुरदासप्रभू धारातीर्थी पावन झाला. मुलांच्या मृत्यूने त्वेषात येऊन अल्लाउद्दिन जितक्या त्वेषाने चालून आला त्याहीपेक्षा अधिक त्वेषाने चित्रप्रभू आपल्या वडिलांच्या मृत्यूने अल्लाउद्दिनवर चालून गेला. पुन्हा एकदा यादव सेनेने अल्लाउद्दिन सैन्याला पराभूत करून पिटाळून लावले.
हे सर्व काही एका दिवसात झाले की काही दिवसांत ते स्पष्ट नाही. पण ह्यावरून यादव सेनेने पहिल्यांदा विजय संपादन केला होता हे स्पष्ट होते.
आपल्या मुलांच्या मृत्यूने आणि पराभवाने क्रोधित अल्लाउद्दिन पुन्हा एकदा देवगिरीवर उलटून आला. ह्यावेळी त्याला रोखणे कोणालाच शक्य झाले नाही. चित्रप्रभू मारला गेला आणि अखेरीस यादवांचा पराजय झाला व मुसलमानी राज्य लादले गेले.
प्रसिद्ध इतिहासकार राजवाडे म्हणतात की, ह्या देवगिरी लढाईच्या वेळी रामदेवरायाबरोबर त्याचे संस्थानिक, मुत्सद्दी, सरदार आणि सामान्य लोकदेखील सोबत नव्हते म्हणून तो हा पराभव थांबवू शकला नाही. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण हा तसा भारतीय संस्कृतीचा फार पूर्वीपासूनचा बालेकिल्ला, ज्याने पश्चिम घाटाच्या संरक्षणात्मक प्रभावामुळे बाह्य आक्रमणांना तोंड दिले.
दिल्ली सल्तनतच्या अलाउद्दीन खिलजीने १२९६मध्ये देवगिरीवर हल्ला केला आणि यादवांना मोठी खंडणी भरण्यास भाग पाडल्यानंतर १३१०-१३१२ या कालावधीत इस्लामच्या सैन्याने मोठ्या घोडदळासह कोकणात प्रवेश केला आणि कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला.
पराभूत झालेल्या गोव्याच्या कदंबांनी त्यांच्या उर्वरित सैन्यासह एक प्राचीन शहर चंद्रपूर येथे पळ काढला आणि या मजबूत किल्ल्यातून खिल्जी हल्ल्यापासून भूमीचे रक्षण केले. दिल्ली शासक मोहम्मद इब्न तुघलकने कोंडाणा किल्ल्यावर व पुण्यावर केलेल्या हल्ल्यानंतर,१३२८मध्ये आक्रमणादरम्यान कोकणात व गोव्यात असलेल्या कदंबांवर आक्रमण करण्यावर जोर दिला.
घोडेस्वारांसह त्याने गोव्यातील चंद्रपुरावर आक्रमण केले, कदंब संरक्षणाचा पराभव केला आणि शहराचा नाश केला. तथापि, तुघलक इतर लढायांमध्ये गुंतला होता आणि कदंब प्रमुखाने तुघलक सैन्याशी झालेल्या अनेक चकमकींनंतर त्यांचा संपूर्ण नाश करून कोकणचा बराचसा प्रदेश मुक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.