Datta Damodar Naik Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Datta Naik: 'दत्ता नायक' यांचे परखड बोल काळोखात मशाल पेटवावी असेच! विशेष लेख

Goa Opinion: नायक हे सुरुवातीपासून आपल्या राजकीय, सामाजिक भूमिकांसाठी प्रसिद्ध. ते प्रत्यक्ष निवडणुकीत उभे राहिले नाहीत, परंतु भूमिका घेऊन राजकारणात वावरले.

Raju Nayak

दत्ता दामोदर नायक हे परखड भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा धर्म टीकाकार, विचारवंतांचाच. त्यांच्याएवढा भाषेवर हुकूमत असलेला, संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांवर पकड असलेला बहुप्रसव, प्रतिभाशाली ललित लेखक महाराष्ट्रातही विरळाच.

नायक हे सुरुवातीपासून आपल्या राजकीय, सामाजिक भूमिकांसाठी प्रसिद्ध. ते प्रत्यक्ष निवडणुकीत उभे राहिले नाहीत, परंतु भूमिका घेऊन राजकारणात वावरले. काँग्रेससाठी काम केले, तेथेही नंदीबैल बनले नाहीत. बाबू नाईक यांना नामोहरम करून मडगावमध्ये अनेक वर्षे त्यांचे असलेले प्रभुत्व जमीनदोस्त करण्यात, दिगंबर कामत यांचे अस्तित्व निर्माण करण्यात नायक यांची भूमिका महत्त्वाची.

भाजपला गोव्यात आणण्यात नायक यांनी घेतलेली भूमिका वादग्रस्त होती. मगोप-भाजप युतीसाठी पुढाकार घेऊन त्यांनी काँग्रेसला शह दिला. लेखक-विचारवंत जेव्हा गोव्यात तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत, पुरस्कार आणि पदांच्या मागे धावण्यात इतिकर्तव्यता दाखवीत आहेत, तेव्हा ‘दक्षिणायन’चे प्रवर्तक दत्ता नायक यांचे परखड बोल काळोखात मशाल पेटवावी असेच असतात!

दत्ता नायक यांच्या विधानामुळे सध्या असे काय घडले, ज्यातून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला? त्यांना अटकपूर्व जामिनासाठी धाव घ्यावी लागली?

नायक यांनी त्यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त दोन मुलाखती दिल्या आहेत. या वाढदिवसाच्या अनुषंगाने दत्ता नायक व अवधूत तिंबलो यांच्याबरोबर मी पहिली चर्चा केली. त्यात नायक यांनी स्वतःचा नास्तिकवाद, आपला दानधर्म यासंदर्भात काही विधाने केली. ही चर्चा गाजल्यावर त्यांची आणखी एक मुलाखत प्रसिद्ध झाली.

या दोन्ही चर्चांमधून नायक यांची जी विधाने गाजली त्यामुळे काहीजणांच्या विशेषतः सारस्वत समाजातील व्यक्तींच्या भावना दुखावल्या. वास्तविक नायक यांनी पर्तगाळ मठाचा उल्लेख केला नसता, तर एवढी खळबळ उडालीही नसती. नायक स्वतःही ‘लूट’ हा शब्द आपण वापरायला नको होता, असे म्हणतात.

दत्ता नायक यांनी आपण नास्तिक असल्याचे या दोन्ही कार्यक्रमांत ठासून सांगितले आहे. ‘मी नास्तिक आहे, मी देवळे व मठांना दान करीत नाही. मी त्यांना पैसे दिले असते तर त्यांनी मला अक्षरशः ओरबाडले असते. देवळे, मठ, पुजारी हे अक्षरशः भाविकांची लूट करीत असतात’, अशी त्यांची विधाने आहेत.

नायक यांनी केलेली अशा आशयाची विधाने यापूर्वीही अनेकांनी केली आहेत. गोव्यातील देवळे, मठ यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमविली. परंतु या पैशांचा विनियोग समाजासाठी केला का? हा पैसा समाजाचे उत्थान, सुधारणा यासाठी वापरता आला असता. देशात अन्यत्र धार्मिक संस्थांनी प्रचंड मोठी सामाजिक सेवा उभी केली आहे. इस्पितळे, वैद्यकीय व व्यावसायिक महाविद्यालये, वैद्यकीय शिबिरे, गोरगरिबांना अन्नछत्र, वसतिगृहे, पुनर्वसन आदी मोठे उपक्रम देशात निर्माण झाले.

अनेक संतही दरिद्र-नारायणांची सेवा हीच ईश्वरभक्ती मानतात. त्या तुलनेने गोव्यातील मंदिरांनी कोणते सामाजिक कार्य केले? त्याऐवजी सोन्याचे कलश उभारणे, सोन्या-चांदीच्या पालख्या मिरवणे, गर्भगृहे सोन्या-चांदीने मढविणे अशी कामे करण्यात धन्यता मानली. त्यासंदर्भात वादही उपस्थित झाले. स्वतः महाजनांनी प्रश्न उपस्थित केले, समित्यांना कोर्टातही खेचले आहे. तेथे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार चालू असल्याच्या तक्रारी करून महाजनांनी आंदोलनातही भाग घेतला आहे. त्यामुळे गोव्यातील मंदिरांमध्ये सारे आलबेल आहे, असे मानण्याचे कारण नाही. काही देवस्थानामध्ये तर पुजारी आपल्या कृत्यांमुळे वादातही सापडले आहेत.

गोव्यासारख्या बुद्धिमान राज्यात जेथे सारस्वत समाज हा सर्वांसाठी आदर्श असल्याचे मानले जाते त्यांनी तरी आपल्या कामाने, कर्तृत्वाने धर्मस्थाने, देवळे, मठ येथे नवा आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा कोणी बाळगली तर चूक काय? शिवाय दत्ता नायक हे जरी स्वतःला नास्तिक मानत असले तरी सारस्वत समाजाच्या बुद्धिमान वर्गासाठी ते आदर्शवतच आहेत. दत्ता नायक यांनी त्यांचा व्यवसाय, त्यांचे ललित साहित्य या दोन्ही क्षेत्रांत केलेले विविध प्रयोग, त्यांच्या संस्था, योग्य कार्याला ते देत असलेली सढळ मदत हे समाजासाठी आदर्शवतच आहे.

या पार्श्वभूमीवर स्वतःला बुद्धिमान म्हणवणाऱ्या सारस्वत समाजातील कथित धुरीणांनी पोलिसांत धाव घेण्याऐवजी चर्चा, सुसंवादाने अधिक चांगल्या पद्धतीने वादाला सामोरे जाता आले असते. धर्म व्यवहार, जात व्यवस्था व मंदिर व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये सुधारणा व्हायला हव्यात, असे एकूणच समाज मानतो.

शिवाय त्या टप्प्याटप्प्याने आपोआप होतील, असे त्यातील अनेकांना वाटत असते. परंतु धर्म, जात आणि मंदिर व्यवस्थापनात राजकारण आल्यानंतर त्या विषयावर बोलूच नये, अशीच काहीशी समाजाची धारणा बनत चालली आहे. हा श्रद्धेचा भाग आहे अशी समजूत आहे. देवावरचा भक्तिभाव हा श्रद्धेचा भाग असू शकतो. याचा अर्थ मंदिर व्यवस्थापनेला मूक संमती हा श्रद्धेचा भाग असू शकत नाही. त्यावर काही बोलायचेच नाही, त्यामुळे कोणाच्या श्रद्धेला ठेच पोहोचते हा विचारच आपल्या वैचारिक आदान-प्रदानासाठी, शिवाय लोकशाहीसाठीही धोकादायक आहे.

गोवा मुक्तीला व लोकशाहीलाही ६३ वर्षे पूर्ण होऊन आपले स्वातंत्र्य प्रौढ झाले. त्यामुळे गोव्याच्या एकूण श्रद्धांबद्दल निर्भयपणे चर्चा, चिकित्सा करण्याची योग्य वेळ आली आहे. त्याचवेळी आपल्या सर्व धार्मिक श्रद्धाही पुन्हा-पुन्हा घासून-पुसून तावून सुलाखून घेण्याची गरज आहे. याबाबत परंपरेने चालत असलेल्या व्यवस्था मोडीत काढण्याची गरज आहे. त्या काढताना आपल्या श्रद्धा आणि त्यांचे आधार तपासून घेण्याची गरज आहे. देवळे व श्रद्धा याबाबत विचार करताना स्वतःला तर्कशुद्ध आणि बुद्धिनिष्ठ म्हणविणाऱ्या मंडळींनी पूर्वग्रह बाजूला ठेवावेत. हे काम न संतापता, न चिडता व्हायला पाहिजे.

आपल्या अनेक विचारवंतांनी यापूर्वीही ईश्वर, मठसंस्था व श्रद्धा याविषयावर लिखाण केले आहे. त्यातील अनेक विचारवंत नास्तिक होते. सर्वच नास्तिक धार्मिक माणसांच्या भावना दुखावल्या पाहिजेत, या मताचे नसतात. वास्तविक आस्तिकापेक्षा नास्तिक बनण्यात अभ्यास, धैर्य आणि चिकाटी लागते. जगात ईश्वर नाही, हे मत त्यांनी विचारपूर्वक बनविलेले असते. समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने हिताचे असे कोणतेही मत आपण आग्रहाने मांडतो, आस्तिकांविरोधात उभा राहतो, तेथे मी कोणाचीही भीडमुर्वत बाळगत नाही, असे ते मानत आले आहेत.

विचारवंत, लेखक नरहर कुरुंदकर हे स्वतः नास्तिक होते व त्यांनी या विषयावर बरेच लिखाण केले आहे. ‘समाजातील हजारो, लाखो माणसांच्या भावना या ईश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या आहेत, एवढाच मुद्दा असेल तर काय म्हणून त्यांच्या भावना दुखवायच्या? एवढाच मुद्दा असेल तर मीही माझ्या नास्तिक्याचा आग्रह बाळगायला तयार नाही.

उगीच कोणाच्या आस्तिक्याच्या विरोधी भाषण देण्याची माझी इच्छा नाही, पण अडचणीची गोष्ट अशी आहे की, मुद्दा फक्त एवढाच नाही... सबंध समाजातील आस्तिक्य बुद्धी ही समाजाला हानिकारक असणाऱ्या चालीरीती, परंपरा, रूढी यांना घट्ट धरून बसते आणि समाजाचा विनाश झाला तरी तो विनाश नसून ते प्राक्तन आहे, असे सांगण्याचा प्रयत्न करते. मग समाजाच्या प्रगतीच्या सर्व शक्यता या आस्तिक्यबुद्धीमुळे नाहीशा व्हायला लागतात, तेव्हा मग हे सांगण्याची वेळ येते की, हा सर्व मूर्खपणाचा भाग आहे उरलेल्यांसाठी व लबाडीचा भाग आहे काहीजणांसाठी’.

कुरुंदकर लिहितात ः ‘सर्व धार्मिक माणसांचा निर्बुद्धपणा हे माझ्या जीवनातील फार मोठे दुःख आहे. धार्मिक माणसाची बुद्धीच मंद होते, अशी माझी समजूत आहे. माणसाच्या बुद्धीला मंदत्व आणण्याचे, प्रगतीला अडथळा आणण्याचे काम धर्माने केले आहे’.

कुरुंदकर आता मूळ मुद्द्यावर येतात आणि प्रहार करतात ः कोणत्याही (देवावरच्या) श्रद्धेमुळे का होईना जर माणसे नैतिक राहिली असती, तर राहुद्यात असे मी म्हणालो असतो. ईश्वरावरील श्रद्धा माणसाला नैतिक राहायला उपयोगी पडली असती, तर ईश्वराच्या श्रद्धेविरुद्ध कसे बोलावे, याचा मी दहावेळा विचार केला असता. मात्र, धर्मावरील सर्व श्रद्धा सर्व अनैतिक बाबींचे समर्थन करण्यासाठी जगाच्या इतिहासात वापरली गेली आहे.

जगाचा व भारताचा इतिहास पाहिला तर असे आढळते की, मानवी जीवनातल्या सगळ्या अनैतिक बाबींच्या समर्थनासाठी धर्मावरची श्रद्धा शतकानुशतके वापरली गेली आहे आणि लोकांनी ती कबूल केली आहे. धर्म जर माणसाला नैतिक राहायला उपयोगी पडला असता, तर एकाही देवळाजवळ एवढी संपत्ती जमा झाली नसती. देवाचे नाव घेऊन मटका चालवायचा, साईबाबांचे नाव घेऊन आकडा लावायचा म्हणजे आई-बाबांच्या नावाचा उपयोग जुगारासाठी करायचा!

नरहर कुरुंदकर या बेगडी श्रद्धांवर आणखी जोरदार प्रहार करताना म्हणतात ः माणसाच्या आस्तिक्य बुद्धीने स्वतःच्या सर्व भ्रष्टाचारांचे समर्थन परमेश्वराच्या नावावर हुडकून काढले. म्हणून ईश्वराची कल्पना शांततेला उपयोगी पडली नाहीच, तर उलट माणसे ईश्वराचे नाव घेऊन एकमेकांची डोकी फोडतच राहिली, हाच जगाचा इतिहास आहे. सर्व हिंदू, मुसलमानांची भांडणे तशीच आहेत. सगळी ख्रिश्चनांची (कॅथलिक व प्रोटेस्टंटांची) भांडणे तीच आहेत. माणसाला शांततेने जीवन जगायला देव कधीही उपयोगी पडला नाही.

माणसाला नीतिमान व्हायला कधी देव उपयोगी पडला नाही. माणसाला सगळ्या समाजाबरोबर त्या समाजाच्या ऱ्हासाला थांबवण्याची प्रेरणा कधी देवाने दिली नाही. देवाचे काम पॉझिटिव्ह आहे, तो हिंसेला उपयोगी पडला, पापाला उपयोगी पडला, मारामारीला उपयोगी पडला; पापाच्या, अन्यायाच्या समर्थनासाठी उपयोगी पडला. नाहीतर तुम्ही अस्पृश्यतेचे समर्थन कसे करता? माणसासारख्या माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याची संधीच तुम्ही देत नाही आणि हे काम अत्यंत पवित्र आहे, असे सांगता बेशरमपणे. याला देव उपयोगी पडतो, तसेच जगातील सगळ्या अनीतीला देव उपयोगी पडतो.

‘मी लहानपणापासून धर्मसाहित्य वाचलेले आहे, सश्रद्ध माणसांनी वाचले त्यापेक्षा अधिक मी वाचले आहे. माझी अशी श्रद्धा आहे की बहुतेक लोक धार्मिक आहेत. याचे कारण त्यांनी धार्मिक साहित्य वाचलेले नाही. प्रत्येकजण आपल्या धर्माचे साहित्य वाचायला टाळाटाळ करतो. आम्ही मूर्ख असल्यामुळे श्रद्धेने आम्ही आमच्या धर्माचे साहित्य वाचायला सुरुवात केली, तो आमच्या नास्तिक्याचा आरंभ ठरला’, असे मत कुरुंदकरांनी जाहीररीत्या मांडले आहे.

प्रबोधनकार ठाकरे तर कुरुंदकरांच्या चार पावले पुढे होते. ते म्हणायचे, हिंदुस्थानात दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाही... कोट्यवधी गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धाळू, हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोणपाटाचे ठिगळही मिळण्याची पंचाईत, पण आमच्या देवांना पंचपक्वान्ने आणि छपरीपलंग! या अशा देवळे व श्रद्धांमुळे हिंदू समाजाची आत्मिक उन्नती किती झाली, याचा अभ्यास करावा, असे प्रबोधनकार म्हणायचे.

वास्तविक दत्ता नायक यांच्यापेक्षा अधिक जहाल संशोधन गोवा विद्यापीठात झाले आहे. इतिहास विभागाचे संशोधक पराग परब व जर्मनीतून आलेले संशोधक अलेक्झांडर हॅन यांनी गोव्यातील भक्ती चळवळ, देवळे व श्रद्धा यांच्यावर बराच उजेड टाकला. ज्यातून खरे म्हणजे आपल्या श्रद्धावानांच्या भावना दुखायला हव्या होत्या. समाजासमोर हीसुद्धा एक बाजू आहे, ती समोर यायला हवी. त्यावर चर्वितचर्वण व्हायला हवे. या दृष्टिकोनातून मी या दोघांचे संशोधन लोकांसमोर यावे म्हणून बरेच लेख गेल्या सात-आठ वर्षांत लिहिले आहेत.

गोव्यातील सारस्वतांनी राज्यातील मंदिरे, श्रद्धास्थाने पोर्तुगिजांच्या जवळकीचा फायदा घेऊन कशी ताब्यात घेतली, याचा धांडोळा परब यांनी घेतला आहे. एकेकाळी ही देवळे सर्व समाजांना सामावून घेणारी, त्यांच्यामध्ये भक्तिभाव जागवणारी आणि उन्नतीचा मार्ग दाखविणारी शक्तिपीठे होती. परंतु त्यावेळच्या प्रबळ समाजाने स्वतःचे राजकीय, सामाजिक स्थान बळकट करण्यासाठी व आर्थिक सत्ता ताब्यात घेण्यासाठी अशा धार्मिक प्रतिकांवर कब्जा केला. त्यांनी सातेरीमायेची मंदिरे ताब्यात घेतली, त्यांचे उदात्तीकरण करून मंदिरांची व्यवस्था व उपासनापद्धत बदलली. त्यासाठी सह्याद्रीखंड व कोकणाख्यानसारखी पुराणे तयार केली. आपले माहात्म्य त्यात घुसडले. बऱ्याच महत्त्वाच्या दस्तऐवजांचा अभ्यास करून पराग परब यांनी समाजासमोर पुढे आणलेले हे आकलन आहे.

गोव्यातील देवळे श्रीमंत असल्यामुळे ती इतरांना ताब्यात घ्यावीशी वाटतात. त्यावर आपला हक्क सांगावासा वाटतो, असा एक मुद्दा नेहमी पुढे येत असतो. ही देवळे म्हणजे सारस्वतांची कौटुंबिक मालमत्ता असल्याचाही दावा केला जातो. परंतु ‘लुटालूट’ करूनच त्यावेळच्या प्रबळ समाजांनी (केवळ सारस्वत नव्हे) देवळे ताब्यात घेतली असतील तर देवळांचे पावित्र्य, श्रद्धा, प्रामाणिकपणा याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहणारच. गोव्यातच नव्हे तर जगभर विविध समाजांनी प्रार्थनास्थाने, श्रद्धास्थानांवर कब्जा करून आपली राजकीय सत्ता टिकविली आहे. असे मानतात की पोर्तुगिजांनी देवळे तोडायला सुरुवात केली त्यावेळी एकूणच समाज हतबल होऊन तो प्रकार पाहत राहिला.

श्रद्धावान माणसे म्हणाली, देव त्यांना पाहून घेईल. त्यात त्यांनी सर्वस्व गमावले, दुसरी सश्रद्ध परंतु व्यवहारवादी माणसे देव घेऊन पळाली. समाजातले वेगवेगळे वर्ग त्यात होते! या परिस्थितीला त्यानंतर वेगवेगळे अर्थ देण्यात आले. मंदिरांच्या पुनर्निर्माणातून हिंदूंचे ऐक्य व पोर्तुगीज विरोध प्रस्थापित झाला, असा समज करून देण्यात आला. वास्तविक ही मंदिरे व शक्तिपीठे सांस्कृतिक व जातीय वर्चस्व निर्माण करण्याची केंद्रस्थाने बनली. ज्यावेळी संपूर्ण देशात परकीय सत्तेविरुद्ध संतमहात्मे व त्यांची शक्तिपीठे जनजागरण, जागर व आत्मसमर्पण बलिदान करीत होती, तेव्हा गोव्यातील शक्तिपीठांनी नेमके काय केले, याचा धांडोळा कोणीतरी घ्यायला पाहिजे. त्यांनी ‘देव’ सांभाळले असतील, परंतु समाजाला काय प्रेरणा दिली?

पुजाऱ्यांच्या लुटालुटींसंदर्भातही संशोधकांनी आपल्या अभ्यासातून बरेच निष्कर्ष काढले आहेत. सारस्वतांनी मंदिरांवर नियंत्रण प्राप्त केल्यानंतर उपासना पद्धतीत ब्राह्मणी वर्चस्व लादले. जल्मी, घाडी, गुरव आणि इतर ‘शूद्र’ (त्यावेळच्या व्यवस्थेनुसार) पुजाऱ्यांकडून होणाऱ्या सर्व प्रथांना तिलांजली देण्यात आली. त्यातून वसाहतवादी व्यवस्थेत मंदिरांच्या प्रशासकीय वर्चस्वासाठी नवी कायदेशीर व आर्थिक रचना आकाराला आली...

ज्यावेळी जगभर धर्मव्यवस्था राजकारण्यांनी ताब्यात घेतली, धर्मसत्ता हा राजसत्ता घट्ट बनविण्याचा मार्ग बनला, त्यातून धर्मश्रद्धा अधिक कोमल बनवण्यात आल्या व धर्म, नीती, न्यायाचा पगडा तयार करण्यात आला, या श्रद्धा मानवी प्रगतीच्या, सुधारणांच्या मार्गातील बेड्याच बनल्या आहेत...मानव किंवा विविध मानवी समूहावर कब्जा करण्यासाठी हे राजकारण आता उपयोगी पडू लागले आहे. त्यापासून निसटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मानवाला शुद्ध बुद्धिकसोटीवर आणि बुद्धिप्रामाण्यवादावर उभे करून त्याच्या श्रद्धा तपासण्याची व्यवस्था व्हावी!

मान्य आहे, धर्म-जाती आणि देवालये सुरूच राहतील. राजकारणी त्यावर कब्जा करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधतील. त्याद्वारे समाजावर नियंत्रणही ठेवले जाईल. परंतु देवालयांची व्यवस्था काही प्रमाणात तर काटेकोर, निरोगी व सचोटीची असावी, असा आग्रह धरला जाईल! याबाबत महाराष्ट्रातील शेगाव येथील गजानन महाराजांच्या संस्थानाचे उदाहरण देण्यासारखे आहे. गजानन महाराज हे अवतारी, अवधूत पुरुष होते. त्यांनी जे सूत्र घालून दिले, त्यानुसार या संस्थानाच्या उत्पन्नातून अनेक समाजोपयोगी कामे चालविली जातात.

लाखो लोक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात. त्यांना निकोप दर्शन मिळावे, असाच दृष्टिकोन ठेवून रांगा निर्माण केल्या आहेत. तेथे बसण्याची सोय आहे, ज्येष्ठांचा मान राखला जातो. तान्ह्या मुलांना माता दूध देऊ शकते, रांगेत औषधालयाची सोय आहे. पाणी मिळते, स्वच्छतागृहे आहेत. देणगी देणाऱ्याला तेवढ्याच रकमेचा प्रसाद मिळतो, त्याची व्यवस्थित पावती दिली जाते. गजानन महाराजांच्या सूत्रांनुसार तेथे हॉस्पिटलांचे निर्माण करण्यात आले.

मतिमंदांसाठी विशेष शाळा आहेत, वसतिगृहे आहेत, प्राथमिक शाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्याला मदत मिळते, संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा विमा उतरविण्यात आला आहे. मोठ्या इस्पितळाचा खर्च या विम्यातून भागविला जातो. अनाथांची सोय व गरिबांना भाजी-भाकरीपासून तरुणांच्या व्यवसायाचा विचार असा संपूर्ण समाज निर्माण करण्याचे व्रत तेथे चालविले जाते. जे उत्पन्न येते त्याचा त्याच दिवशी तपशील जाहीर केला जातो. पारदर्शकता आहे.

गोव्यात अनेक जत्रा आता ‘गडगडे’वाले पुरस्कृत करतात. तेथेच दारूची दुकाने थाटलेली असतात. गोव्यातील देवळांमध्ये रात्री उशिरापर्यंत पुरुष मंडळी का गर्दी करीत होती, याचा एक दाखला पोर्तुगीज दस्तऐवजांत सापडतो. नायकिणींचे नाच बघायला पुरुष मंडळींची गर्दी होते, एवढेच नव्हे तर मंदिरांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू असलेला जुगार आपल्याला महसूल प्राप्तीचा नवा स्रोत मिळवून देऊ शकतो, असा विचार पोर्तुगीज सत्ताधीशांच्या मनात आला व त्यानुसार त्या काळात जुगारावर कर बसवून तो अधिकृत बनविण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT