गोवा राज्याचे भाजप अध्यक्ष दामू नाईक यांचा वाढदिवस नुकताच थाटात साजरा झाला. या वाढदिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे दामूंनी केलेला संकल्प. २०२७साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपला २७ जागा मिळवून देण्याचा दामूंचा संकल्प बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावून गेला. संकल्प आणि सिद्धी यात बरेच अंतर असते असे म्हटले जाते. राजकारणात तर याचा बऱ्याच वेळा अनुभव आला आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचेच उदाहरण घ्या. त्यावेळी भाजपने, ‘अबकी बार चारसौ के पार’ असा नारा दिला होता. चारशे सोडा, अडीचशेचा उंबरठा पार पाडताना भाजपच्या नाकी नऊ आले. त्यामुळे संकल्प करणे तसे धारिष्ट्याचे असते. कारण असे संकल्प नंतर थट्टेचा विषय बनू शकतात.
आता गोव्याबद्दल बोलायचे तर, गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जंग जंग पछाडूनही भाजपला दक्षिण गोव्याचा किल्ला मिळवता आला नव्हता ही गोष्ट नजरेआड करता येत नाही. त्यावेळीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्याचा संकल्प केला होता.
पण त्यांना एका जागेवरच समाधान मानावे लागले. आता दामूंनी मोठा संकल्प केला आहे. या २७ जागांत नेमक्या कोणत्या जागा आहेत, हे कळायला मार्ग नसला तरी गेल्या खेपेला जिंकलेल्या २० जागा त्यात असतील अशी आशा बाळगायला हरकत नसावी.
खरे सांगायचे तर भाजपमधला अंतर्गत कलह हेच त्यांचे खरे दुखणे आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यामुळे व त्यांना अवाजवी महत्त्व मिळत असल्यामुळे भाजपचे अनेक मूळ कार्यकर्ते दुखावले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात गटबाजीचे दर्शन घडायला लागले आहे. फोंड्याचेच उदाहरण घ्या. फोंड्यातील भाजपमध्ये सध्या गटबाजी ‘मी’ म्हणू लागली आहे. पालिका, पंचायतींपासून कार्यकर्त्यापर्यंत जिथे तिथे ही गटबाजी अधोरेखित होताना दिसते.
नगरसेवक विश्वनाथ दळवी व विद्यमान आमदार तथा कृषिमंत्री रवि नाईक यांचे पुत्र रितेश एकमेकांना आव्हान देताना अनेक प्रसंगांतून बघायला मिळत आहेत. आता उमेदवारी एकाला मिळाली, की दुसरा बंड करणार हे ओघाने आलेच. आता ते बंड कशा प्रकारचे असणार हे सांगणे सध्या कठीण असले तरी त्या बंडाचा परिणाम भाजपवर होऊ शकतो हे भविष्य वर्तविणे मात्र कठीण नाही. असेच चित्र सध्या सावर्डे, कुडचडे, कुंभारजुवे अशा अनेक मतदारसंघांतही दिसत आहे.
काँग्रेसमधून जे आठ आमदार भाजपमध्ये आले आहेत, त्यांचे भवितव्यही अधांतरी दिसत आहे. कळंगुट व थोडाफार मडगावचा अपवाद वगळता इतर सहाही मतदारसंघातील हे पूर्व काँग्रेस आमदार ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे स्पष्टपणे प्रतीत होत आहे. सामान्य जनतेबद्दल बोलायचे झाल्यास सध्या तरी हा घटक भाजपला विशेष पूरक आहे असे दिसत नाही. मुख्य प्रश्न आहे तो विरोधकांचा. मागच्यावेळी विरोधक एकत्र नसल्यामुळे भाजपला २० जागा मिळू शकल्या हे कोणीही सांगू शकेल.
या २० जागांपैकी सहा जागांवर तर भाजप अगदी काठावर उत्तीर्ण झाला होता हेही तेवढेच खरे आहे. आताही तशीच परिस्थिती होण्याची संभावना दिसत आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा सध्याच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी गोव्यात वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिले आहेतच. हे संकेत भाजपला मागच्या दाराने आणण्याची नांदी ठरू शकतात.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दक्षिण गोव्याची जागा मिळू शकली ती विरोधकांच्या ऐक्यामुळे हे विसरता कामा नये. त्यामुळे आपची स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची घोषणा भाजपच्या पथ्यावर पडू शकते हे कोणीही सांगू शकेल. त्याचबरोबर भाजपमधील अंतर्गत कलह व मूळ भाजप कार्यकर्त्यांची नाराजी यांचे पारडे जड ठरते, की विरोधकांमधली दुही जड ठरते हेही पाहावे लागेल. पण भाजपची त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे त्यांचे सरकार.
राज्यात त्यांचे सरकार असल्यामुळे पुढील वर्षात ते जनताभिमुख निर्णय घेऊन लोकांना आपल्याकडे वळवू शकतात. महाराष्ट्रात जसे भाजप सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर करून महिलांना आपल्या बाजूला वळविले होते. तसा एखादा प्रकार गोव्यातही होऊ शकतो. त्यात परत निवडून आल्यावर भाजपमध्ये जाण्याची विरोधकांची प्रवृत्तीही त्यांच्या मदतीला येऊ शकते.
विरोधकांच्या या प्रवृत्तीमुळे नाही म्हटले तरी बऱ्याच लोकांना, ‘विरोधकांना मत देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपला मत देणे’, असे वाटायला लागले आहे. त्याचाही फायदा भाजपला होऊ शकतो. पण तरीसुद्धा सध्याची परिस्थिती पाहता २७ जागा जिंकणे हे भाजपला वाटते तितके सोपे नाही. अनेक आव्हाने सध्या भाजपला वाकुल्या दाखवत आहेत.
आपला संकल्प प्रत्यक्षात आणायचा असेल तर दामूंनी पुढील सव्वा वर्ष मैदानावर उतरले पाहिजे. जनतेशी संवाद साधला पाहिजे. त्यांची काय दुखणी आहेत ती समजून घेतली पाहिजेत. असे झाले तरच या संकल्पाला आशेचा किनारा दिसू शकेल, एवढे निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.