Goa BJP State President Damu Naik Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Damu Naik: भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांची वर्षपूर्ती आणि फोंड्याची पोटनिवडणूक

Damu Naik Goa BJP Predident: यशस्वी वर्षपूर्ती केली म्हणून दामूंचे अभिनंदन करताना गेल्या वर्षभरापेक्षा कितीतरी अधिक आव्हानांना त्यांना यंदा तोंड द्यावे लागणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आपल्या पदाची वर्षपूर्ती नुकतीच साजरी केली. याकरता त्यांचे ठिकठिकाणी सत्कार झाले आणि होत आहेत. एखाद्या राजकीय पक्षाच्या आणि खास करून भाजपसारख्या अहोरात्र कार्य करणाऱ्या पक्षाच्या दृष्टीने एक वर्ष हा तसा मोठाच काळ.

यात सध्या भाजपचे सरकार असल्यामुळे राज्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींना तोंड देणे ओघाने आलेच. अशावेळी सरकारबरोबर प्रदेशाध्यक्षांचाही कस लागत असतो. दामूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा भार सांभाळल्यानंतरही राज्यात अनेक घडामोडी घडल्या. बऱ्याच घटना या सरकारच्या विरोधात होत्या. पण दामूंनी आपल्या परीने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला यात शंकाच नाही.

दामूंची खासियत म्हणजे त्यांचा मोकळा स्वभाव. त्यांच्यात वास करीत असलेला कलाकार बऱ्याच वेळा डोके वर काढताना दिसतो. एक सिनेनिर्माता तथा कलाकार म्हणून दामूंची जी ओळख आहे तिचा प्रत्यय त्यांच्याशी बोलताना अनेक वेळा येतो.

‘जागोर’हा त्यांनी २००९साली निर्माण केलेला कोकणी चित्रपट त्या काळात बराच गाजला होता. त्यावर्षीच्या इफ्फीतही या चित्रपटाचे प्रदर्शन झाले होते. या खेळाला तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकरांसह अनेक भाजप नेते उपस्थित होते.

त्यावेळचा दामूंचा उत्साह बघण्यासारखाच होता. ‘गुणाजी’, ‘होम स्वीट होम’सारख्या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकाही लोकांनी उचलून धरल्या होत्या. ग्रामीण बाज असलेल्या विनोदी भूमिका तर ते प्रभावीपणे रंगवितात. आणि प्रदेशाध्यक्षपद सांभाळतानाही त्यांची ती विनोदी वृत्ती अधूनमधून बघायला मिळतेच.

म्हणूनच विशेष आक्रमक नसूनसुद्धा ते आपल्या पदाचा कार्यभार गेले वर्षभर यशस्वीपणे राबवू शकले.

नुकत्याच पार पडलेल्या झेडपी निवडणुका भाजपने जिंकल्यामुळे दामूंचे यश अधिकच उठून दिसले. पण त्याचबरोबर दक्षिण गोव्यात भाजपच्या यशाचा आलेख थोडाफार आकुंचित झाल्यामुळे दामूंना या भागातील मतदारसंघात वेगळी रणनीती अमलात आणावी लागणार आहे हेही कळून आले. नाही तरी दक्षिण गोवा म्हणजे भाजपची डोकेदुखी बनली आहेच.

भाजपचा कोणताही प्रदेशाध्यक्ष यावर अजूनपर्यंत तरी ठोस अशी उपाययोजना करू शकलेला नाही. पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘सासष्टी मिशन’ हा उपक्रम सुरू केला होता. पण विशेष काही हाती लागू शकले नाही.

आता दामू काय करतात ते बघावे लागेल. तशी दामूपुढे यावर्षी अनेक आव्हाने दंड थोपटून उभी राहणार आहेत. आणखी काही महिन्यांनी राज्यातील ११ पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. दामूंच्या दृष्टीने या निवडणुकांत यश मिळवणे अपरिहार्य ठरणार आहे. पण त्याहूनही महत्त्वाची ठरणार आहे ती फोंड्याची पोटनिवडणूक!

सध्या फोंड्यात भाजपमध्येच दोन गट पडले असून दोन्हीही गट एकमेकावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यात परत भाटीकरांच्या रूपात मोठे राजकीय वादळही घोंघावताना दिसत आहे. आणि हे पाहता या पोटनिवडणुकीत दामूंचा आणि एकंदरीत भाजप पक्षाचा कस लागणार आहे यात शंकाच नाही.

त्याशिवाय पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही दामूंना प्रमुख योद्ध्याची भूमिका बजावावी लागणार आहे. सध्या अनेक अनिष्ट गोष्टी घडत असल्यामुळे राज्यात भाजप सरकारबाबतीत विशेष अनुकूल मत दिसत नाही.

अनेक मोर्चे, आंदोलने त्यात परत निवृत्त न्यायमूर्ती फर्दीन रिबेलो करत असलेली जनजागृती, यामुळे भाजपविरोधी वातावरण तयार होऊ लागले आहे. आणि निवडणुका जसजशा जवळ येऊ लागतील तसतसे हे वातावरण अधिकच तापायला लागेल यात शंकाच नाही.

आणि त्यामुळे सगळ्या विरोधी पक्षांची युती झाली तर भाजपचे काही खरे नाही असे अनेक राजकीय विश्लेषकांना वाटायला लागले आहे. आता यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक कोणता ‘पॅचवर्क’ करतात हे बघावे लागेल.

हे पाहता यशस्वी वर्षपूर्ती केली म्हणून दामूंचे अभिनंदन करताना गेल्या वर्षभरापेक्षा कितीतरी अधिक आव्हानांना त्यांना यंदा तोंड द्यावे लागणार आहे. या वस्तुस्थितीकडे बोट दाखविल्याशिवाय राहवत नाही. आता दामूतील ‘सुप्त कलाकार’ या आव्हानांना खिशात घालतो का ही आव्हानेच दामूना धोबीपछाड करतात याचे उत्तर मिळण्याकरता आणखी एका वर्षाची वाट पाहावी लागणार आहे, एवढे मात्र निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मुक्या प्राण्यांच्या जिवाची इतकीच किंमत का?" मर्सिडीजनं कुत्र्याला चिरडलं, कोर्टानं केली 150 रुपयांत सुटका! प्राणीप्रेमींचा संताप

NH66 Highway Goa: राष्ट्रीय महामार्ग 66 बाबत नवीन अपडेट! रुंदीकरणाचे काम होणार सुरु; 764 कोटी मंजूर

Terror Attack: 'या' इस्लामिक देशात नरसंहार! 31 निष्पाप नागरिकांची गोळ्या झाडून हत्या; लष्करी राजवटीत हिंसाचाराचा उद्रेक

Goa Russian Murder: एकाच नावाच्या दोन रशियन महिलांची का केली हत्या? मारेकऱ्याच्या आईशी कनेक्शन! खुनाचं गुढ उकललं!

Goa Accident: मद्यधुंद कारचालकाने दिली मांडवी पुलावर धडक! तिघे जखमी, एकाचा मृत्यू; संशयिताविरुध्द सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्‍चित

SCROLL FOR NEXT