सर्वेश बोरकर
गोव्यातील बहुतांश लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वडीलबंधू संभाजी राजांबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. संभाजीराजांचा जन्म महाराष्ट्रातील औरंगाबादपासून जवळच वेरूळ येथे १६१९मध्ये झाला.
त्यांचे लग्न मकाई राणी सायबांशी झाले होते आणि त्यांना दोन मुले होती - सुरतसिंग आणि उमाजी. पुढे १६५४साली संभाजींराजेंच्या मृत्यूनंतर, कर्नाटकातील कोलार या गावांची जहागीर त्यांचा मुलगा सुरतसिंग याच्याकडे चालू राहिली. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरूवर विजय मिळवला तेव्हा त्याचा सावत्र भाऊ व्यंकोजीकडून, त्याने त्याच्या मोठ्या भावाच्या मुलांना कोलारची जहागीर चालू ठेवली.
१६४० ते १६४२पर्यंत बंगळूर शहरात दोन वर्षे घालवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल आणि काळाबद्दल असंख्य नोंदी, पत्रे सापडतात. तथापि, त्याच नोंदींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ संभाजी राजे यांच्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही किंवा जवळजवळ कोणतीही माहिती नाही.
जेव्हा शिवाजीराजे बंगळुरला आले तेव्हा त्यांचे वडील शहाजीराजे भोसले विजापूर सल्तनतमध्ये होते. त्यांनी केम्पेगौडा यांच्या राज्यावर हल्ला केला आणि त्यांना युद्धात पराभूत केले होते. बक्षीस म्हणून, शहाजीराजेंना बेंगळुरचा जहागीरदार म्हणून प्रदेश मिळाला होता. शहाजीराजे त्यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई आणि त्यांचा मुलगा वेंकोजी यांच्यासोबत काही वर्षे येथे स्थायिक झाले.
जेव्हा त्यांच्या पहिल्या पत्नी जिजाबाईंनी त्यांना एक पत्र लिहिले की त्यांचा मुलगा शिवाजी लग्नासाठी पुरेसा वयाचा झाला आहे, तेव्हा शहाजीराजेंनी त्यांना बेंगळुरूला येण्याचे आवाहन केले.१२ वर्षांच्या शिवाजी राजे यांचा विवाह फलटण येथील सईबाई निंबाळकर यांच्याशी बेंगळुर शहरात झाला. शिवाजी महाराजांना मोठा भाऊ संभाजीराजे आणि त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांच्यासोबत राज्यकलेचे आणि व युद्धाचे प्रशिक्षण इथेच दिले गेले असावे.
पुढे शिवाजी महाराजांना उत्तरेकडील शहाजी महाराजांच्या पुणे जहागिरीत परत पाठवण्यात आले, तर दुसऱ्या पत्नी तुकाबाई त्यांचा मुलगा वेंकोजी यांना बेंगळुरूची जहागीर देण्यात आली. शिवाजीराजे आणि संभाजीराजे हे दोघेही पुत्र होते शहाजी आणि जिजाबाईंचे. संभाजीराजे यांच्या आधी चार पुत्र बालपणातच वारले होते. शिवाजीराजे आईसह पुण्यात राहिले आणि संभाजीराजे अनेक वर्षे त्यांच्या वडिलांसोबतच बंगळुरला होते.
१६३८मध्ये जेव्हा आदिलशाही सेनेने बंगळुरवर कब्जा केला आणि केम्पेगौडा यांचा पराभव केला तेव्हा आदिलशाही सेनापती रणदुल्ला खानने विजयाचे श्रेय शहाजींना दिले, जो एक आघाडीचा सेनापतीदेखील होता. रणदुल्ला खाननेच अफजल खानला सिरा येथे पाठवले, तर तो स्वतः पुढे शहाजींसोबत बंगळुरला गेला.
मुहम्मद आदिलशाहांनी रणदुल्ला खान आणि शहाजीराजे यांना इतर संस्थानांवर हल्ला करण्याचे आदेश दिले. त्यांना अफजल खान आणि असद खान यांची मदतही देण्यात आली.१६३७मध्ये रणदुल्ला खानने प्रथम धारवाड आणि लक्ष्मेश्वरच्या राजाशी लढा दिला आणि त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशातील पेनुगोंडा, चंद्रगिरी, अदोनी , तमिळनाडूतील वेल्लोर आणि गिंगे, इक्केरी-बेदानूर, बंगळुरू, कर्नाटकातील कनकगिरी आणि सिरा काबीज केला गेला. रणदुल्ला खान आणि शहाजीराजे यांचे एकमेकांशी चांगले संबंध होते. शहाजीराजेंवर प्रभावित होऊन आदिल शाहने त्यांना बंगळूरची जहागीर दिली.ज्यामध्ये कोलार, चिकबल्लापूर, दोड्डाबल्लापूर या आसपासच्या संस्थानांचाही समावेश होता.
शहाजीराजे बंगळूर येथे थांबले आणि दरबार स्थापन केला. त्याचे मुख्यालय सध्याचे चिकपेट होते जिथे त्याचा गौरी महाल नावाचा राजवाडा होता. लवकरच शहाजींराजे यांनी संभाजी राजेंना कोलारचा राज्यपाल बनवले. त्याच वेळी, शहाजींराजेनी दक्षिणेत हिंदू पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू केली होती. आदिशहाच्या वतीने ज्या पालेगर किंवा नायकांचा प्रदेश जिंकला होता त्यांना त्यांनी मारले नाही तर त्यांनी या प्रांतीय शासकांच्या राजधान्या हिसकावून घेतल्या आणि त्यांना लहान शहरांमध्ये पाठवले.
अशा प्रकारे, त्यांना पालेगरांकडून कृतज्ञता आणि आदर मिळाला. याला एकमेव अपवाद होता तो सिरा येथे जिथे अफझल खानने वाटाघाटी करण्याच्या बहाण्याने कस्तुरीरंगन या शासकाला किल्ल्यातून बाहेर बोलावून विश्वासघाताने त्याची हत्या केली. मुहम्मद आदिल शाहने शहाजीला १६४८मध्ये विजापूरला बोलावून कैद केले, तेव्हा संभाजी राजेंनी जोरदार बचाव केला. बंगळूरमध्ये फरहाद खान यांच्या नेतृत्वाखालील आदिलशाही सैन्याविरुद्ध संभाजीराजे लढले आणि त्यांचा पराभवही केला. तथापि, आदिलशाहला शहाजीराजेना तुरुंगात टाकण्याचा मूर्खपणा लक्षात आला आणि त्याने त्यांना सोडले. त्याने शहाजीराजेंची जहागीरही परत मिळवून दिली.
पुढे बंगळूरला १६५४मध्ये अफझलखानाच्या नेतृत्वाखालील आदिलशाहनी कनकगिरीवर हल्ला केल्यावर संभाजीराजेंचा दुर्दैवी मृत्यू झाला. पालेगर व आपखान यांनी आदिलशाहीविरुद्ध उठाव केला होता. जेव्हा शहाजीराजेंना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा त्यांनी स्वतः कनकगिरीवर कूच केली आणि ते जिंकले. शिवाजीराजांसाठी त्यांच्या मोठ्या भावाचा मृत्यू अत्यंत दुःखदायक होता. जेव्हा त्यांच्या आईने त्यांना संभाजी राजेंच्या मृत्यूत अफजलखानाच्या सहभागाबद्दल सांगितले तेव्हा शिवाजीराजांनी सूड घेण्याची शपथ घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.