Govind Gaude Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Govind Gaude: गावडेंना मतदारांसमोर 'नतमस्तक' व्हावे लागणे, हेही नसे थोडके

Goa Opinion: अहंकार जास्त झाला की अधोगती ठरलेली. मंत्रिपदाची झूल अंगावर चढल्यावर सातवे अस्मान गाठणाऱ्या गावडेंना भाजपने मतदारांसमोर नतमस्तक होण्यास भाग पाडले, हेही नसे थोडके.

गोमन्तक डिजिटल टीम

नटवर्य काशिनाथ घाणेकर यांना ‘मेलोड्रामा’ कधी करावा, याची उत्तम जाण होती. एका लयीत, उंची गाठल्यावर त्यांच्या नाटकांचा पडदा पडत असे. ‘मेलोड्रामा’मुळे नाटकांत यश गाठता येते, हे रंगमंचीय सूत्र निवडणुका जवळ आल्यानंतर राजकीय व्यासपीठांवर दिसू लागते. मनसोक्त हात मारून ‘मी नाही त्यातला’चा सूर आळवणारे छगन भुजबळ ‘मेलोड्रामा’ किंग!

गोव्यात ती कसर गोविंद गावडे यांनी खांडोळ्यात भरून काढली. पहिल्या वाक्यापासून गावडे यांनी देहबोली व अभिनिवेश पाहिल्यावर लोकांना निवडणुका जवळ आल्या की काय, असाच भास झाला असल्यास नवल नसावे. हकालपट्टी झालेले गावडे काहीतरी मोठी घोषणा करतील, अशी अटकळ होती; पण प्रत्यक्षात फुसका बार निघाला.

मंत्रिमंडळातून अपमानास्पदरीत्या बाहेरचा रस्ता दाखवला गेल्यानंतर गावडेंनी जी स्वाभिमानाचा भाषा केली होती, ती लक्षात घेता ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन करारी बाणा दाखवतील, असे अनेकांना वाटले होते.

पण, राजकीय अस्तित्वाच्या काळजीतून पक्षात राहूनच नेत्यांना दर्पोक्ती देण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. एखाद्या संहितेला साजेशा भाषणात आपण स्वच्छ, निर्दोष असल्याचा निर्वाळा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण त्यासाठी हातचे राखून दिलेले संदर्भ पुरेसे नव्हते.

आक्षेपाच्या मुद्यांवर एक अवाक्षर ते बोलले नाहीत. बहुचर्चित कला अकादमीच्या मुद्याला साधा स्पर्शही केला नाही. कला अकादमीवर कोट्यवधी खर्चून पुरती रया घालवली. आब, शान पुरती धुळीस मिळाली. तो गोव्याचा अपमान ठरला.

कला व संस्कृती खात्याचे मंत्री (माजी) या नात्याने तुमच्यावर टीकेची राळ उठली. या संदर्भात तुम्हाला बोलावेसे वाटले नाही? उटा आंदोलनाला काही दिशा मिळेल, अशी आशा बाळगलेल्यांची देखील पुरती निराशा झाली. भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भलावण व स्थानिक नेत्यांना उपद्रव मूल्याची जाणीव करून देण्याचा गावडे यांचा तोकडा प्रयत्न व अनुसूचित जमातीचा हुंदका नाटकी भासला.

शेळ-मेळावलीत ‘आयआयटी’विरोधी आंदोलनात अनुसूचित जमातीच्या लोकांना जेव्हा आदिवासी कल्याण खात्याची गरज होती तेव्हा मंत्री नात्याने गावडे उभे राहिले नव्हते, हे लोक विसरलेले नाहीत.

गोव्यात अंत्योदय तत्त्वावर चालणारे, बहुजनांचे सरकार असे बिरुद मिरवणाऱ्या गावडे यांना विष्णू वाघ सोयीस्करपणे आठवले. याच वाघांची कलासक्त दृष्टी त्यांना आत्मसात करता आली नाही वा त्यांच्या आठवणींसाठी शाश्वत उपक्रम राबवण्याची इच्छा झाली नाही.

‘देवाण-घेवाणीनंतरच फाईल हातावेगळ्या करणारे आदिवासी कल्याण खात्यातील ‘ते’ अधिकारी कोण, याचा उलगडा करावासा वाटला नाही. एकूण काय तर हवे ते टाळले. केवळ मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्षांवर टीका केली. ती पुढेही ते करतच राहतील.

तसे झाल्यास पक्ष कसा बरं त्यांना ठेवेल? आणि हीच संधी गावडे यांना हवी आहे. तसे झाल्यास आपल्यावर अन्याय झाल्याची आरोळी ठोकण्यास ते मोकळे. भाजपलाही हे पक्के ठाऊक आहे. म्हणूनच विश्वास सतरकर यांना भाजपचे उपाध्यक्ष पद देऊन प्रियोळात गावडेंसमोर आव्हान उभे केलेय.

कालच्या भाषणात गोविंद गावडेंनी प्रत्येक शब्दातल्या प्रत्येक अक्षरावर - अगदी शेवटच्या अक्षरावरही - जोर देत ते सुटे सुटे, स्वच्छ व स्पष्ट उच्चारले. पण, तेवढी स्पष्टता व स्वच्छता विचारांत नव्हती. भाजपशिवाय स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाही, हेच त्यांनी वेगळ्या शब्दांत मान्य केले. वस्तुस्थितीही तशीच आहे.

गावडेंना भाजपपासून दूर जाऊन स्वत:ची लढाई स्वतंत्रपणे लढायची नाही आणि भाजपलाही काढून टाकून त्यांना मोठे करायचे नाही. मग, हाती उरतो फक्त मारल्यासारखे व रडल्यासारखे करण्याचा मेलोड्रामा.

‘आपल्यावर अन्याय म्हणजे समाजावर अन्याय’ हा सिद्धांत, समाजासाठी केलेल्या कार्यावर मोजला जातो. व्यक्तिगत अन्यायासाठी समाज पाठीशी उभा ठाकतो का, हे त्या व्यक्तीचे कार्य, तळमळ व जमिनीवर असलेले पाय ठरवतात. ‘राजकारण शिकवू नये’ म्हणताना आपले राजकीय शिक्षण कितपत झालेय ते आधी तपासावे लागते.

रात्री दोन वाजता जागून, सकाळी लवकर उठून विद्यार्थ्यांचा अभ्यास होतो, राजकारण नाही. राजकारण्याला दिवस रात्र कार्य करतच राहावे लागते. अहंकार हा जेवढे कार्यकर्तृत्व आहे तेवढाच शोभून दिसतो, त्यापेक्षा जास्त झाला की अधोगती ठरलेली. मंत्रिपदाची झूल अंगावर चढल्यावर सातवे अस्मान गाठणाऱ्या गावडेंना भाजपने मतदारांसमोर नतमस्तक होण्यास भाग पाडले, हेही नसे थोडके.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

SCROLL FOR NEXT