Bits Pilani Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Bits Pilani: 'कुठल्याही विद्यापीठाला, गोव्याला अशा घटना परवडणार नाहीत'! ‘बिट्स’ कॅम्पसचे पैलू; वास्‍तव आणि समस्‍या

Bits Pilani Goa Student Death: सांकवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये ऋषी नायर या वीस वर्षीय विद्यार्थी मृतावस्थेत आढळला. गत नऊ महिन्यांमधील ही पाचवी घटना आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सांकवाळ: सांकवाळ येथील ‘बिट्स पिलानी’ ही अग्रगण्य तांत्रिक व संशोधन संस्था विद्यार्थी मृत्‍यूंच्‍या सत्रामुळे चर्चेत आली आहे. असे का घडत आहे, याचा संस्‍थेशी निगडित अभ्‍यासकाने केलेला ऊहापोह.

सांकवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये ऋषी नायर या वीस वर्षीय विद्यार्थी मृतावस्थेत आढळला. गत नऊ महिन्यांमधील ही पाचवी घटना आहे.

ही सामान्य घटना नाही आणि तिला ‘कॅम्पस लाईफ’चा भाग म्हणून दुर्लक्षही करता येणार नाही. अशा प्रत्येक अनैसर्गिक मृत्यूमुळे एक मूलभूत प्रश्न समोर येतो: संस्थेची रचना कशी आहे आणि विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने आधार दिला जाऊ शकतो?

समुपदेशन आणि मानसिक आरोग्य सेवांची गरज यावर आधीच खूप चर्वितचर्वण झाले आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. माझा मुद्दा ‘कॅम्पस लाईफ’मधील इतर पैलूंवर आहे; असे पैलू जे विद्यार्थ्यांवर येणारे दबाव, ताण प्रसवत राहतात.

ढोबळमानाने अशा घटनांबाबत दोन कारणे दिली जातात. एक शैक्षणिक दबाव आणि दुसरे कारण अमली पदार्थांचे सेवन किंवा मद्यपान. दुसरे कारण अजिबात स्तुत्य नसले, तरी काही अंशी सत्य आहे. पण ते अन्य विद्यापीठांच्या बाबतही आहेच की!

मूलभूत प्रश्न शैक्षणिक संरचनेचा आहे. विशेषतः सापेक्ष मूल्यांकनप्रणालीचा. (रिलेटिव्ह ग्रेडिंग) पूर्वी भारतातील बहुतांश कॉलेजांमध्ये निश्चित उत्तीर्ण-अनुत्तीर्ण प्रणाली होती. उदा. ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाल्यास प्रथम श्रेणी, ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांना द्वितीय श्रेणी आणि ४० टक्क्यांपेक्षा खाली गुण असलेले सरळ नापास. सर्व काही थेट व स्पष्ट होते.

विद्यार्थ्यांचे गुण हाच निकाल; पण बिट्स आणि इतर आधुनिक, नव्या संस्थांमध्ये सापेक्ष मूल्यांकन प्रणाली आहे. इथे विद्यार्थ्याची श्रेणी मिळवलेल्या गुणांवरच नव्हे, तर इतर विद्यार्थ्यांच्या गुणांवरही अवलंबून असते.

समजण्यास सुलभ व्हावे म्हणून आपण क्रिकेटच्या उदाहरणाचा वापर करू. तुम्ही ८० धावा केल्या असतील; पण जर इतर सर्वांनी ९०-१०० केल्या असतील, तर तुमच्या ८० सरासरी मानल्या जातील; परंतु जर खेळपट्टी साथ देणारी नसेल आणि इतरांनी फक्त ३०-४० धावा केल्या असतील, तर तुमचे ८० उत्कृष्ट ठरतील.

या प्रणालीमध्ये कट-ऑफ संपूर्ण वर्गाच्या कामगिरीनुसार ठरतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना कधीच खात्री नसते, की त्यांच्या गुणांनुसार त्यांना कोणती श्रेणी मिळेल. ही अनिश्चितता प्रचंड तणाव निर्माण करते!

विद्यार्थ्यांना थोडेसे गुण किंवा श्रेणीमुळे त्यांच्या भविष्यात मोठा फरक पडतो असे वाटते. खास करून नोकरी किंवा पुढील शिक्षणाच्या दृष्टीने. ही समस्या केवळ बिट्सपुरती मर्यादित नाही. भारतातील अनेक प्रमुख अभियांत्रिकी आणि विज्ञान संस्थांमध्ये ही प्रणाली वापरली जाते.

मात्र, इतर देशांमध्ये याचा पुनर्विचार केला जात आहे. उदाहरणार्थ, ‘हॉर्वर्ड मेडिकल स्कूल’ने आपल्या पूर्व-क्लिनिकल अभ्यासक्रमासाठी पुन्हा ‘पास-फेल’ प्रणाली स्वीकारली आहे. ‘येल’नेही तसेच केले आहे. यातून एक सुवर्णमध्य गाठणे शक्य आहे: पहिल्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना जुळवून घेण्यासाठी पास/फेल प्रणाली आणि नंतर श्रेणी आधारित मूल्यांकन.

गोव्यातील बिट्समध्ये गेल्या वर्षभरात जे काही घडले आहे, ते पाहता संस्थेला यावर विचार करावा लागेल.

‘विद्यार्थ्यांच्या आंतरिक व बाह्य हालचालींवरील बंधने’ हा गोव्यातील बिट्स कॅम्पसचा आणखी एक निराळा पैलू आहे, ज्यावर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. शून्य उपस्थिती (झिरो अटेन्डन्स) कॅम्पसला मान्य आहे; पण विद्यार्थ्यांच्या बाहेर जाण्यावर बंधने आहेत. ‘विक-डे’ला विद्यार्थ्यांना संध्याकाळी ५ वाजण्यापूर्वी बाहेर जाता येत नाही आणि रात्री १०:३० पर्यंत परत येणे बंधनकारक आहे. परतण्याची वेळ, एकवेळ योग्य म्हणता येईल; पण दिवसभर बाहेर जाण्यास बंदी ही बाब आकलनापलीकडची आहे.

तसे पाहू जाता, कॅम्पसचा गोव्याशी फारसा संपर्क नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळजवळ नाहीच. खासगी वाहन नसलेले विद्यार्थी टॅक्सीचे महागडे भाडे भरतात किंवा चालत महामार्गावरून वेर्णा किंवा दाबोळीपर्यंत जातात.

त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रत्यक्षात कॅम्पसमध्येच अडकून पडतात. ही अडकलेली अवस्था विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण अधिकच वाढवते. कॅम्पसच्या आत परीक्षा म्हणजे जणू जीवन-मरणाचा प्रश्न वाटतो.

बाहेर जाऊन अशा अभ्यासक्रमाशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या लोकांशी संवाद साधणे, हे फार आवश्यक असते. पणजी किंवा मडगावकडे जाण्यासाठी नियमित शटल सेवा असेल, तर तो एक सोपा उपाय ठरू शकतो. इतर ग्रामीण भागांत असलेल्या विद्यापीठांनी हे आधीच ओळखले आहे.

याशिवाय, ‘अभियांत्रिकी पदवीची किंमत काय आहे?’, ‘जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीचे परिणाम काय असतील?’, ही सगळ्या भारतातील विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली व्यापक समस्या आहे. वेगाने बदलत चाललेल्या जगात आज जे आपण शिकतोय ते शिकून बाहेर पडल्यावर कालबाह्य झाल्यास या शिक्षणास, घेतलेल्या कष्टांना अर्थ तो काय राहील, हा विचार छळतो.

आणखी आत्महत्या परवडणार नाहीत

बिट्सला, कुठल्याही विद्यापीठाला आणि गोव्यालाही विद्यार्थ्यांच्या आणखी आत्महत्या परवडणार नाहीत. म्हणूनच लवकरात लवकर संरचनात्मक बदल करून आणखी ‘कुशाग्र’, ‘ऋषी’ आपले जीवन अकाली संपवणार नाहीत, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जे महत्त्वाचे आहे, ते तातडीचे होईपर्यंत थांबणे आता परवडणार नाही!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT