यशोधरा काटकर
श्री नागेश आणि महालक्ष्मीला वंदन करून समोरचा पडदा दूर करण्यात आला, सुभाषने एन्ट्री घेतली. समोर गंभीर चेहरे करून बसलेले काका, काकी, आई आणि शेजारीपाजारी पाहून त्याची घाबरगुंडी उडाली, तरी त्याने नेट लावून तोंड उघडले , पहिलेच वाक्य बोलला, ‘माझ्या भैणीच्या स्वार्थत्यागाला तोड नाही...’
गोव्यातल्या प्रत्येक गावात एक नाट्यमंडळ आणि फुटबॉल क्लब असतोच. आमच्या बांदोड्यातही ‘श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज’ अनेक वर्षे कार्यरत आहे. गोव्यातला माणूस मुळातच उत्सवप्रेमी, त्यात सण, यात्रा,जत्रा आल्या की आमच्या उत्साहाला जे काही उधाण येते, की विचारू नका. महालक्ष्मी देवस्थानच्या रामनवमीच्या उत्सवात कोकणी-मराठी नाटकं ,गायन, भजन-कीर्तन,घुमट वादन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.
ही ‘उत्सवी’ रंगभूमी गोमंतकीय संस्कृतीचे भूषण,आमच्या अंत्रुज महालातल्या उत्सवी आणि राज्य नाट्यस्पर्धा रंगभूमीवरून अनेक नाट्यलेखक, दिग्दर्शक अभिनेते, नेपथ्यकार आणि संगीतकार उदयाला आले आहेत. या परंपरेत मनापासून रमलेली आमच्या घरातली एकमेव व्यक्ती म्हणजे आमचा धीरेन काका. भरपूर उंची, देखणा चेहरा आणि कुरळ्या केसांचे वरदान असलेला धीरेनकाका हीरोच होता अगदी. त्याची नोकरी कृषी खात्यात पण याला नाटकात काम करण्याची भारीच हौस ! या तालमी आमच्या सालात व्हायच्या.
धोतर, कुर्ता आणि जाकीट घातलेले बुकीमामा नागेशीच्या तळीकडून तुरुतुरु चालत येताना दिसले की समजायचे की आज घरी नाटकाची तालीम आहे .आता बुकीमामा म्हणजे नाटकात मुरलेली असामी, नाट्यदिग्दर्शक आणि उत्कृष्ट तबलावादक अशी त्यांची ख्याती . नाटक बहुदा मराठीतल्या एखाद्या मातब्बर लेखकाचे, बहिणभावाच्या आदर्श प्रेमाची आदर्श गाथा असलेले होते. धीरेनकाकाचा संवाद सुरू झाला.
‘माझ्या भैणीच्या ...’ ‘धीरेन ,भैणीच्या नाही, बहिणीच्या ...घे बघू परत’‘माझ्या भैणीच्या स्वार्थत्यागाला तोड...’‘अरे धीरेन, बहिणीच्या... ब-हि-णी-च्या ,समजलं ?’ ‘तेच तर म्हणतोय मी भैणीच्या...’ ‘अशें कितें करता धीरेनबाब, बहिणीच्या ....ब-हि-णी-च्या ...समजलें ?’ त्या बहिणी-भैणीच्या द्वंद्वात अडकलेल्या बुकीमामांची तारांबळ बघून इकडे दारामागे लपून बघणाऱ्या मुलांची हसून हसून मुरकुंडी वळली होती.
एकदा आमच्याही अंगात भूत शिरले, ठरलं की आपण सुद्धा नाटक करायचे,सगळी मजा मोठ्यांनीच का म्हणून करावी ? मग एकदम जोशात येऊन बहीणभावाच्या प्रेमाचे नाटक शोधून ,त्यातला एक अंक काढून आमच्या आम्हीच तालमी केल्या. मला आता नीटसे आठवत नाही, पण भावाच्या भूमिकेत बहुतेक सुभाष होता, मग कुणी बहीण, कुणी बहिणीची मैत्रीण वगैरे. प्रयोगाची तारीख जाहीर करून सगळ्यांना आमंत्रणे दिली गेली.
आईच्या साड्या, पप्पांचे कुडते घालून आम्ही ‘तयार’ झालो. जसजशी वेळ जवळ येत गेली आमची घाई आणि उत्कंठा वाढत गेली. ठरलेल्या वेळी सगळी मोठी मंडळी सालात जमली.श्री नागेश आणि महालक्ष्मीला वंदन करून समोरचा पडदा दूर करण्यात आला, सुभाषने एन्ट्री घेतली. समोर गंभीर चेहरे करून बसलेले काका, काकी, आई आणि शेजारीपाजारी पाहून त्याची घाबरगुंडी उडाली, तरी त्याने नेट लावून तोंड उघडले , पहिलेच वाक्य बोलला, ‘माझ्या भैणीच्या स्वार्थत्यागाला तोड नाही...’ आणि स्वतःचे साफ चुकले हे लक्षात येत पुढचे सगळे संवाद पार विसरून गेला. सालात क्षणभर एकदम चिडीचुप शांतता पसरली. स्तब्धता.
टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल म्हणजे काय असते ते नीटच कळण्याइतपत स्त-ब्ध-ता. आणि अचानक प्रेक्षकवर्गातून अचानक हास्याचा फक्त एकच मोठा फवारा उसळला. सगळ्यांच्या नजरा झूमकन वळल्या,सगळ्यात मागे बसलेला धीरेनकाका हा हा हा हा... हसत अक्षरशः कोलमडला होता. त्याला हास्याचा इतका मोठा ठसका लागला होता ,की सगळा चेहरा लालबुंद होत, डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या होत्या.
हे नेमके काय घडले हे प्रेक्षकांमधल्या कोणालाच कळले नाही. विंगेतून बघणाऱ्या चोरमंडळींना मात्र ते बरोब्बर समजले, त्यांनी घाईघाईने पडदा टाकत नाटक गुंडाळूनच टाकले. मग आम्ही सर्वांनी मिळून सुभाषला धोपटले. ते आईपप्पांना समजल्यावर त्यांनी अर्थातच मला धोपटले.
गोमू,भुत्यामामा आम्ही दिसलो रे दिसलो की फिदीफिदी करत दात काढायचे. आमचे रडके चेहरे मुंबईला परत येईप र्यंत्त तसेच राहिले. धीरेनकाका मात्र, भारीच खुशीत होता.पुढे आम्ही सुट्टीत बांदोड्याला गेलो की तो हमखास विचारायचा ,‘काय गं ,यावर्षी नाटक नाही का तुमचं?’ अंत्रुज महालातले भावी अभिनेता -दिग्दर्शक बनण्याची संधी गमावलेले खेळाडू मुकाट पळ काढायचे. करतील काय बिचारे?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.