मिलिंद म्हाडगुत
श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज, बांदोडे ही तशी गोव्याच्या नाट्य क्षेत्रातील एक आघाडीची संस्था. कला अकादमीच्या कोकणी नाट्य स्पर्धेत ‘फायनल ड्राफ्ट’ या नाटकात फक्त दोनच पात्रे. या नाटकाचे मूळ लेखक गिरीश जोशी. मुकेश थळी यांनी या मराठी संहितेवर कोकणी संस्कार केले आहेत.
थळी आणि नागेश महालक्ष्मी यांचे ऋणानुबंध तसे फार जुने. या संस्थेतर्फे सादर केलेली बहुतेक कोकणी नाटके ही थळी यांचीच. एक प्राध्यापक आणि त्याची विद्यार्थिनी यांची ही कहाणी. या विद्यार्थिनीचे शिक्षणाकडे लक्ष नसते, म्हणून अकादमीचा प्राध्यापक तिला घरी बोलवतो आणि तिला तीन दिवसांत कथेचा ड्राफ्ट लिहून आणायला सांगतो.
पण तो ड्राफ्ट म्हणजे तिचीच आत्मकथा असे वाटल्यामुळे तो तिच्यावर डाफरायला लागतो. यातून बरेच उलगडे होतात. थोडीफार भावनिक गुंतागुंतही होऊ लागते. संसारात सुखी नसलेल्या प्राध्यापकाच्या भावविश्वाचेही बोलण्यातून दर्शन होते. मुलगी त्याला स्वतःबाबत खोटे सांगत असल्याचे नंतर कळते.
यातून दोघेही एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचे दिसून येते. प्राध्यापक व त्या मुलीचे एकमेकांवर चिडणे, परत एकत्र येणे, असे नाटकभर सुरू राहते. मुलीला अपघात झाल्यानंतर प्राध्यापक तिला आपल्या घरी घेऊन येतो. त्यातून त्याच्या भावविश्वाचा प्रत्यय येतो.
नंतर ती मुलगी कथेचा ‘फायनल ड्राफ्ट’ घेऊन येते आणि आपली ही कथा एका निर्मात्याला पसंत पडली असून तो त्याच्यावर चित्रपट बनविणार आहे, असं सांगते. तसेच प्राध्यापकाची इच्छा नसतानाही त्याला कथेचा तो ‘फायनल ड्राफ्ट’ वाचून दाखवते.
त्यातून त्यांचे एकमेकांशी असलेले लागेबांधे स्पष्ट होतात. कथेचा शेवट मात्र ‘आपल्या पद्धतीने’ करून ती ‘हॅप्पी एंडिंग’ करते. जवळजवळ १५ वर्षे काहीच न लिहू शकलेले प्राध्यापक आपले जुने साहित्य त्या मुलीला आवडले, या खुशीत नवीन नाटक लिहितात आणि नाटक ‘पॉझिटिव्ह नोट’वर संपते. हे नाटक अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी खुलवले आहे.
‘ती’ दोघे बोलत असताना पाववाल्याचा हॉर्न वाजणे, आल्यावर प्रत्येकवेळी प्राध्यापकाने त्या मुलीला कॉफी देणे, मधे मधे प्राध्यापकाच्या बायकोचा फोन येणे व फोनवरच तिच्यावर ओरडणे, प्राध्यापकाने म्हटलेली वाक्ये परत तशीच बोलून विद्यार्थिनीने चेंडू प्राध्यापकाच्या रिंगणात टाकणे, एकमेकांवर ओरडत असताना भावनाप्रधान होणे, यांसारख्या गोष्टींमुळे नाटकाची उंची वाढायला मदत झाली.
थळी यांनी प्रचलित कोकणी शब्द वापरून तसेच संहितेला अस्सल गोमंतकीय साज देऊन एक चांगले नाट्य निर्माण करण्यात यश मिळविले. सुशांत नायक यांनीही संहितेतील बारकावे ओळखून दिग्दर्शन केले. दोनच पात्रे असल्यामुळे संपूर्ण रंगभूमीचा वापर करणे शक्य नाही, हे जाणून नायक यांनी मंचच्या अर्ध्या भागात सेट उभारून त्याचा प्रभावीपणे वापर केला.
मुलीचे जाता जाता थांबून परत वळणे, बचाव करण्याकरता शब्द नसल्यावर वैतागून प्राध्यापकाने त्या मुलीकडे पाठ करून खुर्चीवर बसणे, यांतून दोघांमधला संघर्ष अधोरेखित होतो. प्राध्यापक झालेले सुशांत नायक त्या भूमिकेला चांगलेच शोभले.
मुलीशी बोलताना मधे मधे सुटलेला तोल, बायकोशी फोनवरून बोलताना होणारा वैताग, अकादमीमध्ये योग्य वागणूक मिळत नसल्यामुळे होणारा त्रागा आणि एकंदरीतच बदललेल्या स्थितीमुळे आलेले नैराश्य हे नायक यांनी प्रभावीपणे प्रकट केले. पण खरे कौतुक करावे लागेल ते विद्यार्थिनी झालेल्या डॉ. संस्कृती रायकर यांचे.
नायकांसारख्या कसलेल्या कलाकारासमोर त्या समर्थपणे उभ्या राहिल्या हे विशेष. सुरुवातीला काहीशी गोंधळलेली; पण नंतर आत्मविश्वास प्राप्त केलेली विद्यार्थिनी रायकरनी ताकदीने उभी केली. जिथे संवाद नाहीत, तिथे त्यांनी मुद्राभिनयाचा आधार घेतला. त्यामुळेच अपघातामुळे पाय दुखावल्यानंतरचा त्यांचा मुद्राभिनय प्रेक्षकांकडून दाद घेऊन गेला.
नवोदित असूनही रायकर छाप सोडून गेल्या. या दोघांची ‘जुगलबंदी’ रंगल्यामुळे नाटकाला खरा ‘गेट अप’ प्राप्त झाला. साहिल बांदोडकर यांची प्रकाश योजना, अमोघ बुडकुले यांचे नेपथ्य, तानाजी गावडे यांचे पार्श्वसंगीत पूरक असे होते. मात्र, वेशभूषेकडे अधिक लक्ष द्यायला हवे होते. मर्यादा असूनसुद्धा नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाजने सृजनशील आविष्कार सादर करून स्पर्धेची रंगत वाढविली. त्याकरता संस्थेच्या संपूर्ण संचाचे अभिनंदन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.