Utpal Parrikar and Laxmikant Parsekar  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांच्या बंडाचा भाजपवर परिणाम काय?

भाजपतर्फे राज्याचा मुख्यमंत्री झालेली व्यक्ती भाजपच्याच विरोधात उभे राहते ही बाब अनाकलनीय म्हणावी लागेल.

दैनिक गोमन्तक

मांद्रेत दयानंद सोपटे व पणजीत बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी मिळाल्यामुळे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व मनोहर पर्रीकर पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. दोघांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आहे. यामुळे भाजप धर्मसंकटात पडणार की काय हा सवाल उपस्थित झाला आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपच्या उमेदवारीवर मांद्रेतून चारवेळा निवडून आलेले आमदार. (Utpal Parrikar and Laxmikant Parsekar Latest News)

पर्रीकर सरंक्षणमंत्री म्हणून दिल्लीत (Delhi) गेल्यावर पार्सेकरच मुख्यमंत्री झाले होते. मात्र 2017 मध्ये मुख्यमंत्री असतानाच त्यांचा कॉग्रेसच्या दयानंद सोपटेकडून तब्बल सात हजाराहून अधिक मतांनी दारुण पराभव झाला होता. 2022 साली आपण या पराभवाचा वचपा काढणार असे त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. पण 2019 साली सोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे समीकरणे बदलली. व पार्सेकरांच्या उपेक्षेला सुरुवात झाली. 2019 सालच्या पोटनिवडणूकीत सोपटे विजयी झाल्यानंतर ही उपेक्षा पुढे चालूच राहिली. आणि आता सोपटेंना उमेदवारी जाहीर करून भाजपने या उपेक्षेचे प्रात्यक्षिक दाखवून दिले आहे. अर्थात सोपटेची उमेदवारी ही अनपेक्षित बाब असे म्हणता येणार नाही. याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत होते. त्यामुळे आता पार्सेकर सर अपक्षाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

भाजपतर्फे (BJP) राज्याचा मुख्यमंत्री झालेली व्यक्ती भाजपच्याच विरोधात उभे राहते ही बाब अनाकलनीय म्हणावी लागेल. पण सध्याच्या राजकारणात अनेक अनाकलनीय बाबी प्रत्यक्षात यायला लागल्या आहेत. जिंकण्याची क्षमता हा सध्या भाजपचा उमेदवारी देण्याचा निकष बनला आहे. यामुळेच ही उमेदवारी सोपटेंना दिली असावी. पण पार्सेकर रिंगणात उतरल्यास भाजपवर काय परिणाम होईल हे बघावे लागेल. सध्या मांद्रेत लढत भाजप व मगोत होणार आहे.या लढतीला जर पार्सेकरांच्या उमेदवारीचा कोन मिळाला तर पारडे मगोपच्या बाजूने झुकू शकते. ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ या उक्तीप्रमाणे सोपटे पार्सेकरांच्या ‘द्वंदा’चा फायदा मगोपचे जीत आरोलकर घेऊ शकतात. हे पाहता ‘तुला नको मला नको घाल कुत्र्याशी’ या म्हणीची आठवण येते.

वास्तवीक मांद्रेत भाजपची बुथ यंत्रणा सशक्त आहे. तिथे भाजपचे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ‘वन टू वन’ लढत झाल्यास भाजपला हरविणे तसे सोपे नव्हते. पण आता पार्सेकर सर दंड थोपून उभे राहिल्यास भाजपला हा मतदारसंघ गमवावा लागेल असे वाटते. पणजीत परिस्थिती वेगळी आहे. तिथे पर्रीकर पुत्र उत्पल हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहे. बाबुशांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे उत्पल नाराज असल्याचे स्पष्ट आहे. त्यांना शिवसेना (Shiv Sena) व आपने पाठिंबा दिला असला तरी गाठ शेवटी बाबुशाची असल्यामुळे त्यांच्या पुढे असलेले आव्हान वाटते तेवढे सोपे नाही. पणजी हा स्व. मनोहर पर्रीकरांचा बालकिल्ला म्हटले जात असले तरी पर्रीकर 2012 सालचा अपवाद वगळता पणजीत कधीच मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले नव्हते. त्यांचे प्रतिस्पर्धी सुध्दा बहुधा दुबळेच असायचे. पण म्हणून पर्रीकरांना उमेदवारी नाकारण्याचे कोणच धाडस करू शकला नव्हता. याचे कारण म्हणजे पर्रीकर हे गोव्यातील भाजपचे सर्वेसर्वा होते. तशी आज स्थिती नाही आहे.

आज भाजप गोव्यात बराच स्थिरावलेला आहे. त्यामुळे त्यांना पर्रीकरांची वा पर्रीकरांच्या पूर्वीच्या ‘ग्लॅमर’ची गरज वाटत नाही. याच कारणाकरिता त्यांनी उत्पलांशी ‘पंगा’ घेतल्याचे दिसते आहे. बाबुशांवर कितीही आरोप असले तरी त्यांच्याकडे असलेली जिंकण्याची क्षमता कोणच नाकारू शकत नाही. त्याचबरोबर आपल्या विरोधकाला कसा ‘चितपाट’ करावा हे ही ते जाणतात. म्हणूनच तर काल परवापर्यंत पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर यांना उमेदवारी देण्याची बाता करणाऱ्या कॉग्रेसला (Congress) शेवटी कुंकळ्ळीहून एल्विस गोम्स यांना ‘आयात’ करावे लागले. यातून आपल्या विरोधात दुर्बल उमेदवार करण्याच्या गेमीत बाबुश कसे यशस्वी होतात हे दिसून येते.यामुळे बाबुशांपूढे आव्हान असे नाहीच. उत्पल जरी रिंगणात उतरले तरी पणजीतील भाजपचे किती कार्यकर्ते त्यांच्या मागे राहतील हे बघावे लागेल. पण उत्पलच्या अपक्ष उमेदवारीचा संदेश गोवा भर जाऊ शकतो यामुळे पणजी जरी हातात आली तरी गोव्यातील काही मतदारसंघ भाजप गमावू शकतो. पण सध्या भाजप हा व्यावहारिक पक्ष बनला आहे. मोठे मोठे दिग्गज राजकारणी आपल्या कळपात आणून भाजपनी आपली व्यावसायिकता दाखवली आहे. आता उत्पलच्या व पार्सेकरांच्या बंडाला ते कोणत्या रणनीतीने उत्तर देतात हे येत्या काही दिवसात कळून येईल हे निश्चित.

- मिलिंद म्हाडगुत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT