Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'मगोचा बालेकिल्ला मडकईतील समीकरणे बदलणार'

सुदिन ढवळीकरांचा प्रचार सुरु; 'चाय पे चर्चा'द्वारे रवी नाईक यांचा एल्गार

दैनिक गोमन्तक

फोंडा : मडकई मतदारसंघ हा जरी मगोपचा बालेकिल्ला असला, तरी यावेळी समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मडकई मतदारसंघावर सुदिन यांची चांगली पकड आहे हे गेल्या पाच विधानसभा निवडणुकांद्वारे स्पष्ट होते. त्यामुळे पूर्वीच्याच जोमाने त्यांनी प्रचारालाही सुरवात केली आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपला पूर्वीचा ‘चाय पे चर्चा’ हा उपक्रम पुन्हा सुरू करून मडकईत मुसंडी मारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मडकईत सध्या तरी सुदिन रवींच्या संभाव्य लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) हे मडकईचे विद्यमान आमदार. पाच वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले असून सहाव्या वेळा निवडून येण्याच्या तयारीला लागले आहेत. 1999 साली भाजपच्या श्रीपाद नाईक यांचा फक्त सहाशे मतांनी पराभव करून त्यांनी पहिला विजय प्राप्त केला होता, पण 2002, 2007 व 2017 साली त्यांनी एक हाती विजय मिळवला होता. 2017 साली तर त्यांनी 15 हजारांची विक्रमी विजयी आघाडी प्राप्त केली होती. मात्र, 2012 साली रवी नाईक पुत्र रितेश यांनी सुदिन यांची बऱ्यापैकी ‘दमछाक’ केली होती. त्यावेळी केवळ दोन महिन्यातच रितेश यांनी पावणेआठ हजार मते मिळविली होती. कवळे, बांदोडा, दुर्भाट - आडपई - आगापूर, वाडी - तळावली मडकई व कुंडई या सहा ग्रामपंचायती मडकईत येतात.

नुकताच सुदिनांनी बांदिवडे येथील महालक्ष्मीला नारळ ठेऊन अधिकृतरित्या प्रचाराला सुरवात केली, तर माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी ‘चाय पे चर्चा’ हा उपक्रम परत सुरू करून मडकईत उडी घेण्याची शक्यता निर्माण केली. खरे तर त्यांचा उपक्रम जून महिन्यात बराच लोकप्रिय ठरला होता, पण नंतर तो उपक्रम बंद झाल्यामुळे त्यांनी मडकईकडे पाठ केल्यासारखे वाटत होते. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी या उपक्रमाला परत हवा द्यायला सुरवात केली आहे. परवा दुर्भाट आडपई रामनाथी बांदोडे या भागात ‘चाय पे चर्चा’ करीत अनेक मतदारांची भेट घेतली. त्यामुळे रवी मडकईत उतरणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.

सुदिन ढवळीकर यांना सध्या मडकईत तुल्यबळ असा प्रतिस्पर्धीच नाही. त्यामुळेच त्यांचा ‘वन वे ट्रॅफिक’ असल्यासारखे वाटते. सुदिनांची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांचा मतदारांशी असलेला संपर्क त्याचबरोबर या मतदारसंघात त्यांनी अनेकांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्याचे दिसून येत आहे. आरोग्य खात्यात जसे सत्तरीचे लोक दिसतात तसेच सार्वजनिक बांधकाम व वाहतूक खात्यात प्रामुख्याने मडकईचेच (Madkai) लोक दिसून येतात. पण गेली अडीच-तीन वर्षे सुदिन सरकारात नसल्यामुळे नव्या इच्छुकांना नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे ते युवक नाराज आहेत. आता निवडणुकीनंतर पात्रांव (इथे सुदिन) परत मंत्री बनतील अशी आशा अनेकजण व्यक्त करत आहेत.

मतदारसंघातील बहुतेक सरपंच हे सुदिनांचे समर्थक असल्यामुळे त्यांचा पंचायतीवरचा प्रभाव कमी झालेला नाही. दुसऱ्या बाजूला रवी हे सध्या भाजपवासी झाल्यामुळे व भाजपचे सरकार असल्यामुळे त्यांची बाजू थोडी बळकट ठरू शकते. त्यांच्या कार्यालयात सध्या फोंड्यातील कार्यकर्त्यांबरोबर मडकईतील कार्यकर्ते दिसायला लागले आहेत. त्यात परत मडकईत सर्वात जास्त भंडारी समाजाची मते असल्यामुळे व रवी हे या समाजाचे प्रमुख नेते म्हणून गणले जात असल्यामुळे त्यांचा त्यांना फायदा होऊ शकतो.

रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे (Revolutionary Goans) प्रेमानंद गावडे हे रिंगणात उतरण्याचे निश्चित झाले आहे, तर गुरुदास नाईक हे आपचे उमेदवार ठरू शकतात. या दोघांची उमेदवारी कोणावर किती परिणाम करू शकेल हे पाहावे लागेल. मगोप व तृणमूलची युती झाल्यामुळे तृणमूलचा उमेदवार रिंगणात असणार नाही. एकंदरीत सध्या तरी सुदिन रवींच्या संभाव्य लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मडकईत काँग्रेसच्या गोटात सामसुम

काँग्रेस गोटात अक्षरशः सामसुम दिसत आहे. मुख्य म्हणजे मडकईत काँग्रेसची बांधणीच नाही. मागच्या वेळी त्यांनी शेवटच्या क्षणी उर्मिला नाईक यांना मडकईची उमेदवारी दिली होती आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना केवळ 1200 मतेच मिळू शकली होती. आताही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी कोणाला तरी ‘बळीचा बकरा’ करण्याचीच संभावना दिसत आहे. मध्यंतरी भाजपतर्फे महिला आयोगाच्या अध्यक्षा विद्या गावडे यांना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त होत होती, पण त्या सुदिनांना तुल्यबळ उमेदवार ठरू शकतील.

रवींचे सुदिनना मडकईत आव्हान शक्य

रवी नाईक हे 1989 ते 94 पर्यंत मडकईचे आमदार होते. त्याच दरम्यान ते 25 जानेवारी 1991 रोजी राज्याचे मुख्यमंत्रीही झाले होते. त्या काळात त्यांनी मडकईत अनेक प्रकल्प कार्यान्वित केले. यातून त्यांची मडकईशी ‘नाळ’ जुळली असल्याचे प्रत्ययाला येते. ते रिंगणात उतरल्यास सुदिन विरोधात आव्हान उभे करू शकतात.

सुदिनना मंत्रिपद नाही ही तोट्याची बाजू

मडकईत सुदिन ढवळीकर यांनी मंत्रिपद असताना अनेकांना नोकऱ्या दिल्या. त्यामुळे तेथील मतदार त्यांच्यावर खूष आहेत, पण सध्या तरी मंत्रिपद नसणे ही त्यांची तोट्याची बाजू मानली जात आहे. अशी स्थिती पहिल्यांदाच त्यांच्यावर येत आहे गेली अठरा वर्षे ते सातत्याने मंत्री असल्यामुळे पूर्वीच्या सर्व निवडणुका त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळातच लढविल्या होत्या.

गोविंद यांचा रवींना पाठिंबा

मंत्री गोविंद गावडे व रवी यांची युती असल्यामुळे व गोविंद या मतदारसंघातील असल्यामुळे तेही रवींच्या बाजूंनी आपला कौल देऊ शकतात. हे पाहता रवी मडकईतून निवडणूक रिंगणात उतरल्यास ही लढत गोव्यातील सर्वश्रेष्ठ लढत ठरू शकेल यात शंकाच नाही. आता रवींना भाजप मडकईत उतरविता की फोंड्यातच ठेवतो हे बघावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT