Pratapsingh Rane Election 

 

Dainik Gomantak 

गोवा निवडणूक

गोवा विधानसभेतील पितामह 'प्रतापसिंह राणे'

गेल्या चाळीस वर्षांत सहा वेळा मुख्यमंत्री बनून प्रतापसिंह राणे यांनी तब्बल अठरा वर्षे राज्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्याच्या विधानसभेतील पितामह म्हणजे प्रतापसिंह राणे (Pratapsingh Rane); याना 'खाशे' असे आदराने संबोधले जाते. गेल्या चाळीस वर्षांत सहा वेळा मुख्यमंत्री बनून त्यांनी तब्बल अठरा वर्षे राज्य केले. ते 24 मार्च 1972 रोजी पहिल्यांदा आमदार बनले होते. त्यानंतर सलग अकरा वेळा ते निवडून आले. ही विधानसभा 14 मार्च 2022 रोजी बरखास्त होईल व त्यावेळी विधानसभेतील 50 वर्षे पूर्ण करण्यास त्यांना दहा दिवस कमी पडतील. पन्नाशी पूर्ण करण्यासाठी त्यांना परत एकदा लढावे लागेल व परत निवडून यावे लागेल. याचा अर्थ, खाशे निवृत्त होणार नाहीत व नक्कीच परत लढतील.

तर मग सिनियर राण्यांच्या उमेदवारीबद्दल मीडियात इतकी चाल-ढकल कां चालली आहे? हे समजून घेण्यासाठी घटनांच्या कालक्रमाचे विश्लेषण करावे लागेल. सत्तरी व पर्ये; दोन्ही राणे कुटुंबाच्या पारंपरिक जागा. कुठल्याही पक्षावर निवडणूक (Election) लढवा वा अपक्ष; राणेच निवडून येणार हे नक्की. याचे कारण सिनियर खाशांचा दबदबा व त्यांनी स्थानिकांना दिलेल्या सरकारी नोकऱ्या. पर्रीकरांनी बऱ्याच क्लृप्त्या वापरून बघितल्या; परंतु राण्यांचे शिवधनुष्य ते तसूभरही हलवू शकले नाहीत. शेवटी ज्यांना हरवता येत नाही त्यांना आपले बनवा; या तत्त्वावर पर्रीकरांनी विश्वजीतना मंत्रिपद देऊन भाजपावासी करून घेतले. त्या दिवसापासून भाजपाचा डोळा पर्ये मतदारसंघावर आहे. खाशे भाजपावासी होणार नाहीत व त्यामुळे त्यांना निवृत्त केल्याशिवाय भाजपाचे स्वप्न साकार होऊ शकत नाही.

खाश्यांच्या निवृत्तीच्या प्रलोभनाचे बी मुख्यमंत्री सावंत यांनी 9 ऑगस्ट 2019 रोजी पेरले. त्यांच्या कारकिर्दीवर स्तुतिसुमने उधळून या विधानसभेच्या बरखास्तीपूर्वी जेव्हा ते आमदारकीची 50 वर्षे पूर्ण करतील त्यावेळी विधानसभेत जंगी कार्यक्रम घडवून आणला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. अर्धशतकास दहा दिवस कमी पडतात ही वस्तुस्थिती असल्यामुळे तसा समारंभ हास्यास्पद नव्हे कां? पर्येसाठी दुसरी मोहीम देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) 21 सप्टेंबरला हातात घेतली. तानावडे व विश्वजित यांना सोबत घेऊन ते खाशांकडे जेवायला गेले; तिथे तब्बल दोन तास दिलखुलास चर्चा केली. तरीपण त्यांच्या पदरी आले खाशांचे हे शब्द, "पंचेचाळीस वर्षे काँग्रेसशी निष्ठा राखून झाल्यावर वयाच्या 83व्या वर्षी मी पक्ष सोडणार नाही."

या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातील लोकांच्या भुवया उंचावल्या. ही भेट शिष्टाचाराची होती व त्यांत काहीही राजकीय नव्हते, असे विश्वजीत म्हणाले. परंतु फायदा नसताना भाजपाने (BJP) आपला वेळ घालवला असे कधी झाले आहे का? भाजपाच्या क्लृप्त्यांना प्रत्युत्तर देण्यास काँग्रेस (Congress) आळशी. तब्बल वीस दिवसांनंतर म्हणजे 11 ऑक्टोबरला चिदंबरम (P. Chidambaram) जागे झाले व राण्यांना जाऊन भेटले. गोव्याच्या विकासाचा व समृद्धीचा पाया खाशांनीच घातला अशा शब्दांनी त्यांना चुचकारले. दोन्ही मतदारसंघ विश्वजीतकडे सुपूर्द करून घेणे हेच भाजपाचे ध्येय आहे. खाशांना राज्यपालपदाचे लालूच दिले तर ते म्हणतात की त्यांना त्यांच्या बागायतीत, दुभत्या जनावरांत व शैक्षणिक संस्थांत जास्त रमते. म्हणजे मिशन "खाशे आऊट" तेही 50 वर्षे पूर्ण न करता.

विश्वजीतपण हा सौदा स्वस्तात होऊ देईल? भाजपाला दोन शाश्‍वत जागा हव्या असतील तर तडजोड ही करावीच लागेल. ही तडजोड दुसरी तिसरी नसून प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपदाची आहे. प्रमोद सावंतांना (Pramod Sawant) डावलून विश्वजीत राणे (Vishwajit Rane) भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवल्याशिवाय पर्ये काबीज करणे भाजपाला शक्यच नाही. दुसऱ्या बाजूने सावंतांना हटवल्यास त्यांचे निवडून येणे कठीण होईलच; शिवाय पार्सेकरांचा सात हजारच्या फरकाने हरण्याचा रिकॉर्ड ते तोडतात की नाही याकडे लोकांचे लक्ष लागेल. पर्येच्या बदल्यात साखळी घालवणे व्यावहारिक नाही; परंतु विश्वजीतची महत्त्वाकांक्षा त्यांना इतर पक्षांत घेऊन गेली तर भाजपा पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळेल.

विश्वजीतवर विश्वास ठेवणे मुश्किल याचे पूर्वनिश्चयन करून भाजपाने आयआयटीचे भूत त्यांच्या मानगुटीवर दोन वर्षांपूर्वी बसवले होते. पोलिसांकरवी अत्याचार करून राण्यांना लोकांमध्ये अप्रिय बनवण्याची चाल भाजपाने खेळली. परंतु ऐनवेळी आयआयटीला विरोध करून राण्यांनी प्रजेचा क्रोधाग्नी सावंतांकडे वळवला. मेळावलीवासीयांवरील गुन्हे मागे घेण्यास सावंतांना तगादा लावून राण्यांनी भाजपाच्या चाली निष्फळ केल्या. शिवाय दुष्काळांत तेरावा महिना; गेल्या वेळचे उमेदवार सत्यविजय नाईक व विश्वजित कृष्णराव राणे “आप” मध्ये गेल्याने सत्तरीत भाजपा पोरकी झाली आहे.

मगोप-टीएमसी व गोफॉ-काँग्रेस अशी युती झालेली आहे. पर्रीकर नाहीत व पार्टी विथ डीफरन्सचे लेबलही नाही; उलट हिंदुत्वाच्या गळ्यांत 15 ख्रिस्ती आमदारांचा फास. इतर सगळे काँग्रेसी तर संघाच्या वळणातल्या दोनपैकी एक सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकलाय तर दुसरा मास्कने ओठ साफ करणारा. निष्ठावान नेते व कार्यकर्ते भाजपाला रामराम ठोकत आहेत. बेरोजगारी, महागाई, असुविधा, भ्रष्टाचार यांनी जनता हैराण झालीय. माजी राज्यपाल पण म्हणतात सरकार भ्रष्ट व अकार्यक्षम. त्यामुळे भाजपा सत्तेत येणार नाही हे आता निश्चित झाले आहे. त्यांत विश्वजितने उडी मारली तर एक अंकी आकड्यावर गच्छंती. त्यानंतर विरोधी बांक नको म्हणून अजून कांही विनेबल नेते त्यांना सोडतील व पुढच्या विधानसभेत बेडूकउड्या भाजपा नेत्यांच्या असतील.

- राजेंद्र काकोडकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT