savitri kavalekar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

सावित्रींच्या मंत्रिपदाची समर्थकांना पडतात स्वप्ने: खरी कुजबुज!

सावित्री यांच्या बरोबर फिरणारी चौकडी तर मॅडम मंत्री बनणार म्हणून हवेत उडायला लागले आहेत.

दैनिक गोमन्तक

सावित्रींच्या मंत्रिपदाची समर्थकांना पडतात स्वप्ने!

‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आपण ऐकले असणारच. सांगे मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या सावित्री कवळेकर विजयी बनणार व त्यांना मंत्रिपद मिळणार अशी ‘हसीन सपने’ आता सावित्री समर्थकांना पडायला लागली आहेत. सावित्री यांच्या बरोबर फिरणारी चौकडी तर मॅडम मंत्री बनणार म्हणून हवेत उडायला लागले आहेत. बाबू उपमुख्यमंत्री व सावित्री समाजकल्याणमंत्री बनणार असे भाकीतही अनेक कार्यकर्ते व समर्थक करायला लागले आहेत. ∙∙∙

निवडणूक निकालाचे वैदिक गणित

गोव्यात विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) पार पडली. निवडणुकीपूर्वी कुणाला मते द्यायची याबद्दलची चर्चा रंगायची. निवडणुकीनंतर कोण निवडून येणार कोणत्या पक्षाला आघाडी मिळणार या चर्चेला ऊत आला आहे, पण प्रत्येकजण स्वतः एक चांगला गणित तज्ज्ञ असल्याप्रमाणे आकडेवारी जुळवतो व आपल्याला जो हवा त्याच्या बाजूने अधिक वजाबाकीचे उत्तर देतो. काहीजण मतदारसंघातील ग्राउंड रिॲलिटी काय हे समजून न घेताच टक्केवारीवरून गणिते सोडवत आहेत. जागा आहेत 40, तरी भाजप म्हणतो आपण 22, कॉंग्रेस म्हणतो 24ते 26, तृणमूल म्हणतो 21, आप म्हणतो 21 . मग त्यात मगो, गोवा फॉरवर्ड, आरजी हे पक्ष आलेच. या सर्वांची बेरीज केली, तर जागांची संख्या 80तरी असायला हवी. हा एका प्रकारे पत्त्याचा खेळ आहे. पत्त्यामध्ये प्रत्येक धाटणीचे केवळ 4 पत्ते असतात. तरीसुद्धा एकटा म्हणतो माझ्याकडे चार एक्के, दुसरा म्हणतो माझ्याकडे 8 एक्के, तिसरा म्हणतो माझ्याकडे 6 एक्के. निवडणुकीच्या जागा मोजायचीसुद्धा हीच पद्धत. आहे की नाही वैदिक गणित. सहज सोपे असे! ∙∙∙

सीईओच खरे किंग मोमो

एरव्ही कार्निव्हाल, शिमगो म्हटले की नगरपालिकेतील अध्यक्षासह सर्वच नगरसेवक अगदी उत्साहात असायचे, पण यावेळी आचारसंहितेमुळे त्यांना या उत्सवात भाग घेता येणार नाही. शिवाय कार्निव्हाल व शिमगो म्हटले की अफाट खर्च व त्याचा हिशोब ठेवण्याची सक्ती पण तशी नसतेच म्हणा. त्यामुळे ते सर्वचजण हिरमुसलेले आहेत. या उलट मडगाव नगरपालिकेतील मुख्य अधिकारी आग्नेल फर्नांडिस मात्र ऐटीत आहेत. कार्निव्हाल समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले आहे. तसे आग्नेल फर्नांडिस हे एक चांगले संघटक व आयोजक. त्यांना आपले कर्तृत्व दाखविण्यास ही नामी संधी आहे. या कार्निव्हलचे खरे किंग मोमो आग्नेलबाबच आहेत असे म्हणायचे. ∙∙∙(Political discussion about savitri kavalekar in goa)

म्हणे लियांडरला मुख्यमंत्री बनायचे होते

भारताचा टेनिस स्टार लियांडर पेस यांनी सुरवातीला गोव्याच्या निवडणुकीत (Goa Election) बराच रस घेतला होता. त्यांनी गोव्यात तृणमूलचा प्रचारही केला होता, पण नंतर ते गायबच झाले. असे म्हणतात सुरवातीला लियांडर याला गोव्यात तुम्ही आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असे सांगूनच आणले होते. त्यांना वेळ्ळी मतदारसंघात उमेदवारी देणार असे सांगितले होते. मात्र, नंतर त्यांना आपल्याला येथे केवळ मामा बनविण्यासाठी बोलावले आहे हे कळून चुकले आणि लियांडरचे गोवा प्रेमाचे आलेले भरते आपोआप आटले. ∙∙∙

गोविंद-दीपकचे एकमत...

विश्वास बसणार नसला, तरी एरव्ही एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या गोविंद गावडे व दीपक ढवळीकर या दोघांचे एका गोष्टीवर एकमत झाले आहे हे खरे. हे एकमत या गोष्टीचे की दोघांनाही वाटते की, निगळ्येंना चार हजाराहून जास्त मते मिळणार नाहीत. हाच हिशोब गृहीत धरून एकटा सांगतो की तो दीड हजार मतांनी जिंकणार, तर दुसरा म्हणतो अडीच हजार मतांनी. निगळ्ये समर्थकांना मात्र वाटते की हे या दोघांनी आपापल्या हिशेबात धरलेल्यापैकी सुमारे चार हजार ‘स्वाभिमान्यांनी’ आपणालाच मते दिली आहेत याचा पत्ता त्यांना अजून लागला नसावा. त्यांच्या मते 1999 मध्ये विश्वास सतरकरांनाही कुणी हिशेबात धरले नव्हते, पण तिरंगी मत विभागणीत ते कमी मतावर निवडून आले होते. काहीही असो, प्रियोळच्या तिघाही प्रमुख उमेदवारांना निकालापर्यंत आशेवर दिवस काढायचे आहे यावर कुणाचे दुमत नसावे. ∙∙∙

काँग्रेसचा खो...

‘डर के आगे जीत है’ असे म्हणतात. भीती माणसाला पुढे जाण्यापासून अडवते. वर्ष 2022 आले तरी कोविड 2019 ची भीती अजून संपली नाही. कोविडमुळे दोन शैक्षणिक वर्षे फुकट गेली. मुलांनी शाळेचे तोंड पाहिल्यास अडीच वर्षे उलटली आता कुठे शाळा उघडण्याची आशा पल्लवीत झाली आहे. सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला खो घालण्याचे काम काँग्रेसच्या (Goa Congress) महिला अध्यक्षा बिना नाईक यांच्यासारखे राजकारणी करायला लागले आहेत. मॅडम आपण शिक्षिका होता. आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती असे आता शिक्षकच म्हणायला लागले आहेत. जर निवडणुका होऊ शकतात, तर शाळा का सुरू होऊ नयेत. मॅडम बिना घाबरायची गरज नाही, कोरोना आता म्हातारा झालाय मुलं म्हातारी होण्याआधीच शाळा उघडू द्या असा विनोद सध्या शिक्षकवर्गात होत आहे. ∙∙∙

मगो-अपक्षांचा भाव वाढला!

10 मार्चनंतर राज्यात नवे सरकार येणार आहे, पण यावेळी जर का कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर अपक्षांना चांगले दिवस येणार आहेत. त्यात मगोने (Goa MGP) तर आपणच किंगमेकर अशी भूमिका घेतली आहे. आपण सत्तेत येणारच, आमच्याशिवाय सरकार घडणार नाही, असे आत्मविश्‍वासाने ते सांगत आहेत. त्यात तथ्यही असेल कदाचित, पण त्यांचा भाजपला विरोध आहे. मग ते काँग्रेसला पाठिंबा देणार की स्वतःकडे मुख्यमंत्रिपद घेणार? हे 10 तारखेनंतरच कळणार आहे. त्यावेळी कोण कुठे राहणार, कोणाला पाठिंबा देणार याची शाश्‍वती कोण देणार? अशी चर्चा मतदारांत सुरू आहे. सुदिन, दीपकराव म्हणतात, त्याप्रमाणे मगोला पाच-सहा जागा मिळाल्या, तर नक्कीच ते किंगमेकर होणार यात शंका नाही, पण ते कसे होणार? याबाबत मात्र गंभीर चर्चा त्यांच्या विरोधकांत सुरू आहे. ∙∙∙

सरकारी पैशांची नासाडी थांबवा ना?

कुठलीही वापरण्यायोग्य वस्तू व्यर्थ जाता कामा नये. सरकारी पैशाची नासाडी होणे म्हणजेच आपलीच नुकसानी हे प्रत्येक अधिकाऱ्याने समजून घ्यायला हवे. निवडणुकीवेळी निवडणूक यंत्रणेने प्रत्येक मतदान केंद्रावर दहा पीपीई कीट, पाच लिटर सॅनिटायझर व पाचशे हात मोजे दिले होते. म्हणजे जवळजवळ सोळा हजार पीपीई किट, ऐंशी हजार हात मोजे व सुमारे आठ हजार लिटर सॅनिटायझर चाळीस मतदारसंघात पुरविले होते. यातील एक टक्का कोविड साहित्याचाही वापर झाला नसेल. आता राहिलेले लाखो रुपये किमतीचे कोविड साहित्य वाया जावू नये यासाठी त्याचा वापर होणार का? की इतर कचऱ्याबरोबर हेही साहित्य कचऱ्यात जाणार? ∙∙∙

सरकारी मतांचा भाव

‘मागणी तसा पुरवठा’ या अर्थशास्त्राचे मूलमंत्र आपल्याला माहीत असणारच. राजकारणात तसे कोणीच संत नाहीत. काँग्रेस असो किंवा भाजप, गोवा फॉरवर्ड, मगो असो किंवा तृणमूल सगळे एकाच माळेचे मणी असे आम्ही नव्हे जनताच म्हणते. सरकारी कर्मचाऱ्यांची मते भाजपा विकत घेण्याचे कारस्थान करीत असल्याचा आरोप काँग्रेस व मगो पक्षाने केला आहे. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांची मते विकत घेण्यासाठी भाजपच नव्हे, तर काँग्रेस व इतर पक्षही मागे नाहीत. गिरीशबाब बोली लावणारेही तुम्हीच... मते घेणारेही तुम्हीच... मग दोष सरकारी कर्मचाऱ्यांना का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. ∙∙∙

एकटे फालेरोच नसणार

‘देव दिता आनी देवचार नाडता’ अशी कोकणीत जी एक म्हण आहे, तिचा नावेलीच्या लुईझिनबाबांना वेळोवेळी प्रत्यय आलेला आहे. बाबू नायकांचा हात धरून राजकारणात पाय ठेवलेल्या लुईझिननी दोतोर विलींशी जवळीक साधून बाबूंशी पंगा घेतला तरी नंतर नावेलीतून अविरोध निवडून येण्याची किमया केली व नंतर मुख्यमंत्रीही झाले, पण स्वकियांनीच त्यांना खाली खेचले. एवढेच नव्हे, तर नंतर नावेलीत पराभूतही केले, पण तरीही 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला सत्तेच्या जवळ नेले. काहींच्या अवसानघातकीपणामुळे ती संधी वाया गेली. आता त्यांनी तृणमूलकडे केलेल्या जवळिकेचेही तसेच झाले आहे. केवळ तेच नव्हे, तर या निवडणुकीवेळी उड्या मारलेल्या अनेकांची गत त्यांच्या प्रमाणेच होण्याची चिन्हे दिसतात. ∙∙∙

आरजीचे सासष्टीत काय होणार?

सासष्टीत आरजी करामत करणार असा दावा केला जात होता. ज्या मतदारसंघात विदेशात काम करणारे लोक जास्त आहेत त्या मतदारसंघात आरजी क्रांती करणार व पोगोवाले जिंकणार नसले, तरी प्रस्थापितांना पाडणार असे बोलले जात होते. मात्र, निवडणुकीत आरजीचा हवा तसा प्रभाव दिसला नाही, परंतु आरजीचे कार्यकर्ते म्हणतात सायलंट मते पोगो बिलाच्या बाजूनेच मिळणार. आता पाहूया निकाल काय लागतो... ∙∙∙

टीएमसी सोडलेले खूष

लुईझिनसारख्या माजी मुख्यमंत्री व काँग्रेस व तृणमूलच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर काम केलेल्या नेत्याची त्या पक्षाकडून जी अवहेलना झाली ते पाहून म्हणे त्या पक्षात प्रवेश करून नंतर बाहेर पडलेले अनेकजण मनोमन सुस्कारा सोडू लागले आहेत. फालेरोनंतर अनेकजण त्या पक्षात गेले होते, पण तेथील एकंदर वातावरण व कामाची पध्दत अनेकांना मानवली नव्हती व त्यांनी बाहेरचा रस्ता पकडला होता. मडगावातील अनेकांचा त्यात समावेश असून ते आता आपण योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाबद्दल आपणच आपली पाठ थोपटून घेत आह़ेत. ∙∙∙

स्वप्नातच राहावे!

आमदारकीची स्वप्ने 301उमेदवारांना पडत आहेत, पण यापैकी फक्त 40 जणांचेच स्वप्न खरे ठरणार आहे. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. कारण अनेकांना दिवसा-रात्री, जागेपणीसुद्धा एकच स्वप्न पडत आहे. काहींना 10 मार्चनंतर काही बोलता येणार नाही, म्हणून आत्ताच ते आपण आमदार होणार, जणूकाही विजयी झालोच या तालात वावरण्याचा आनंदही घेत आहेत, तर कोणी आपला गट करण्याचा प्रयत्नही करीत आहेत. त्यांच्या प्लॅनिंगचा फज्जाही 10 मार्चला उडणार असून नेमका गुलाल कोणावर अधिक उधळला जाणार हेही, तेव्हाच कळेल. आत्ता त्यांनी स्वप्नातच राहावे! ∙∙∙

मगोवाल्यांचे मनोराज्य

हत्तीला पाहून बेडूक आपले अंग फुगवितो अशी जी एक कथा आहे, तिची आठवण म. गो. वाल्यांची या दिवसातील निवेदने वाचून येते. निकालानंतर असे चित्र असेल की सरकार स्थापनेसाठी म. गो.शी सहकार्य केल्याशिवाय पर्याय नसेल, असा दावा केला जातो. पण प्रश्न तो नसेल तर तसे सरकार आलेच तर म.गो. च्या अन्य उमेदवारांना संधी मिळेल की यापूर्वीप्रमाणे केवळ ढवळीकर बंधूच मंत्री होतील असा सवाल म. गो. वाले आपसात करताना आढळतात. खरे तर म. गो. किती जागा जिंकतो त्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. ∙∙∙

पालकांसमोरील चिंता

सरकारने येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार शिक्षण संचालकांनी परिपत्रकही जारी केले. शाळा सुरू करायला पालकांची हरकत नाही. त्यांची चिंता आहे वाहतूक व्यवस्थेची. अनेक शाळांकडे बालरथ नाहीत. काहींकडे असले तरी ते पुरेसे नाहीत. सार्वजनिक प्रवासी वाहतूक अजून पूर्वीप्रमाणे सुरू झालेली नाही. मग मुलांना शाळेत कसे पोचवायचे व आणावयाचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. ∙∙∙

खरेच सावियोला मिठाई मिळाली?

‘जिंदगी कभ करवट बदलेगी कोई बता नही सकता’ असे म्हणतात ते सत्य आहे. वेळ्ळी पंचायतीचे सरपंच सावियो डिसिल्वा यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींशी अक्षरक्षः भांडून वेळ्ळी मतदारसंघाची उमेदवारी मिळवली होती. सावियो वेळ्ळी काबिज करणार असे वातावरण होते. मात्र, निवडणुकीला चोवीस तास असताना सावियो, चर्चिल व संकल्प एका तथाकथित स्ट्रींग ऑपरेशनमध्ये अडकले आणि संकटात सापडले. सावियोला मिठाईच्या रूपाने नोटांची बंडले घेताना टिव्ही व मोबाईलवर पाहून वेळ्ळीकरांचा मूड बदलला. आता वेळ्ळीकर विचारायला लागले आहेत, खरेच सावियोने मिठाई खाल्ली का? ∙∙∙

जमवा-जमव

जो आमदार म्हणून निवडून येतो त्याला वाटते, की आपण सत्ताधारी पक्षाचा आमदार असावा, जो सत्ताधारी पक्षाचा आमदार असतो त्याला वाटते की आपण मंत्री व्हावे व मंत्र्याला स्वप्ने मुख्यमंत्र्याची पडत असतात. ज्याला-त्याला अधिकच हवे असते हा मनुष्यस्वभाव आहे. कॉंग्रेस पक्षातील आमदार पळविण्याचे काम सुरू झाल्याचे गिरीश चोडणकर सांगतात, जर तसे करण्यात भाजप सफल झाला, तर काँग्रेसवर कोणीही विश्‍वास ठेवणार नाही. त्याचसोबत मंदिर, चर्चमध्ये घेतलेल्या शपथा काय देखावा होता असा प्रश्न मात्र उपस्थित होणार हे नक्की. ∙∙∙

अर्ध्या हळकुंडाने पिवळे

अनेक अपक्ष आमदारांना तसेच स्थानिक पक्षातील काही नेत्यांना निकालापूर्वीच मुख्यमंत्री होण्याची आस लागली आहे. मगो पक्षाचे सुदिन ढवळीकरांना वाटत आहे की आपल्या पाठिंब्याशिवाय सरकार घडणे अशक्यच. त्यामुळे आपण मुख्यमंत्री पदाचा दावा ठोकण्यास काही हरकत नसल्याचे त्यांना वाटत आहे. त्यामुळे निकालाआधीच ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. ∙∙∙

ऐतिहासिक भाषण गायब

प्रियोळ मतदारसंघात कोणताही कार्यक्रम असो, उद्‍घाटन, भूमिपूजन आणि सभेतूनसुद्धा ऐतिहासिक भाषणबाजी खूप होत होती. शिवकालीन संदर्भांचा उल्लेख असायचा. निवडणूक काळातही अशा भाषणांना ऊत आला होता, पण निवडणुकीनंतर सगळेच तथाकथित नेते गायब झाले आहेत. भाषणे पाठांतर करून ते थकले असावे, त्यामुळेच नेत्यांनी मौनव्रत धारण केले आहे. कदाचित आगामी पंचायत निवडणुकीत ते पुन्हा माझा, तुझा गट म्हणून भाषणबाजी करायला येतीलच... ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT