Goa Politics Congress party in crisis in Goa

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

अशाने काँग्रेस सत्तेवर येणार तरी कशी?

दैनिक गोमन्तक

Goa Politics : माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो व रवी नाईक यांच्‍या पाठोपाठ आलेक्स रेजिनाल्ड यांनीही काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यामुळे पक्षाच्या खात्यात फक्त आता दोनच आमदार शिल्लक राहिले आहेत. 2017 साली काँग्रेसचे 17 आमदार निवडून (MLA) आले होते. मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर झालेल्या पणजीच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या बाबूश मोन्सेरात यांना धरून काँग्रेसचे अठरा आमदार व्हायला हवे होते. पण, आता राहिले आहेत ‘इन मीन दोन’. अशाने काँग्रेस सत्तेवर येणार तरी कशी? काँग्रेस किती जागा जिंकणार, यापेक्षा जिंकलेल्यांपैकी किती जागा टिकणार हाच सध्‍या महत्त्वाचा प्रश्न आहे.

1980 सालापासून काँग्रेस पक्ष गोव्याच्या विधानसभेत (Goa Assembly) अस्तित्वात आला. पण, एवढी दुरवस्था या पक्षाची आतापर्यंत कधीही झाली नव्हती. परवा भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P Nadda) यांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसचे (Congress) आता ‘हम दो हमारे दो’ अशीच अवस्था झाली आहे. जोपर्यंत दिगंबर कामत व गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांच्या हातात गोव्यातील काँग्रेसची सूत्रे आहेत, तोपर्यंत गोव्यात (Goa) काँग्रेसला सत्ता संपादन करणे निश्चितच कठीण आहे, असे परवा जे एक राजकीय विश्‍लेषक सांगत होता ते खरे वाटते. याचे मूळ कारण म्हणजे हे दोघे नेते जनतेत गेल्याचे वा मिसळल्याचे कधी दिसलेच नाहीत. फक्त पत्रकार परिषद घेणे वा एखादे ‘स्कॅंडल’ उजेडात आणणे, एवढेच त्यांचे आतापर्यंतचे काम. पण, याचा जनतेशी विशेष संबंध येत नाही, यावर ते लक्ष देताना दिसत नाही. फक्त दुसऱ्याला वाईट म्हटले की, आपण चांगले ठरत नसतो. आपल्यातले वाईट गुण हेरून त्यावर कशी मात करायची हे बघणाराच ‘सिकंदर’ ठरत असतो. पण हे दोघेजण काँग्रेसच्या पडझडीचे विश्‍लेषण करताना दिसत नाही.

आलबेल आणि पडझड

माजी मुख्यमंत्री रवी नाईक (Ravi Naik) दोन दिवसांपूर्वी हेच सांगत होते. आपण गेली तीस वर्षे काँग्रेसमध्ये होतो, पण अशी एकाधिकारशाही आपण कधीच अनुभवली नव्हती, असे त्यांचे म्हणणे पटले. ही रवींची बाजू असली, तरी सध्या काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याचे होणाऱ्या पडझडीवरून स्पष्ट होत आहे. परवा रेजिनाल्डच्या राजीनाम्याप्रसंगी दिगंबर कामत यांनी कुणाला जायचे असेल, तर खुशाल पक्षातून जावे, असे जे भाषण केले ते खटकण्यासारखेच होते. लुईझिन, रवी वा रेजिनाल्ड यासारख्या नेत्यांना कमी लेखणे हे चुकीचेच. रेजिनाल्ड हे 2007 साली ‘सेव्ह गोवा’ च्या उमेदवारीवर निवडून आले होते. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यांची कुडतरीमध्ये स्वतःची अशी राजकीय शक्ती आहे, हे कोणच नाकारू शकणार नाही. अन्यायाविरूध्द म्हणा किंवा भाजप सरकारविरूद्ध म्हणा त्यांनी आवाज उठविला होता, याबाबतीतही दुमत असण्याचे कारण नाही. पण, ते गिरीश चोडणकरांच्या कार्यपद्धतीबाबत खुश नव्हते हेही तेवढेच सत्य आहे.

अंतर्गत नाराजी नडतेय

तसे पाहायला गेल्यास चोडणकर यांच्या कार्याबाबत काँग्रेसचा एकही मोठा नेता खुश नव्हता. रवींनी तर साधा नगरसेवक वा पंच नसलेली व्यक्ती राजकारणात अनेक उन्हाळे पावसाळे काढलेल्या तसेच अनेक महत्त्वाची पदे भूषविलेल्या आमदारांचे नेतृत्त्‍व कसे काय करू शकतो, असा सवाल उपस्थित केला होता. विशेष म्हणजे त्यांच्या विरूद्ध बऱ्याच तक्रारी होऊनसुद्धा काँग्रेस ‘हायकमांड’ने नेतृत्व बदल केला नाही. याकडेही रवींनी लक्ष वेधले होते. कदाचित याचाच परिणाम सध्या काँग्रेस भोगत असावी. रवी यांना अजूनही बहुजन समाजाचे एक प्रबळ नेते असे संबोधले जाते. अशा नेत्याला गमावणे हे कोणत्याही पक्षाला परवडण्यासारखे नाहीच. पण, काँग्रेसला त्याचे सोयरसुतकच नाही.

सासष्‍टीत काँग्रेसचे प्रचंड नुकसान

रवी काँग्रेस सोडणार हे दीड वर्षांपूर्वीच समजले होते, असे चोडणकर म्हणतात. समजले होते तर त्यावर उपाययोजना का केली नाही, हा प्रश्न उपस्थित होतोच. रोगाचे निदान झाल्यावर त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे असते. पण, काँग्रेसच्या राज्यात ही व्याख्या अस्तित्वात नसल्यासारखीच वाटते. आता लुईझिन व रेजिनाल्डनी काँग्रेस सोडल्यामुळे सासष्टीत काँग्रेसचे अतोनात नुकसान होणार, हे सांगायला कुणा तज्‍ज्ञाची गरज नाही. पण गिरीश व दिगंबर ते मान्य करताना दिसत नाही. दिगंबर यांना आतापासून मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडायला लागली आहेत. पण ती स्वप्नें ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठरू नये एवढीच इच्छा.

काँग्रेस म्हणजे आमदारांसाठी ‘गेस्‍टरूम’

गोवा फॉरवर्ड बरोबर युती केल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला फक्त मडगाव, फातोर्ड्यातच होऊ शकेल. याचे कारण म्हणजे फातोर्डा वगळता इतर मतदारसंघात गोवा फॉरवर्डची शक्ती आज पूर्वीसारखी राहिलेली नाही. भाजपने तर एकामागोमाग एक असे राजकीय नेते ‘हायजॅक’ करायला सुरवात केली आहे. ही त्यांची ‘हायजॅक’ करण्याची पद्धत निवडणुकीनंतरही सुरू राहील, असे संकेत सध्या मिळताहेत. त्यामुळे काँग्रेसचे अस्तित्वच डळमळीत झाल्यासारखे वाटायला लागले आहे. आता झालेले अठराचे दोन आमदार पाहिल्यास भविष्यात काय वाढून ठेवले, याचा हा ‘ट्रेलर’ तर नव्हे ना, अशी शंका उद्‍भवायला लागली आहे. काँग्रेस यावेळी नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देणार, हे जरी खरे असले तरी हे नवे चेहरे निवडून आल्यानंतर काँग्रेसमध्ये किती दिवस राहणार, हे बघावे लागेल. सध्या तरी काँग्रेस पक्ष म्हणजे निवडून आलेल्या आमदारांचा किंवा येणाऱ्या आमदारांसाठी एक ‘गेस्टरूम’ सारखा वाटायला लागला आहे. आणि हे सर्व पाहता येत्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येईल हे एखाद्या दिवास्वप्नासारखे वाटायला लागले आहे हेच खरे.

आप, तृणमूल (TMC) जोमात; काँग्रेस गलितगात्र

भाजप (BJP) तर गळ टाकून बसलेला आहेच. भाजप जवळ आज अमाप पैसा आहे. केंद्रातही त्यांची सत्ता आहे. अशा पक्षापुढे लढण्यासाठी सर्व विरोधकांची एकवाक्यता हवी. पण, इथे विरोधी पक्षच विखुरलेले दिसताहेत. तृणमूल व आप हे काँग्रेसची मते फोडणार, ही शक्यता आतापासूनच दिसायला लागली आहे. सासष्‍टी तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जात असे. पण, आज सासष्‍टीत आप व तृणमूलने हातपाय पसरायला सुरवात केली आहे. फोंडा सोडून इतर तीन मतदारसंघात काँग्रेस गलितगात्र अवस्थेत दिसत आहे. थिवी, हळदोणा, शिवोली यासारख्या मतदारसंघात हीच अवस्था दिसत आहे. पर्वरी येथील रोहन खंवटे हे भाजपमध्ये गेल्यामुळे कोणाला उमेदवारी द्यावी, हा प्रश्न काँग्रेसला सतवायला लागला आहे. सांगे, सावर्डे अशा अनेक मतदारसंघात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. पणजी, ताळगाव येथे काँग्रेस थोडीफार बळकट झाल्यासारखी वाटत असली तरी सांतआंद्रे, सांताक्रुझ यासारख्या मतदारसंघात काँग्रेसची आज 50-50अशी स्थिती आहे.

मिलिंद म्हाडगुत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT