goa election became matter of prestige for Michael Lobo Dainik Gomantak
गोवा निवडणूक

म्हापशात मायकल लोबोंचा ‘फॅक्टर’ किती महत्त्वाचा ठरतो, हे औत्सुक्याचेच

लोबोंसाठी बनली लढत प्रतिष्ठेची

दैनिक गोमन्तक

गोव्यातील प्रमुख चार शहरांमध्ये गणल्या जाणाऱ्या म्हापसा मतदारसंघात सध्या भाजपचेच वर्चस्व आहे. 2019 साली फ्रान्सिस डिसौजा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र जोशुआ हे कॉंग्रेसच्या सुधीर कांदोळकरांचा पराभव करून विजयी झाले. त्यावेळी खरेतर कांदोळकरांना भाजपची उमेदवारी हवी होती. पण ती जोशुआ यांना दिल्यामुळे कांदोळकरांना कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवावी लागली. आताही पात्रे तीच आहेत. परत कांदोळकर व जोशुआ मध्येच लढत होत आहे. मात्र याला माजी मंत्री मायकल लोबोचा तिसरा कोनही प्राप्त झाला आहे.(goa election became matter of prestige for Michael Lobo)

सुरेंद्र शिरसाट चंद्रकात दिवकर, रघुवीर पानकर, रघुनाथ टोपले हे म्हापशाचे आमदार मगोपचेच. टोपले हे म्हापशाचे पहिले आमदार. तर शिरसाट हे मगोपतर्फे तीन वेळा म्हापशातून निवडून आलेले आमदार. पण 1999 पासून चक्रे फिरू लागली. यावर्षी गोवा सुराज पार्टीतर्फे फ्रान्सिस डिसौजा हे म्हापशात निवडून आले आणि नंतर ते भाजपमय झाले. त्यामुळे २००२ पासून ते 2017 पर्यंत फ्रान्सिस हे या मतदारसंघातून मताधिक्क्याने निवडून येत राहिले.

मायकल लोबो (Michael Lobo) हे सध्या म्हापशामध्ये सक्रिय झालेले दिसत असून ते कांदोळकरांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. लोबो भाजपच्या सरकारात मंत्री होते. पण त्यांनी भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असल्यामुळे ते आता भाजपलाच (Goa BJP) आव्हान देताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर म्हापसा पालिकेतील अनेक नगरसेवक फिरताना दिसत आहेत. कॉंग्रेसची सर्व मदार सध्या मायकल लोबो यांच्यावर आहे. लोबोंनी या आधीच ‘टुगेदर फॉर बार्देश’ ही संघटना स्थापन करून कांदोळकरांना पाठिंबा जाहीर केला होता. आणि या संघटनेद्वारे त्यांनी त्यावेळी भाजपलाच आव्हान दिले होते. त्यामुळे ही निवडणूक जिंकणे हा केवळ कांदोळकराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न राहिला नसून तो लोबोंच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. पण 1980 साली आलेल्या श्यामसुंदर नेवगी यांचा अपवाद वगळता कॉंग्रेस म्हापश्यात विजयी झालेली नाही. त्यामुळे गेल्या 42 वर्षात कॉंग्रेसला न जमलेले काम आता लोबो व कांदोळकरांना करावे लागत आहे.

आपचे निमंत्रक राहुल म्हांबरे रिंगणात उतरले असून त्यांना चांगले मतदान होईल, असे संकेत मिळताहेत. म्हांबरे हे आपचे निमंत्रक असल्यामुळे त्यांचा मतदारांशी चांगलाच संपर्क आहे. पण ते यशाच्या किनाऱ्याला पोहचतील की नाही, हे सांगणे कठीण आहे.

तृणमूलतर्फे म्हापश्याचे नगरसेवक तारक आरोलकर हे रिंगणात उतरले असून ते कोणाला ‘धक्का’ देतात हे बघावे लागेल. आरोलकर हे खरेतर हळदोण्यातील कॉंग्रेस उमेदवारीचे इच्छुक होते. पण लोबोंचा पाठिंबा असूनही उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांना तृणमूलतर्फे म्हापशात उडी घ्यावी लागली. ते नगरसेवक असल्यामुळे त्यांचा काही प्रभागात प्रभाव जाणवतो. आता हा प्रभाव प्रत्यक्षात उतरतो, का हे बघावे लागेल. शिवसेनेतर्फे राज्य प्रमुख जितेश कामत हे रिंगणात असून त्यांचा विशेष प्रभाव पडेल, असे दिसत नाही.

पालिका जोशुआंकडे

नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत जोशुआ पॅनलचे नऊ तर कांदोळकर पॅनलचे नऊ, असे समसमान नगरसेवक निवडून आले होते. पण नंतर भाजपने ‘हातचलाखी’ करून कांदोळकरांच्या गटातील नगरसेवकांस गळास लावून पालिकेत सत्ता स्थापन केली. त्यामुळे आता पालिकेवर जोशुआ यांचे वर्चस्व दिसत आहे. नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर या सध्या भाजपच्या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत.

म्हापशात लोबो फॅक्टर ?

म्हापशात (Mapusa) मायकल लोबोंचा ‘फॅक्टर’ किती महत्त्वाचा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या म्हापसा हा मतदारसंघ लोबोंकरिता प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. म्हणूनच स्वतःच्या कळंगुटमध्ये जोसेफ सिक्वेरा याचे कडवे आव्हान असूनही लोबो म्हापशात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कांदोळकरांना निवडून आणणे हे लोबोंच्यादृष्टीने कसोटी ठरत आहे. पण भाजपनेते ही ‘हम किसीसे कम नही’ या वृत्तीने म्हापशात प्रचार करताना दिसताहेत. स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुध्दा म्हापशात लक्ष घातल्याचे दिसून येत आहे.

मिलिंद म्हाडगुत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT