Goa Assembly Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्याच्या मावळत्या विधानसभेत पक्षांतराचा विक्रम

40 पैकी 29 आमदारांनी दिली स्वपक्षाला सोडचिठ्ठी

दैनिक गोमन्तक

पणजी : पक्षांतर आणि पक्षद्रोह हा गोव्याच्या राजकारणाला जडलेला रोग आहे. सातव्या विधानसभेतही पक्षांतराचे स्तिमित करणारे मासले गोव्याने अनुभवले. निवडून आल्यानंतर आठवड्याभरातच पक्षाचा राजीनामा देणारे आणि नव्या पक्षात मंत्रीपद मिळवून मग पुन्हा निवडणुकीत विजय मिळवणारे विश्वजीत राणे यांचे पक्षांतर अद्वितीय व ऐतिहिसिक मानले जाते. तसेच विरोधी कॉंग्रेस पक्षातील तब्बल दहा आमदारांनी एकाच समवेत केलेला भाजपा प्रवेशही आश्चर्यकारक ठरला. (Goa Assembly News Updates)

2017 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे 17 आमदार निवडले गेले. या विधानसभेचे पहिले अधिवेशन 16 मार्च 2017 रोजी भरले आणि आमदारकीची शपथ घेताच विश्वजीत राणे (वाळपई) यांनी आमदारकीचा राजीनामा सभापतींकडे सुपूर्द केला. त्यानंतर कॉंग्रेसचे दयानंद सोपटे (मांद्रे) आणि सुभाष शिरोडकर (शिरोडा) यांनी 16 ऑक्टोबर 2018 रोजी आमदारकी आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. 10 जुलै, 2019 रोजी कॉंग्रेसचे (Congress) विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्यासह दहा आमदारांनी पक्ष सोडला आणि कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची सदस्यसंख्या 17 वरून 4 वर आली. विधानसभेचा कालावधी संपुष्टात येत असताना या चौघांपैकी लुईझिन फालेरो (नावेली) आणि आलेक्स रेजिनाल्ड (कुडतरी) यांनी अनुक्रमे सप्टेंबर 2021 व डिसेंबर 2021 मध्ये पक्षाचा राजीनामा दिला. परिणामी कॉंग्रेसचे दोनच आमदार राहिले. यातील प्रतापसिंग राणे यानी नव्याने निवडणूक लढवणार नसल्याने मावळत्या विधानसभेतले कॉंग्रेसचे एकटे दिगंबर कामत हेच या निवडणुकीत उतरले आहेत.

दहा आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप (BJP) सरकारला स्थैर्य मिळाले. तत्पूर्वी 2017 साली सरकार स्थापन करताना मनोहर पर्रीकर यानी मगो पक्ष (3 आमदार), गोवा फॉरवर्ड (3 आमदार) आणि रोहन खंवटे व गोविंद गावडे अशा दोन अपक्षांची मदत घेतली होती व मगोचा एक आमदार वगळता अन्य सात जणाना मंत्रीपद घेऊन सरकारला तात्पुरते स्थैर्यही मिळवून दिले होते. विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश करून पोटनिवडणूक जिंकल्यावर सरकारचे बहुमत 23 वर आले खरे; पण युतीच्या घटकांत अंतर्गत कलह सुरू झाला होता. गोवा फॉरवर्ड आणि मगोप तसेच अपक्ष रोहन खंवटे यांच्यामुळे नाकापेक्षा मोदी जड असल्याचा अनुभव पर्रीकरांच्या पश्चात मुख्यमंत्रपदाची माळ गळ्यात पडलेले डॉ. प्रमोद सावंत यांना येऊ लागला होता. मगो- गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांनी सरकारमधून बाहेर पडावे व कॉंग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करावे, अशी योजना होती. पण मुख्यमंत्रीपद आणि खातेवाटपावरून बोलणी फिसकटली आणि लगोलग भाजपालाही याची चाहुल लागली. नंतरची सुत्रे भाजपाच्या कोअर कमिटीचे दोन सदस्य आणि दिल्लीहून थेट अमित शहा यानी हाताळली व दहा आमदार कॉंग्रेसला सोडून भाजपात आले.

पक्षांतराला अटकाव करण्यासाठी किमान पक्षांतरेच्छुकांची संख्या एक तृतियांशावरून दोन तृतियांशावर आणण्याची घटनादुरुस्ती करण्यात आली. त्याचबरोबर नुसते आमदार फुटून चालणार नाही तर पक्षांतही उभी फूट पडायला हवी, अशी तजवीज करण्यात आली. तरीही या तटबंदीला वाकुल्या दाखवीत कॉंग्रेसचे दहा आमदार घाउकरित्या फुटलेच. आता या पक्षाने पक्षांतर रोखण्यासाठी उमेदवारांना देवांसमोर नेत शपथ घेण्यास लावली आणि त्यांच्याकडून आपण पक्षद्रोह करणार नसल्याची प्रतिज्ञापत्रेही लिहून घेतली आहेत. मात्र या दोन्ही प्रकाराना कायदेशीररित्या कोणतेही मुल्य नाही. अशा शपथपत्रांची कायदेशीर किंमत शुन्य असून न्यायालय त्याना ग्राह्य धरणार नाही, हे कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहीत आहे.

मावळत्या विधानसभेतील 40 पैकी तब्बल एकोणतीस आमदारांच्या नावावर विधानसभेच्या कार्यकाळांत पक्षांतर करण्याचा शिक्का बसला आहे, हाही एक विक्रमच आहे. केवळ 12 आमदार गेल्या पाच वर्षांत आपापल्या पक्षासबत शेवटपर्यंत राहिले आहेत. यात राजेश पाटणेकर (डिचोली) ग्लेन टिकलो सौझा (हळदोणा) जोशुआ डिसौझा (म्हापसा) प्रमोद सावंत (साखळी), पांडुरंग मडकईकर (कुंभारजुवे), मिलिंद नाईक (मुरगाव), मविन गुदिन्हो (दाबोळी) आणि निलेश काब्राल (कुडचडे) हे भाजपचे 8 आमदार कॉंग्रेसचे प्रतापसिंग राणे (पर्ये) आणि दिगंबर कामत (मडगाव), मगोपचे रामकृष्ण ढवळीकर (मडकई) व गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई (फातोर्डा) यांचा समावेश होतो. 2017 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले रोहन खंवटे आणि गोविंद गावडे यानी भाजपात प्रवेश केला आहे तर तिसरे अपक्ष प्रसाद गावकर यानी कॉंग्रेसमध्ये. तिघानाही त्यांच्या नव्या पक्षांनी निवडणुकीत उमेदवारी दिली आहे.

आठव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याचा मुहुर्त येईपर्यंत सर्वाधिक पक्षांतर कॉंग्रेसमधून झाले. 18 पैकी सोळा आमदार पक्षाने गमावले. ही टक्केवारी 89 टक्के इतकी भरते. मगोप आणि गोवा फॉरवर्डने (Goa Forward Party) प्रत्येकी 3 पैकी दोन आमदार (67 टक्के) तर भाजपने 28 पैकी 7 (25 टक्के) आमदार गेल्या पाच वर्षांत गमावले.

मावळत्या विधानसभेत दोन महिला आमदार होत्या, पैकी जेनिफर मॉन्सेरात यानी जुलै 2019 मध्ये कॉंग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केला तर दुसऱ्या आमदार एलिना साल्ढाणा यानी डिसेंबर 2021 मध्ये पक्षाचा राजीनामा देत आम आदमी पक्षात प्रवेश केला.

1970 : गोव्यातला पहिला पक्षद्रोह

गोव्यातला पहिला पक्षद्रोह झाला तो संघराज्य असण्याच्या काळात. त्यावेळी भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखालील म. गो. पक्ष सत्तेवर होता. ही घटना 1970 सालची. भाऊसाहेबांकडे पक्षाध्यक्षपदही होते. तत्पूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत फोंडा येथून लढण्यास इच्छुक असलेले कृष्णनाथ तथा के. बी नाईक यांना भाऊसाहेबांकडून शिरोडा येथून उभे राहण्यास सांगितले गेले. त्यांनी अर्थातच नकार दिला. नाईक यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पक्षाचे उपाध्यक्षपद दिले गेले. पण, हे पद शोभेचे होते आणि पक्षाचे सर्व निर्णय भाऊसाहेब स्वतःच्या मर्जीने घेत. दरम्यान शिरोड्यातून विजयी झालेले मगोपचे वि. सु. करमली यांच्या अपमृत्यूमुळे तेथे पोटनिवडणूक घेण्यात आली आणि त्यात के. बी. नाईक विजयी झाले. एक सक्षम आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत आपला प्रभावही पाडायला सुरवात केली. मात्र, बांदोडकराना त्यांच्या याही कामगिरीत आगावूपणा दिसला आणि त्यांनी नाईक यांना उद्देशून जाहीर टोमणे मारले. परिणामी नाईक सरकारवर कडवट टिका करू लागले आणि दोघांतले मतभेद वाढत गेले. आपल्या विरोधात पक्षांत कारवाई चालल्याचा बांदोडकरांचा संशय बळावला व प्रत्युत्तरादाखल त्यांनी पक्षाचे सरचिटणीस एम. एस. प्रभू यांना बडतर्फ केले. या बडतर्फीच्या विरोधात काही आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला तेव्हा बांदोडकरांनी त्यांना गांडुळाची उपमा दिली. परिणामी चिडलेल्या सात आमदारांनी 28 जून 1970 रोजी बांदोडकरांवर बारा आरोप करणारा खलिता मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. या सात आमदारांत उद्योगमंत्री अँथनी डिसोझा, शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर, उपसभापती मंजू गावकर, आमदार के. बी. नाईक, गजानन पाटील, जीवा गावकर व दत्ताराम चोपडेकर यांच्या सह्या होत्या. पक्षांत सरळ सरळ दोन गट पडले. मात्र, तोपर्यंत पक्षांतराची पाळी आली नव्हती. विरोधकांचे डावपेच बंदोडकरांना पक्षापासून विलग ठेवण्यासाठी खेळले जात होते. शेवटी बऱ्याच शह - काटशहांनंतर 28 जुलै 1970 रोजी आपण बांदोडकर सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे पत्र नायब राज्यपालांना सादर केले. आजची रातोरात सरकार कोसळवण्याची आणि घडवण्याची कार्यशैली पाहिल्यास महिनाभर असंतोष दाबून जाहीर आरोप - प्रत्योरापांत रमणाऱ्या आमदारांचे कौतुकच वाटते. अर्थांत या सातजणांच्या बंडाला भाऊसाहेबही पुरून उरले. त्यांनी विरोधात असलेल्या युनायटेड गोवन्स पक्षाच्या पाच आमदाराना फोडले आणि विश्वासदर्शक ठराव जिंकला.

1980 : गोव्यातले पहिले घाऊक पक्षांतर

गोव्यातले पहिले घाऊक पक्षांतर 1980 साली झाले. मगो पक्षाचा दारूण पराभव करून अर्स कॉंग्रेसचे 20 आमदार विधानसभेत पोहोचले होते. गोव्याने त्यावेळी देवराज अर्श यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला कौल दिला खरा, पण त्याचबरोबर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा कॉंग्रेसची सरशी झाली होती. अर्स कॉंग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला होता. संघप्रदेश असल्यामुळे केंद्र सरकारशी वाकडे घेऊन चालले नसते. त्यास्तव कॉंग्रेसचे सर्व 20 व अपक्ष म्हणून निवडून आलेले हरिष झांट्ये अशा २१ आमदारांनी इंदिरा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

आठव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याचा मुहुर्त येईपर्यंत सर्वाधिक पक्षांतर कॉंग्रेसमधून झाले. काँग्रेसने 18 पैकी सोळा आमदार पक्षाने गमावले. ही टक्केवारी 89 टक्के इतकी भरते. मगोप आणि गोवा फॉरवर्डने प्रत्येकी 3 पैकी दोन आमदार 67 टक्के तर भाजपने 28 पैकी 7 आमदार 25 टक्के गेल्या पाच वर्षांत गमावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT