Goa Assembly Election 2022

 
Dainik Gomantak
गोवा निवडणूक

‘खरी कुजबूज’ खरीच ठरली!

दैनिक गोमन्तक

Goa Assembly Election

लॅन्ड रोव्हर

थिवी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रचाराचे भाषण झाले. तिथे त्यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार नीळकंठ हर्ळणकर यांची तुलना तृणमूलचे किरण कांदोळकर यांच्याशी केली अर्थात नाव न घेता. कांदोळकरांनी अडीच कोटींची लॅन्ड रोव्हर घेतली आहे आणि हळर्णकर यांच्याकडे साधी स्विफ्ट आहे. लॅन्ड रोव्हर हर्ळणकरांना परवडू शकत नाही. स्वतःलाही ती गाडी परवडू शकत नाही असे सांगताना मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव उमटला. निवडणूक प्रचार सभांमध्ये अशा अनेक गंमतीजंमती घडत असतात. परंतु लोकही भाषणे गांभीर्याने घेत नाहीत. कारण पणजीच्या पोटनिवडणुकीत प्रमोद सावंत यांनी बाबूश मोन्सेरात यांच्यावरही बरीच टीका टिप्पणी केली होती. पणजीतील महिलांना सावधानतेचा इशारा त्यांनी दिला होता. परंतु त्यानंतर काय झाले? उद्या ही लॅन्ड रोव्हरही भाजपाचा ध्वज मिरवणार नाही, असे थोडेच आहे. ∙∙∙

चर्चा तृणमूलच्या (TMC) योजनेची

सध्या गोव्यावर वर्षाव होत आहे तो योजनांचा. प्रत्येक पक्ष आम्ही गोमंतकीयांसाठी काय देणार, हे मोठ्या जोशाने सांगत सुटला आहे. भाजपच्या (BJP) घोषणाबाजीनंतर ‘आप’नेही योजनांचा सपाटा सुरू केला. आता नव्याने गोव्यात आलेल्या तृणमूल (TMC) पक्षाने अवघ्या काही दिवसांत आम्ही गोमंतकीयांच्या सेवेसाठी उतरत असल्याचे चित्र उभे केले आहे. तृणमूलने नुकताच युवा शक्ती योजनेची घोषणा केली. या योजनेची राष्ट्रीय पातळीवरही चर्चा सुरू आहे. आश्चर्य म्हणजे, गोव्यात (Goa) या योजनेसाठी अवघ्या 36 तासांत 15,000 एवढी नोंदणी झाली आहे. तृणमूलचा हा कामाचा ‘सुपरफास्ट’ वेग पाहता इतर पक्षांना आश्चर्य वाटेलच. कारण तृणमूलची ही योजना केवळ गोव्यातून हाताळली असेल असे नाही त्यावर बंगाली रणनितीकारांचेही लक्ष आहे. ∙∙∙

काब्राल यांचे पीए पुराण!

वीजमंत्री नीलेश काब्राल यांची ते आमदार असल्यापासूनची सवय, अगदी एखादी फाईल जरी दुसरीकडे हलवायची असेल तर ते स्वतः हलवितात. त्यासाठी ते पीए वैगैरेंचा आधार घेत नाहीत. आता ते मंत्री झाले तरी त्यांची ही सवय बदललेली नाही. राजकीय नेत्यांची मिमिक्री करणारे मनोहर भिंगी यांनी त्यावर एक काब्रालच्याच आवाजात मल्लिनाथी केली आहे ती अशी. काब्राल म्हणतात, महादेव सुभाषचा पीए होता. कालांतराने तो आमदार झाला. मी स्वतः श्यामचा पीए होतो, मी पण श्यामला पाडून आमदार झालो. आता मी पीए ठेवला आणि त्यानेही तसेच केले तर? भिंगी यांच्या नव्या तियात्रात काब्राल यांची मिमिक्री सध्या तुफान गाजत आहे. ∙∙∙

‘खरी कुजबूज’ खरीच ठरली

‘गोमन्‍तक’मधील कुजबूज ‘खरीच’ असते याचा प्रत्यय परत एकदा आला. वाळपई व केपे धर्तीवर म्हार्दोळ येथे ‘आठ हजार लोकांची’ महासभा भरविण्यासाठी कसे नियोजन सुरू आहे याविषयीच्या व्हायरल ऑडिओची कुजबूज बऱ्याच आधी प्रसिद्ध झाली होती. प्रत्यक्षात रविवारी जी गोविंद गावडे यांची सभा झाली, त्यात उपस्थित जनसमुदाय पाहता ओडिओतील तपशीलात तथ्य असल्याचे दिसते. यावरून या महासभाचे आयोजन लाखोंची गुंतवणूक करून ‘देणारे, घेणारे व येणारे’ या तत्वावर केले जाते असे दिसते. योगायोगाने याच रविवारी बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री यांनीही अशीच मोठी महासभा सांग्यात घेतली. सामान्य वेळ असती तर या महासभेचे कौतुक व्हायलाच हरकत नव्हती. पण, कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकट गोव्यावर घोंगवते म्हणून मुख्यमंत्री लोकांना लग्नसोहळे वैगेरे यावर मर्यादा ठेवायचे आवाहन करीत आहेत. आता गोव्यात पुढील महिनाभर लग्ने होणार नाहीत तेव्हा मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना तरी आपल्या अति उत्साहावर नियंत्रण ठेवायचे आवाहन करतील काय, असे लोक विचारू लागले आहे. गोविदारावांनी तर आपण आणखी एक याहूनही मोठी ‘महासभा’ घेणार आहे, असे याच सभेत जाहीर करून टाकले आहे. मुख्यमंत्री साहेब जरा याकडे लक्ष द्या ना..! ∙∙∙

नुवेत लिंडन

नुवे मतदारसंघात काँग्रेसची (Congress) उमेदवारी कुणाला हे अजूनही कोडे ठरले आहे. आलेक्स सिक्वेरा यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार, असे सांगितले जात होते. मात्र, आता वेगळीच माहिती ऐकू येते. असे म्हणतात, वीजमंत्री नीलेश काब्राल यांचे ओएसडी लिंडन मोंतेरो यांना काँग्रेसची उमेदवारी देण्याचे ठरले आहे. त्यासाठी ते काँग्रेस पक्षात नसतानाही संभाव्य उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव घालण्यात आले आहे. लिंडन काँग्रेसचा उमेदवार असल्यास काब्राल कुठे असणार बरे! ∙∙∙

सावंत... अजब तुझे सरकार

सांगेत अजूनही अनेक अर्धवट विकासकामे आहेत, ती तर पूर्ण केली जात नाहीत. शिवाय पूर्ण झालेल्या विकासकामांचा उद्‍घाटन सोहळा होत नाही. शेवटी याचे कारण काय असेल तर विद्यमान आमदार हा विरोधातील होय. पूर्ण कामाचे उद्‍घाटन केले तर पाटीवर आमदार म्हणून प्रसाद गावकर यांचे नाव येणार. अर्धवट काम पुढे गेले तरीही आमदारांचे नाव येणार, त्यापेक्षा उद्‍घाटन नको आणि कामाला चालना नको म्हणून विकास ठप्प केला आहे. मात्र, निवडणूक जाहीर होण्यासाठी अवघे दिवस शिल्लक असताना आता नेत्रावळी पंचायतीने उद्‍घाटन करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. अजूनही शासकीय सोपस्कार पूर्ण झालेले नाहीत. पंचायत बांधण्यासाठी आमदारांनी पैसे आणि वेळ खर्च केला नाही. पण, निदान भाषणबाजी करून लोकांना मोहजालात ओढता येईल, असा समज असेल. सांगे हॉस्पिटल कामाला सुरवात झाली. पण, त्या कामाची पायाभरणी केली जात नाही. एक गोष्ट खरी, विकास करण्यासाठी कोणी स्‍वत:चे पैसे आणून विकास करीत नाही. तो जनतेचा पैसा असतो हे आता सोयीस्कररित्या विसरले वाटते. मतदार म्हणतात खुशाल पाटी लावून घ्या. पुढे काय करायचे ते मतदार ठरवून आहेच. ∙∙∙

आजगावकरांची पंचाईत

पेडण्यात भाजपने प्रवीण आर्लेकर यांना प्रवेश दिल्याने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा उमेदवारीचा पत्ता कट झाल्यातच जमा आहे त्यामुळे त्यांनी शासकीय कार्यक्रमाला उपस्थिती न लावता पर्यायी व्यवस्थेमध्येच व्यस्त आहे. मगो व तृणमूल काँग्रेसची युती असल्याने युती असल्याने त्यामध्ये संधी मिळण्याची शक्यता अंधूक आहे. मगोने कालच त्यांना धुडकावून लावले आहे. तरीही आजगावकर यांनी आमदार चर्चिल आलेमांव यांना बरोबर घेऊन सुदिन ढवळीकर यांच्या घरी पोहचले. ज्यांनी पक्षाबरोबर दगाबाजी केली त्यांना पुन्हा घेणे अशक्य आहे, असे ढवळीकर यांनी सुनावले त्यामुळे आजगावकर यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. तृणमूल काँग्रेसशी मगोची युती असल्याने ढवळीकर त्यांना तृणमूलमध्ये घेण्यासही मज्जाव केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजगावकर यांची स्थिती ना घर का ना घाट का अशी झाली आहे. ∙∙∙

बिचारी राखी!

सांगे मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर हे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार व त्यांनाच सांगे मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी देण्यात येणार हे निश्चित झाले आहे. यामुळे राखीचे पुढे काय अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. मोठा प्रदीर्घ प्रवास करून राखीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. सुरवातीला त्या युरी समर्थक होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून त्या पक्षाची उमेदवारीही मिळवली होती. परंतु शेवटच्या क्षणी माघार घेऊन त्यांनी त्यावेळी सुभाष फळदेसाई यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर शिवसेना व शेवटी त्या काँग्रेस पक्षात मोठ्या आशेने आल्या होत्या. अभिजितने आम आदमी पक्षात प्रवेश केला होता, तर प्रसाद गावकर तृणमूलच्या वाटेवर होते. त्यामुळे आपला मार्ग सुकर असून आपल्यालाच काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळेल या आशेवर राखीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता प्रसाद गावकर काँग्रेस पक्षात येत असल्यामुळे राखीचे पुढे काय अशी खमंग चर्चा सांगे मतदारसंघात सुरू आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT