Goa Assembly 2022
पक्ष सोडू की नको?
मायकल लोबो सध्या ‘टू बी ऑर नॉट टू बी’ या मनस्थितीत आहेत. जावे कॉंग्रेसमध्ये की भाजपामध्ये रहावे अशी त्यांची मनस्थिती बनली आहे. ज्या पद्धतीने जयेश साळगावकर यांनी भाजपात (BJP) प्रवेश घेतला तो त्यांना पसंद नाही. रोहन खंवटे यांनीही लोबोंना बगल देऊन सत्ताधारी पक्षात उडी टाकली तो घावही लोबो यांना वर्मी लागला आहे. कॉंग्रेस ज्या पद्धतीने शांत बसली आहे, त्याबद्दलही त्यांना उद्वेग आहे. मी कॉंग्रेसमध्ये जाण्याबाबत अजूनही साशंक आहे, असे ते सांगतात. कॉंग्रेसने मगोपला तृणमूलपर्यंत जाऊ दिले याचाही त्यांना वैताग आला आहे. हातातोंडाशी आलेला घास कॉंग्रेस गमावतो आहे, याबद्दल मायकल लोबो यांना शंका राहिलेली नाही. सुदिन ढवळीकर यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तर ते अजूनही मागे फिरू शकतात. परंतु दिगंबर कामत तसे करणार नाहीत आणि कॉंग्रेस पक्ष सत्तेवर येण्याची संधीही गमावेल, असे लोबो यांचे राजकीय विश्लेषण आहे. त्यामुळेच त्यांची स्थिती सध्या दोलायमान बनली आहे. ∙∙∙
असाही अार्मांद
पणजीचे समाजकार्यकर्ते - कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा नेटवरच ज्यांचा उपद्रव चालतो ते आर्मांद गोन्साल्वीस कालपर्यंत कॉंग्रेसचा (Congress) जप करीत होते. एवढे की, गिरीश चोडणकर यांना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे, असा घोशा त्यांनी लावला होता. गिरीशचे बोट पकडून ते कॉंग्रेसमध्ये आले. गिरीशने त्यांना काही समित्यांवरही घेतले. कॉंग्रेसची प्रचार मोहीम स्वतःकडे घेतल्याचा त्यांचा आव असायचा. परंतु गोवा फॉरवर्डबरोबर कॉंग्रेसची युती होऊ घातल्याचा त्यांना वास लागला आणि त्यांनी आपला मुक्काम हलवला. सकाळी कॉंग्रेसचा जयघोश करणारे आर्मांद गोन्साल्वीस संध्याकाळी तृणमूल कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. सध्या कॉंग्रेसमध्ये कोणती कोणती सोंगे बस्तान बसून आहेत. त्याचा हा एक पुरावा. कालपर्यंत कॉंग्रेसमध्ये बावटे नाचवणारे कितीतरीजण तृणमूलचा पर्याय मिळताच त्या पक्षात डेरेदाखल झाले आहेत. गिरीशरावांनाही आता असे लोक हुंगता आले पाहिजेत. खऱ्या राजकीय नेत्याचे तेच लक्षण असते. ∙∙∙
खंवटेंचे घोडे भाजपात न्हाले!
रोहन खंवटे भाजपमध्ये जाणार असल्याची ब्रेकिंग न्यूज एका स्थानिक मराठी वृत्तपत्राने टाकली आहे. वास्तविक रोहन खंवटे कुठे कुठे गेले आणि भाजपमध्ये त्यांनी मोर्चेबांधणी चालवली त्याची बित्तंमबातमी सर्वात आधी फोडली दै. ‘गोमन्तक’ने. खंवटे एका बाजूला कॉंग्रेसशी वाटाघाटी करीत होते. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या नेत्यांना गुपचूप भेटत होते. सुरवातीला ते मायकल लोबो यांच्यासमवेत दिल्लीला जाऊन आले. त्यानंतर फडणवीस पणजीच्या एका पंचतारांकीत हॉटेलात उतरले तेव्हा आलेक्स रेजिनाल्ड यांच्या मागे गूपचूप तिथे जाऊन आले. त्याचा सुगावा लागल्यानंतर ‘गोमन्तक’नेच ती बातमी फोडली तेव्हा राग येऊन रोहन खंवटे यांनी संपादकांचा उद्धार केला होता. मांजर डोळे झाकून दूध पिते तसल्यातला हा प्रकार होता. तत्त्वे आणि मूल्ये कशाशी खातात याचा मागमूस नसलेले हे नेते. त्यानंतर सतत भाजपशी चाललेल्या त्यांच्या वाटाघाटी गोमन्तकनेच उजेडात आणल्या आणि ते आता भाजपात निघाले आहेत. जिंकून येण्यासाठी मूल्ये पायदळी तुडवण्याचा हा प्रकार आहे आणि स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांची ही अवहेलना आहे. ∙∙∙
पक्षात चाललंय काय?
रत्नाकर लेले हे रा. स्व. संघाचे हे कट्टर कार्यकर्ते आहेत. गोव्यात जे काही चालले आहे, त्याबद्दल ते फारसे खूश नाहीत. त्यांचे पूत्रही उद्विग्न बनले आहेत. काल प्रणव रत्नाकर लेले यांनी केलेली मल्लिनाथी तशाच स्वरुपाची आहे. गुन्हेगाराविरुद्ध कारवाई झाली नाही तर गोव्यात सत्ताधारी पक्ष बलात्कारी जनता पक्ष म्हणून ओळखला जाईल, असे अत्यंत परखड मत त्यांनी व्यक्त केले. गोव्यात संघाचे अनेक कार्यकर्तेही चालू असलेल्या राजकीय घडामोडीबद्दल राग व्यक्त करीत आहेत. मनोहर पर्रीकर गेल्यानंतर गोव्यात संघाचेच नेते सरकार चालवतात, असे वातावरण निर्माण करण्यात येत असले तरी हे सरकार नितीमूल्यांपासून आणि चतुर्थीच्या राजकारणापासून दूर चालले आहे. या निष्कर्षावर हे लोक येऊ लागले आहेत. संघात सुभाष वेलिंगकर यांच्यासारखे नेते असताना प्रसंगी मंत्र्यांचे कान पकडायलाही कमी करत नसत. सध्या संघातही असा मुरब्बी नेता राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर याच आठवड्यात बी. एल. संतोष गोव्यात येत असून, मुख्यमंत्र्यांवर अनेकदा रोष व्यक्त करणारे हे गोव्याचे प्रमुख यावेळी काही निश्चित भूमिका घेतील, अशी अपेक्षा संघाचे बरेच कार्यकर्ते बाळगून आहेत. ∙∙∙
निवडणुकीआधी संक्रांत
गोव्यातील (Goa) सरकारी नोकरभरती प्रकरणात वाराणसी भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना खजिल व्हावे लागले. सांगण्यात येते त्यानुसार, गोव्यातील नोकरभरती एकतर रद्द करावी लागेल किंवा तिची चौकशी तरी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने पुढचे दोन दिवस भाजपाला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. पक्षाचे गोवा प्रमुख बी. एल. संतोष उद्या गोव्यात येत आहेत. त्यात साखळीमध्येही नोकऱ्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे नाव पुढे आले आहे. त्यात स्वतःची विश्वासार्हता सिद्ध करायची असल्यास भाजपाला पुढच्या दोन दिवसात काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक पूर्वीचे वाक्य आहे आहे, ‘मी खाणार नाही आणि खाऊ देणार नाही.’ ∙∙∙
कार्यकर्त्यांच्या नाकावर टिच्चून
रोहन खंवटे भाजपमध्ये येणार असल्याच्या बातमीनंतर पर्वरीतील भाजपा नेते महानंद अस्नोडकर तीव्र संतापले आहेत. पर्वरीतील बहुजन समाज खंवटे यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. असे त्यांनी जाहीर केले आहे. पर्रीकर मुख्यमंत्री असताना ते खंवटे यांना पाठिंबा देतात त्यांची कामे होतात, असा आरोप भाजपातील अस्नोडकर समर्थक करायचे. पर्रीकरांनंतर लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खंवटे यांना काही पाठिंबा दिला नाही. परंतु पर्रीकर मुख्यमंत्री बनल्यानंतर खंवटे मंत्री बनले. त्यानंतर प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आणि काही प्रमाणात पर्वरीतील भाजप कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला होता. आता खंवटे भाजपामध्ये प्रवेश करून आमदार बनणार आणि त्यांना दिल्लीने महत्त्वाचे मंत्रिपद देण्याचेही कबूल केले आहे. या विचाराने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. परंतु एक गोष्ट खरी आहे, खंवटेंची टक्कर घेणारा एकही भाजपा नेता पर्वरीमध्ये नाही. कॉंग्रेसकडे उमेदवार नाही आणि तृणमूल तसेच आप मते फोडणार असल्याने खंवटेंचा मार्ग अधिक सूकर झाला आहे. असे असले तरी स्थानिक संघटन नेते आणि पर्वरीतील कार्यकर्ते यांच्या नाकावर टिच्चून खंवटे भाजपामध्ये प्रवेश घेणार आहेत... ∙∙∙
मिलिंद नाईक यांचे ग्रह उलटले
मंत्री मिलिंद नाईक सध्या विलक्षण राजकीय संकटात सापडले आहेत. कॉंग्रेसने त्यांच्या विरोधात पोलिस तक्रार केल्यानंतर त्यांना आता उमेदवारीही मिळणे अवघड झाले आहे. याचा अर्थ असा नाही की, लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भाजपच्या मंत्र्यांना घरी बसावे लागते. यापूर्वी उत्तर प्रदेशात असाच एका मंत्र्यावर आरोप झाला. महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक बाई तर मंत्रालयात येऊन उभी राहिली होती. परंतु या मंडळींविरुद्ध पोलिस तक्रार झाली नव्हती. एक गोष्ट खरी आहे, मिलिंद नाईक कायद्याने अडचणीत येणार नाहीत. परंतु नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येऊन पडली आहे. दिल्लीचेही लक्ष असल्याने मिलिंद नाईक यांच्या भविष्यातील राजकीय समीकरणांचा सोक्षमोक्ष लागेल. ∙∙∙
गोंधळ तयाचे नाव!
‘बॉस इज ओलव्हेज राईट’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजनाची गरज लागते. मात्र, आपल्या प्रशासनिक अधिकाऱ्यांत योग्य समनव्यय नसल्यामुळे कामाचा गोंधळ उडतो व नाहक इतरांना त्रास सहन करावे लागतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे निवडणूक प्रशिक्षण व शालान्त मंडळाच्या परीक्षेचे पर्यवेक्षक म्हणून कामात असलेले शिक्षक. सध्या एका बाजूने दहावी व बारावीच्या प्रथम सत्र परीक्षेच्या कामात शिक्षक मग्न असून, त्याचवेळी अती महत्त्वाचे व अती आवश्यक म्हणून निवडणुकीच्या कामात शिक्षकांना नेमले आहे. आता दोन्ही कामे एकाचवेळी करणे शक्य नाहीत; मात्र शालान्त मंडळाचे काम न केल्यास मेमो मिळणार व निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास कारणे दाखवा नोटीस हातात पडणार. इकडे आड व तिकडे विहीर अशी स्थिती शिक्षकांची झाली आहे. त्यात आणखी कहर म्हणजे वर्तमानपत्रात बातमी छापून येते निवडणूक प्रशिक्षण स्थगित. मात्र, बिचारे शिक्षक नको ही फुकटची झंजट म्हणून दुसऱ्या शिक्षकाला बोर्डाचे काम देऊन मॅडम जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यास गेले. म्हणतात ना, ‘कुणाच्या म्हशी व कोण काढतो उठाबाशी’ अशातलाच हा प्रकार. ∙∙∙
बसवाल्यांची ‘कोंबाकोंबी’!
प्रवासी मिळविण्यासाठी बसवाल्यांची जीवघेणी स्पर्धा सर्वसामान्यांना चांगलीच ज्ञात असेलच. कोविडकाळात सर्वकाही ठप्प झाल्यावर ‘कदंब’च तारणहार ठरली. बहुतांश खासगी बसवाल्यांनी संसर्गाच्या धास्तीने कमाईवर पाणी सोडले. पण, कोविडचा जोर ओसरल्यावर पुन्हा प्रवाशांची कोंबाकोंबी सुरू झाली व प्रवासी मिळविण्याची जय्यत स्पर्धा सुरू झाली. कदंब, एसटीचे प्रवाशी कसे चोरता येईल, याच्या क्लृप्त्याही सुरू झाल्या. त्यात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची ‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तब्बल ४९ दिवसांपासून बंद असल्याने जणू प्रवाशांची जणू लयलूटच केली. वाहनक्षमता व कोरोना यांना बगल देत बक्कळ कमाई केली. प्रवासी मात्र काय करणार, एक सोडली, तर दुसरीसुद्धा असेच करणार म्हणून दुहेरीत कात्रीत सापडले आणि ‘आलिया भोगासी..’चा प्रत्यत घेताना ‘देवाकच काळजी’ म्हणण्यास चुकत नाहीत. ∙∙∙
क्रिकेट संघाला गरज समुपदेशकाची
खेळात ‘जर-तर’ला महत्त्व नसते, संधी वेळीच साधावी लागते. ‘जो जिता, वही सिकंदर...’ ही बाब गोव्याचे क्रिकेटपटू रांची येथे एकदिवसीय स्पर्धेत खेळताना विसरले आणि नामुष्की ओढविली. सलग दोन सामने त्यांनी हाराकिरी करून गमावले. बलाढ्य पंजाबवर सनसनाटी विजय नोंदविण्याची नामी संधी होती, पण त्यांनी सामना टाय केला. हे तिन्ही सामने जिंकले असते आणि अगोदर आसामविरुद्ध विजय यामुळे गोव्याच्या खाती 16 गुण जमा होऊन ते बाद फेरीसाठी पात्र ठरले असते. एकंदरीत कामगिरी पाहता, खेळाडू मानसिकदृष्ट्या कणखर आणि सक्षम नसल्याचे जाणवते. निर्णायक टप्प्यात त्यांनी कच खाल्ली. पुढील महिन्यात रणजी करंडक स्पर्धेत खेळायचे आहे, त्यापूर्वी गोवा क्रिकेट असोसिएशनला खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी समुपदेक पाचारण करावाच लागेल. ∙∙∙
काकाची करामत
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे जनसंपर्क अधिकारी असलेल्या एका अधिकाऱ्याच्या मेहुण्याला सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी मिळाल्याचे वृत्त सध्या सगळीकडे पसरले असताना सावर्डे मतदारसंघातील एका मंडळ पदाधिकाऱ्याच्या एकूण तीन नातलगांना पीडब्ल्यूडी मध्ये अभियंते म्हणून नोकरी मिळाल्याची माहिती उघड झाली आहे. याच पदाधिकाऱ्याचा पुतण्या जो आयटी महामंडळावर संचालक म्हणून आहे त्याच्या पत्नीला कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी मिळाली असून भावाच्या मुलालाही अभियंता म्हणून सिलेक्ट करून काले गावावर तर मेहेरनजर तर केली आहेच. त्याशिवाय बाळ्ळी येथे राहणाऱ्या एका नातेवाईकाची मूलगीही अभियंता म्हणून सिलेक्ट झाली आहे. हीच मुलगी हल्लीच घेतलेल्या बीडीओच्या परीक्षेतही पहिली आली आहे, असे म्हणतात या परीक्षा घेण्यासाठी जी यंत्रणा होती त्यात तिचा एक दूरचा काका सदस्य होता. आता काकांच्याच कारामतीने हे सगळे ‘घरच्या घरा, सवाय बारा’ झाले तर नाही ना? असा प्रश्न भाजपाचेच कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत. ∙∙∙
जोशुआ डिसोझांची लगबग
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा भलतेच कार्यप्रवण झालेले आहेत. गेली सुमारे अडीच-तीन वर्षे बऱ्याच प्रमाणात अतिशय ‘संथ’ असलेले हे आमदार आता गेल्या महिनाभरापासून जनमानसाशी बऱ्यापैकी समरस होत आहेत. त्याच अनुषंगाने विविध विकास प्रकल्प मार्गी लावून त्यांचे उद्घाटन सोहळे घाईगडबडीत उरकून घेण्याचा आटापिटाही चाललेला आहे. गेल्या काही दिवसांत म्हापशात अशा कित्येक विकासकामाचा शुभारंभ झालेला आहे. जनतेशी सुसंवाद साधण्याचे उपक्रमही आयोजित केले जात आहेत. आता ते आमदारमहाशय मतदारांनी केलेल्या फोन कॉलनाही लगेच प्रतिसाद देत आहेत. एवढे दिवस कासवाच्या गतीने चालत असलेले म्हापशातील नवीन बसस्थानकाचे कामही सध्या त्यांच्याच पुढाकाराने युद्धपातळीवर सुरू आहे. आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच त्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा विडा त्यांनी सध्या उचलला आहे, असेही ऐकिवात आहे. पण, इतके दिवस कोणतेही काम न करता अंतिम क्षणी घाईगडबडीत केल्या जाणाऱ्या बांधकामामुळे दर्जा खालावला तर जाणार नाही ना, अशी शंकाही सध्या म्हापसावासीय व्यक्त करीत आहेत. ∙∙∙
गोव्याची पावणी
मंगळवारी आर्लेम येथे आयोजित ‘आरजी’च्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद लाभला. अशा गर्दीचा निवडणुकीत किती लाभ मिळेल ते मतमोजणीनंतरच दिसून येईल. पण मुद्दा तो नाही. मनोजरावांनी आपल्या भाषणात जो गोव्याच्या पावणीचा मुद्दा मांडला त्यावर मडगाव फातोर्डात उलट-सुलट चर्चा चाललेली आढळली. बहुतेकांच्या मते सुरवातीची काही वर्षे सोडली तर सत्तेवर आलेल्या सरकारांनी गोव्याची गोंयकारांची पावणीच केली. आहे कुणाकडे त्याला उत्तर? ∙∙∙
सुधीर कांदोळकरांची नाचक्की?
म्हापसा शहरातील खोर्ली कोमुनिदादच्या निवडणुकीत अध्यक्षपदी विद्यमान आमदार ज्योशुआ डिसोझा यांचे समर्थक असलेले अवधूत स्वार यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार सुधीर कांदोळकर यांचा नऊ विरुद्ध पाच मतांनी पराभव झाल्याने, त्याचेच भांडवल सध्या जोशुआ समर्थक तसेच भाजप कार्यकर्ते करीत आहेत. त्या कोमुनिदाद संस्थेवर जोशुआ समर्थकांचा वरचस्मा असल्याचे माहीत असूनही कांदोळकर यांनी ती निवडणूक लढवण्याचा धोका का म्हणून पत्करावा, असा सवाल केला जात आहे. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ या उक्तीनुसार त्यांनी निवडणूक लढवलीच नसती तर चांगले झाले असते, असा सूर सध्या खुद्द कांदोळकर यांच्या समर्थकांत व्यक्त केला जात आहे. काही का असेना, त्या पराभवामुळेच कांदोळकर यांची नाचक्की केली जात असून, त्यांना नाउमेद करण्यासाठी त्यांच्या विरोधकांच्या हातांत चांगलेच कोलीत सापडले आहे. ∙∙∙
गणित नोकऱ्यांच्या राजकारणाचे
‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे’या कवितेचा अर्थ आपल्या मंत्र्यांनी व नोकरी इच्छुक तरुणांनी भलताच घेतला असे दिसते. नोकरी मिळविण्यासाठी नोकरी इच्छुक तरुणांनी म्हणे मंत्र्यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा आरोप होत आहे. सध्या राज्यात नोकरी स्कॅन्डल बरेच गाजत आहे. पण, याला जबाबदार जेवढे घेणारे जबाबदार आहेत तेवढेच देणारेही आहेत. जर आरोपात तथ्य असेल तर दोघेही देणारा व घेणारा या पापाचे धनी आहेत. मागणी तसा पुरवठा हे अर्थव्यस्थेचे साधे तत्व येथेही लागू होते. ज्यांना नोकरी मिळाली ते धन्य झाले ज्यांना मिळाली नाही ते आरोप करणारच. एक मात्र खरे, टाळी एका हाताने वाजत नाही या घोटाळ्याला आम जनता ही तेवढीच जबाबदार नाही का? ∙∙∙
15 लाख कुठे आहेत?
विदेशातील काळा पैसा देशात आणला जाईल आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा केले जातील, हे बहुचर्चित आश्वासन सात वर्षांपूर्वी बरेच गाजले होते. ‘त्या’ आश्वासनांच्या लालसेपोटी मतदारांनी देशात ‘परिवर्तन’ घडविले. मात्र, ते मृगजळच होते, हे बहुधा आजवर उमगले असेलच. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या काही कथित भामट्यांकडून ‘ओटीपी’ द्या, पैसे पुरेसे देतो’, अशा वल्गना पुन्हा सुरू. मतदारांनीही सहमती दर्शविताना मान डोलावली, पण दुसऱ्याच क्षणी टाळके भानावर आले. ‘ओटीपी’ दिल्यावर पैसे जमा कुठून करणार, उलट आपल्याच खात्यातील हक्काचे पैसे उकळतील? आजकाल कुणाचे खरे नाही, पैशांबाबत कधी ‘पानीपत’ होईल सांगता येत नाही. पैसे नाही मिळाले तरी चालतील, आपली फसगत झाली असे समजावे व परिवर्तनाची कास धरताना अनुभवातून शहाणाचा धडा घ्यावा म्हणजे झाले? ∙∙∙
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.