Discussion on 2022 Lobo and Khaunte regarding Goa elections Dainik Gomantak
गोवा निवडणूक

काटा कोणाकडे झुकणार? बार्देशात खंवटे विरुद्ध लोबो मुकाबला रंगणार

कॉंग्रेसचे पारडे सासष्टीपेक्षा बार्देशात जड

दैनिक गोमन्तक

साळगाव: नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे पारडे सासष्टीपेक्षा बार्देशात जड झाल्याचे दिसून येते सासष्टी व बार्देश हे गोव्यातील प्रमुख तालुके. सासष्टीत मडगाव, फातोर्डा, कुंकळ्ळी, वेळ्ळी, कुडतरी, नावेली, बाणावली व नुवे असे आठ मतदारसंघ येतात. हा तालुका कॉंग्रेसचा बालकिल्ला मानला जातो. (Discussion on 2022 Lobo and Khaunte regarding Goa elections)

मागच्या वेळी आठपैकी सहा मतदारसंघ कॉंग्रेसने जिंकले होते. फातोर्डा हा गोवा फॉरवर्डकडे (Goa Forward) गेला होता, तर बाणावली हा राष्ट्रवादीच्या चर्चिल आलेमावनी जिंकला होता. इतर सहाही मतदारसंघांवर कॉंग्रेसने वर्चस्व राखले होते. पण यावेळी परिस्थिती बदलली आहे. या सहा मतदारसंघांतील बहुतेक आमदारांनी एकतर पक्ष बदल केला आहे, अन्यथा अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. मडगावचे दिगंबर कामत हे एकमेव पूर्वीचे आमदार राहिले आहेत. त्यामुळेच यावेळी कॉंग्रेसला सासष्टी विशेष अनुकूल दिसत नाही. मडगावात दिगंबर कामत जिंकू शकतात. फातोर्ड्यात कॉंग्रेसचे युतीचे सहकारी गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई हे भाजपच्या दामू नाईकांविरुध्द अटीतटीची लढत देताना दिसताहेत. ‘काटा’ कोणाकडे झुकेल हे सांगणे कठीण असले तरी सरदेसाईंचे पारडे किचिंत जड वाटते. इतर सहा मतदारसंघांपैकी कुंकळ्ळीत कॉंग्रेसचे युरी आलेमाव बाजी मारू शकतात, असे संकेत मिळताहेत. मात्र, उरलेल्या पाच मतदारसंघांत कॉंग्रेस खिंडीत पकडल्यासारखी झाली आहे. नावेलीत ‘आप’च्या प्रतिमा कुतिन्हो व तृणमूलच्या चर्चिल आलेमाव कन्या वालंका यांच्यातील लढतीत कॉंग्रेसचे आवेर्तान फुर्तादो हे पीछाडीवर पडल्यासारखे वाटतात. बाणावलीत मुख्य लढत तृणमूलचे चर्चिल आलेमाव व ‘आप’चे वेंझी व्हिएगस यांच्यामध्ये असल्यामुळे कॉंग्रेसचे टोनी डायस शर्यतीत मागे पडल्यासारखे वाटतात. नुवेत कॉंग्रेसचे माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांची वट दिसत असली तरी त्यांचे वय त्यांच्या यशाच्या आड येऊ शकते. तिथे माजी आमदार विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान हेही जिंकू शकतात, असे संकेत मिळत आहेत. कुडतरीत तर कॉंग्रेसचेच माजी आमदार पण आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले आलेक्स रेजिनाल्ड हे कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार मोरेन रिबेलो यांना भारी पडत असल्याची माहिती मिळत आहे. वेळ्ळीत माजी मंत्री आणि आता राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले फिलीप नेरी यांची मुख्य लढत तृणमूलचे उमेदवार तथा माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांच्याशी होईल. तेथे कॉंग्रेसचे सावियो डिसिल्वा हे तिसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत.

सावियो यांना उमेदवारी दिल्यामुळे अनेक कॉग्रेसजन नाराज झाले होते. त्याचे फळ सावियोंना मिळू शकते. अशा रितीने सासष्टीत कॉंग्रेस झेंडा फडकवू शकेल, अशी स्थिती नाही. पण सासष्टीतले नुकसान कॉंग्रेस काही अंशी बार्देशात भरून काढू शकते. बार्देशात म्हापसा, शिवोली, थिवी, हळदोणा, कळंगुट, साळगाव व पर्वरी असे सात मतदारसंघ येतात. मागच्या वेळी कॉंग्रेसच्या पदरी थिवी हा एकमेव मतदारसंघ पडला होता. पण यावेळी मायकल लोबोंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे परिस्थिती कॉंग्रेसला अनुकूल झाली आहे.

हळदोण्यात परेरा मुख्य शर्यतीत

बार्देशात कॉंग्रेसच्या (Goa Congress) स्थितीत बरीच सुधारणा झाल्यासारखी वाटते. उदाहरण द्यायचे झाल्यास, हळदोणा मतदारसंघात सुरुवातीला नगण्य वाटणारे कॉंग्रेसचे ॲड. कार्लुस परेरा हे आता मुख्य शर्यतीत आले असून ते तृणमूलचे किरण कांदोळकर आणि भाजपचे ग्लेन टिकेलो यांच्याशी लढत देताना दिसताहेत. म्हापशात भाजपचे जोशुआ डिसोझा यांची कॉंग्रेसचे सुधीर कांदोळकर यांच्याशी अटीतटीची लढत होताना दिसत आहे.

खंवटे यांचे यश जवळपास निश्‍चित

शिवोलीत कॉंग्रेसच्या दिलायला लोबो या भाजपचे (Goa BJP) माजी मंत्री दयानंद मांंद्रेकर यांच्याशी संघर्ष करताहेत. पर्वरीत मात्र भाजपच्या रोहन खंवटे यांचे यश जवळपास निश्‍चित आहे. एकंदरीत कॉंग्रेसची बार्देशातील शक्ती वाढल्याचे संकेत मिळत आहेत. आता खरेच कॉंग्रेस सासष्टीचा गड गमावते, की बार्देशमध्ये झेंडा फडकवते, याचे उत्तर १० मार्चला मिळणार, हे निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT