फडणवीस साहेबांची सौदेबाजी
भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ताज्या दौऱ्यात राजकारणात सौदेबाजीला थारा देऊ नका असे जे आवाहन केले आहे त्यावर सर्व थरांतून संमिश्र टिप्पणी होऊ लागली आहे. मूळ भाजपवाले तर गोव्यात अशा सौदेबाजीला भाजपानेच चालना दिल्याचा ठपका ठेवत आहेत, तर पणजीत उत्पलच्या बाजूने उभे ठाकलेली मंडळी याच कारणावरून आपणाला मूळ संघटनेशी फारकत घ्यावी लागली असे विषादाने सांगत आहेत, फडणवीस साहेबांकडे आहे याला उत्तर?∙∙∙
दिगंबरबाबाची ‘लकी’ निवडणूक कचेरी
प्रत्येक माणसाला विचार करण्याची, स्वतःचे समाधान करून घेण्याची आपापली शैली असते. एखादा क्रिकेटपटू डाव्या हाताला लाल पट्टी बांधली, तर ती आपल्यासाठी ‘लकी’ असे मानतो. काही लोक ते राहतात ती घरे, फ्लॅट, एखाद्या मांजरीचे किंवा कुत्र्याचे पिल्लू लकी असे मानतात. मडगावचे कॉंग्रेस उमेदवार दिगंबरबाब अशाच प्रकारचे विचार मनात आणतात का? परवाच दिगंबरबाबांनी निवडणूक कचेरीचे उद्घाटन केले. ही कचेरी म्हणे त्यांना ‘लकी’ आहे असे त्यांचे समर्थक कार्यकर्ते सांगत सुटले आहेत. दैव सुयोगाने म्हणा, दिगंबरबाबांनी गत तीन निवडणुकांत येथेच कचेरी स्थापली होती व निवडूनही आले. त्यामुळे त्याचें समर्थक तसे म्हणत असतील. या वेळेस स्वाद हॉटेलखाली उघडलेली कचेरी दिगंबरबाबांना ‘लकी’ ठरते की नाही याकडे मडगावकरांचे लक्ष लागले आहे. (Goa Politics Latest News)
म्हापशात कचऱ्याबाबत राजकारण!
म्हापसा शहरातील कचरा रहिवाशांच्या दारोदारी जाऊन गोळा करण्यासंदर्भात पालिकेकडून वार्षिक शुल्क आकारले जाते, परंतु पालिकेचे कर्मचारी अथवा ते काम करण्यासाठी काही भागात ‘आउटसोर्सिंग’ करण्यात आलेल्या एजन्सीचे कर्मचारी प्रत्यक्षात दारोदारी जात नसल्याने शहरातील कित्येक ठिकाणी लोक नाइलाजाने रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकत असतात. लक्ष्मीनारायण मंदिर व सीम-खोर्ली येथील राष्ट्रोळी मंदिराच्या बाजूला तर दररोज कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो. हल्लीच कुचेली येथे केवळ नावापुरता कचरा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून प्रत्यक्षात तिथे कामच सुरू झाले नाही, असाही म्हापसावासीयांत बोलबाला आहे. मायकल लोबो हे सध्या कचरा व्यवस्थापन खात्याच्या मंत्रिदावर नसतानाही म्हापसा पालिका मंडळावर सध्या सत्तास्थानी असलेल्या भाजपच्या गटातील नगरसेवक निवडणुकीची संधी साधून याबाबतीत त्यांच्यावरच दोषारोप करीत असल्याने म्हापशातील कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या प्रश्नाला एक वेगळेच राजकीय वळण प्राप्त झाले आहे. भाजपपुरस्कृत नगरसेवकांच्या ‘कातडीबचाव’ मनोवृत्तीतून यासंदर्भात विरोधकांवर आरोप केले जात असल्याची चर्चा सध्या काँग्रेसवाल्यांमध्ये सुरू आहे.∙∙∙
मतदारही बनले ‘मिस्टर गोडबोले’!
निवडणुकीत (Election) उतरणारे उमेदवार मते मिळवण्याच्या उद्देशाने मतदारांशी नेहमीच विनम्रतेने वागत गोड-मधुर शब्दांत त्यांच्याशी स्नेहसंवाद साधत असतात. एकदा का ते निवडून आले की त्या उमेदवारांचा तोरा बघायलाच नको, ही गोष्ट निराळी! परंतु, या राजकीय वातावरणात टिकून राहण्यासाठी आता राजकारण्यांप्रमाणेच मतदारही भलतेच सावध तथा संधिसाधू झाले आहेत. नानाविध क्लृप्त्या लढवून आम जनताही बदललेल्या एकंदर राजकीय वातावरणाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. स्वत:च्या दारापर्यंत येणाऱ्या विविध राजकीय पक्षांतील उमेदवारांशी सौजन्याने व आदरपूर्वक वागून तसेच ‘मिस्टर गोडबोले’ होत निवडणुकीच्या माध्यमातून प्राप्त होणारे लाभ पदरात पाडून घेण्याचे कसब बहुतांश मतदारांनी सध्या अवगत केले आहे.
त्यांचे भांडण अभिजीतचा फायदा!
कधी नव्हे ते महत्त्व यंदा सांगे मतदारसंघाला आले आहे. पाईक देवाच्या भूमीत मतदारांचा पाईक कोण ठरणार? यावर पैजा लागत आहेत. प्रसादाला पुन्हा एकदा विजयाचा प्रसाद मिळणार का? निवडणूक हरल्यावर पाच वर्षे सांग्यात तळ ठोकून असलेले सुभाष जिंकणार का? सांग्यात ढोल बडविणाऱ्या बाबूच्या अर्धांग्नी सावित्री यांची मेहनत व पुंजी सार्थकी लागणार का? की या तिघांच्या भांडणाचा फायदा आम आदमी पक्षाचे तडफदार उमेदवार अभिजीत घेणार? यावर नेत्रावळीत चर्चा रंगत आहे.∙∙∙
शांत रवी...
फोंडा मतदारसंघात भाजप, काँग्रेस (Congress) आणि मगो पक्षातील चुरस वाढली आहे. यात भर म्हणून अपक्ष उमेदवारांनीही आपण स्पर्धेत असल्याचे दाखवून दिले आहे. या मतदारसंघातही मतांची विभागणी होणार आहे. यावेळेला भाजपतर्फे गेल्या वेळी निवडून आलेले रवी नाईक निवडणूक रिंगणात आहेत. इतर राजकीय पक्षांनी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. मात्र, रवी नाईक शांत आहेत. फोंडा मतदारसंघात आपण जो विकास केला तो कुणीही मान्य करील. आता फोंड्यासाठी काय हवे असे विचारले तर तिसऱ्या जिल्ह्यावर ते भर देतात. विशेष म्हणजे तिसऱ्या जिल्ह्याची संकल्पना इतर उमेदवारांकडे नसल्याने ही नवीन संकल्पना मतदारांना आकृष्ट करते काय, यावरच सर्व काही निर्भर आहे.∙∙∙
टोनींच्या मदतीला कर्नाटकचे आमदार!
काँग्रेसचे ताळगाव मतदारसंघाचे उमेदवार टोनी रॉड्रिग्ज यांनी एक नामी शक्कल लढवली आहे. कोणत्याही स्थितीत भाजपचे उमेदवाराचा पाडाव करून विजय मिळविण्यासाठी त्यांनी चक्क कर्नाटकातील आमदाराला मदतीला बोलावले आहे. कामराभाट परिसरात कन्नड भाषिक नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगून मते मिळविण्यासाठी त्यांनी कर्नाटकच्या आमदाराची मदत घेतली आहे. आता कन्नड भाषिक नागरिकांची मते मिळविण्यात ते किती यशस्वी होतात हे येणारा काळच ठरवणार आहे, परंतु कर्नाटकच्या आमदाराच्या मदतीची चर्चा मात्र आज कामराभाट, ताळगाव परिसरात रंगली होती. ∙∙∙
बाबूंची क्रीडा स्पर्धा
पेडणे तालुक्यातील धारगळ येथे भव्य दिव्य क्रीडानगरी साकारण्याचे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांचे स्वप्न होते, पण आता त्यांच्यासाठी पेडणे हा मतदारसंघ नाही. त्यामुळे भविष्यात ते या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करू शकणार नाहीत. तसेच गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेणारच असे ते प्रत्येकवेळी ठासून सांगत. यावेळी मडगाव मतदारसंघात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांना पराभूत केले तरच ते विधानसभेत पोचू शकतील. एकंदरीत बाबू यांच्यासाठी गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा क्रीडानगरीसारखेच एक स्वप्न ठरणार का?
निवडणुका आणि कार्यकर्त्यांची चैनबाजी
राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात आहे. हा प्रचार करण्यासाठी शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते दाखल झाले आहेत. या कार्यकर्त्यांच्या दिमतीला वेगवेगळ्या प्रकारचा फौजफाटा आहे. दिवसभर हे कार्यकर्ते प्रचारात मग्न असतात आणि संध्याकाळी श्रमपरिहारासाठी किनाऱ्यावरचे शॅक गाठतात. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार शॅकवाल्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे.∙∙∙
अखेर मॅडमच्या भेटी सुरू पण...
ताळगावच्या काही भागात जेनिफर मोन्सेरात यांनी गेल्या चार पाच वर्षांत भेटीच दिल्या नाहीत म्हणे... त्यामुळे येथील अनेक मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. आता निवडणुका जवळ आल्याने मॅडम आपल्या भागाचा दौरा करतील, असे वाटत होते. मात्र, मॅडमकडून काही भाग सुटलाच. भाटलेसारख्या छोट्या भागात काही हौशी मुलांनी खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी जेनिफर यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्यांना वेळ न मिळाल्याने त्या तेथे उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र, मुलांची समजूत कोण काढणार... मुले नाराज झाल्याने आता मोठ्यांमध्येही मॅडमबाबत नाराजीचा सूर उमटत आहे... मॅडमने मतदारसंघात घरोघरी भेटी सुरू केल्या. मात्र, त्यांना थोडा उशिरच झाला. ∙∙∙
युरी म्हणतो सगळ्यांची अनामत जप्त होणार!
अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो, असे म्हणतात. आत्मविश्वास जर अती झाला तर तो अहंकार बनतो आणि अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मात्र, हे काँग्रेसचे कुंकळ्ळीचे उमेदवार युरी आलेमाव यांना कोण सांगणार? युरी आलेमाव जिथे जातात तिथे आत्मविश्वासाने सांगतात, की कुंकळ्ळी मतदारसंघात तेच जिंकणार व इतर नऊ उमेदवारांची अनामतही जप्त होणार. आता मतदार युरीला विचारू लागले आहेत, युरीबाब जर आपल्याला एवढा आत्मविश्वास आहे, तर मग घरोघर फिरून मतांचा जोगवा का मागतात? युरीबाब स्वप्रशंसा व परनिंदा घातक असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.