पणजी: वाळपई हा मतदारसंघ 2007 पासून विश्वजीत राणेंचा बालेकिल्ला म्हणून म्हणून ओळखला जातो. 2007 साली अपक्ष. 2012 साली कॉंग्रेस 2017 साली प्रथम कॉंग्रेस व नंतर पोटनिवडणुकीत भाजप अशी विश्वजीत राणेंची वाटचाल आहे. आताही ते वाळपईतून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवित आहेत. मात्र,त्यांची विजयी घोडदौड रोखण्याच्या उद्देशाने आम आदमी पक्षातर्फे सत्यविजय नाईक,रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब तर कॉंग्रेसच्या मनिषा उसगावकर प्रयत्नशील आहेत. कॉंग्रेसच्या उसगावकर यांच्यापुढे अंतर्गत बंडचे आव्हान आहे. (AAP and RG against Vishwajeet Rane in Walpai for goa assembly election)
वाळपईमध्ये उसगाव, गांजे, गुळेली, नगरगाव, सावर्डे, व खोतोडे या ग्रामपंचायतीचा तसेच वाळपई नगरपालिकेचा समावेश आहे. वाळपईचा फेरफटका मारल्यास विश्वजीत राणेंचे महत्त्व अधोरेखित होते. वाळपई नगरपालिकेचे नगरसेवक तसेच पंचायतीचे पंच, सरपंच हे सध्या विश्वजीत राणेंच्या (Vishwajit Rane) प्रचारात सक्रियपणे फिरताना दिसताहेत. याबाबतीत उसगाव गांजे ग्रामपंचायतीचे पंच तथा माजी सरपंच, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुळशीदास प्रभू यांनी 2017 च्या निवडणुकीपेक्षा यावेळी राणेंना जास्त आघाडी मिळेल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी ही आघाडी 15000 हून अधिक असेल,असा दावा त्यांनी केला. 2017 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राणेंनी कॉंग्रेसच्या रॉय रवी नाईक यांच्यावर 10 हजार मतांनी मात केली होती. यावेळी ही आघाडी वाढवण्याचा प्रयत्न त्यांचे कार्यकर्ते करताना दिसताहेत.आपचे सत्यविजय नाईक, मगोप -तृणमूल युतीचे विश्वेष प्रभू, जय महाभारतचे सुदेश परब, अपक्ष रोहिदास गांवकर त्याचबरोबर कॉंग्रेसच्या मनिषा उसगांवकर, रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांचा विश्वजीत राणेंची घौडदौड अडवण्याच्या प्रयत्नात आहेत.
उसगाव गांजेच्या पंच असलेल्या मनिषा उसगावकर यांना उमेदवारी दिल्यामुळे कॉंग्रेसमध्ये अंतर्गत बंड झाले असून रणजीत राणे, विश्वेष प्रभू यासारखे कॉंग्रेसचे (Goa Congress) निष्ठावंत कार्यकर्ते खवळले आहेत. त्यामुळे मनिषा यांच्या प्रचारावर मर्यादा आल्यासारख्या झाल्या आहेत. मनिषा या उसगाव गांजे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 4 च्या पंच असल्या तरी त्यांचा इतर ग्रामपंचायतीशी वा नगरपालिकेशी विशेष संबंध असल्याचे दिसत नाही. आधीच विश्वजीत भाजप (Goa BJP) मध्ये गेल्यामुळे वाळपईतील कॉंग्रेस निष्प्रभ झाल्यासारखी झाली होती. त्यात आता अंतर्गत बंडाची भर पडली आहे.
शिवसेनेतर्फे देविदास गांवकर हे रिंगणात उतरले असून शिवसेनेची या मतदारसंघात विशेष ताकद नसल्यामुळे ते विशेष प्रभाव पाडतील,असे दिसत नाही. इतर उमेदवार कोणाची किती मते घेतात यावर राणे विरोधकांची मदार असेल. मगोप- तृणमूल युतीतर्फे उतरलेले विश्वेश प्रभू हे काय कमाल करतात हे बघावे लागेल. वाळपईत मगोपची बऱ्यापैकी मते असल्यामुळे त्याचा थोडाफार परिणाम निकालावर जाणवू शकेल. एकंदरीत राणेंना पाचव्यांदा विजयापासून रोखण्यात विरोधक यशस्वी ठरतात का, याचे उत्तर निकालातूनच मिळेल.
‘आप’चा सत्यविजय होणार का यशस्वी?
2012 साली जेव्हा उसगाव -गांजे ग्रामपंचायत प्रथमच फोंड्यातून वाळपईत नेण्यात आली, तेव्हा या पंचायतीतून सत्यविजय यांना राणेंवर ३ हजार मतांची आघाडी मिळाली होती. राणे भाजप मध्ये गेल्यानंतर सत्यविजय आपच्या ‘आडोशाला’ गेले. गेले कित्येक महिने ते आपतर्फे वाळपईत सक्रिय असून त्याचे ‘फळ’ त्यांना मिळते हे बघावे लागेल.
‘आरजी’चा एल्गार उतरणार का सत्यात?
रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब हे आपण विश्वजीत राणेंना आव्हान देण्याकरिता वाळपईत उतरलो आहोत, असे ते सांगत असले तर मग थिवीत उतरण्याचे कारण काय याचे स्पष्टीकरण देत नाहीत. राणेंविरूध्द ‘एल्गार’ पुकारला होता. आता हा ‘एल्गार’ प्रत्यक्षात किती उतरतो हे बघावे लागेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.