धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा ग्रामपंचायत क्षेत्रात येणारा नवे हा गाव रगाडो नदीच्या उजव्या काठावर वसलेला आहे. कर्नाटकातील सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये उगम पावणारी रगाडो ही नदी घनदाट जंगलातून वाहत तांबडीसुर्लाच्या परिसरातून पानशी, उधळशेहून नवेत प्रवेश करते. सत्तरीतील गुळेली गावात जीवनदायिनी म्हादई नदीशी एकरूप होऊन गोड्या पाण्याचा साठा उपलब्ध करून नदीतील क्षारता नियंत्रणात ठेवते.
खडकाळ डोंगरकपारीत वास्तव्य करणाऱ्या लोकमानसाला इथल्या नदी, झरे, सुपीक जमीन व इतर नैसर्गिक संपदेमुळे शेतीव्यवसाय रुजविण्यासाठी प्रेरणा मिळाली. कष्टाचे काम करीत सामूहिक जीवन व्यतीत करत असताना, ब्राह्मणीमाया, सातेरी व केळबाई अशा ग्रामदैवतांचा आशीर्वाद लाभल्याने शेती व्यवसायामध्ये भरभराट झाली.
पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या एकंदर वागण्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी येण्याजाण्यावर बरेच प्रतिबंध असायचे. नवेतील अब्राह्मण सुवासिनींना विलक्षण ओढ लागलेली असते ती म्हणजे धालो उत्सवात सहभागी होण्याची. चांद्रकालगणनेनुसार पौष महिन्यात गावातील मांडावर हा धालो उत्सव अतिशय आत्मीयतेने साजरा केला जातो.
दिवसभर कामात गुंफलेली कष्टकरी महिला चांदण्याच्या आल्हाददायक उजेड पडताच मांडावर हजर राहतात. मांडदेवतेला वनदेवतेचे स्वरूप बहाल करतात. दारातल्या तुळशीशी जीवनश्रद्धा असल्याने मांडावरील तुळशीसमोर गार्हाणे घालून धालोत्सवाला प्रारंभ होतो. गावातील महिलांसाठी धालो हा फक्त लोकगीतांचा संग्रह किंवा लोकनृत्य नसून तो त्यांच्यासाठी हर्ष द्विगुणित करणारा खेळ आहे. या उत्सवात धर्तरी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
सातेर, केळबाई, ब्राह्मणीदेवी, जल्मी, खुटी, खाप्रो देव, पाईक देव, गोपाळ देव, सती, वाघ्रोदेव (मोरयो देव) अशा दैवतांची नावे घेऊन त्यांना मांडावर बोलवले जाते. एका लहानशा भागात इतकी श्रद्धास्थाने व लोकसंचिताचा वारसा जपून ठेवलेला पाहून थक्क व्हायला होते. हैदवृक्षाच्या छायेत गोपाळ देव, प्रचंड देह असलेल्या आम्रवृक्षाच्या छायेत पाईक देव, काजऱ्याच्या छायेत खाप्रो देव, भेरली माडाच्या छायेत खुटी, तर पाणथळ जागेत खष्टवृक्षाच्या छायेत सतीच्या पाषाणाला स्थापित केलेले आहे. अशा तर्हेने निसर्गाच्या सांनिध्यातच या श्रद्धास्थानांची स्थापना केली आहे.
धालो मांडावर तुळशीसमोर सरळ ओळीत दोन गट करून जणू विचारांची देवाण घेवाण केली जाते. इथे कसलीही वाद्ये वाजवली जात नाहीत. एक संगतीत मागे पुढे सरकणारी पावले गाण्याला तालबद्ध करतात, तर हातातील बांगड्यांचा मंजुळ नादच गाण्यामधील माधुर्य खुलवतो. चांदण्यात खेळला जाणाऱ्या धालोउत्सवात, शेतीव्यवसाय करीत दैनंदिन जीवनात घडणारे प्रसंग प्रतिबिंबित होतात. हळद, आंबा, तुळस अशा झाडांशी जिव्हाळ्याचे अनुबंध असल्याने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत लोकगीते अतिशय आत्मीयतेने गायली जातात.
आंबा पिके रस गळे, समिंद्रा पडला वास,
आमी मारू घास गे, तुमच्या ताळ्याक मारु साल गे
अशा हास्य विनोदी गीतांचा समावेशसुद्धा या गीतांतून दिसून येतो. काही वेळाने रंभेच्या फुगडीला सुरुवात होते. रंभा ही शक्ती महिलेच्या शरीरात संक्रमित होऊन मांडावर अवतरते. धालोच्या मांडावर एक लाकडाचा खांब उभा केलेला असतो. पहाटेच्या वेळी या खांबाला नवरा मानून त्याला बाशिंग बांधून त्याच्याशी लग्न लावले जाते. त्यानंतर या महिलांद्वारे ‘रणमाले’ सादर केले जाते. सूर्योदय झाल्यावर तुळशीभोवती शेण सारवून तुळशीला पाणी घालून काही महिला पिंगळीसोबत घुमट व टाळ घेऊन, गाणी म्हणत घराघरांत फिरतात. एक महिला डोक्याला पांढरा फेटा बांधून हातात तांब्याचा कळस धारण करून, पिंगळी या पुरुषाची भूमिका करून ती गावाची भेट घेते.
आमी पिंगळी घाटाचे, तांदूळ खाता भाताचे,
आमी पिंगळी पर्याचे, तांदूळ घाला वर्याचे.
कधीकाळी इथला कष्टकरी समाज डोंगरकपारीत कुमेरी शेती करत असताना नाचणी, कुळीथ, पाकोड अशा धान्यांची लागवड करायचा. जेव्हा पोर्तुगिजांनी तिसवाडी तालुक्यातील हिंदू श्रद्धास्थानांची तोडफोड आरंभून धर्म समीक्षणाला सुरुवात केली तेव्हा दिवाड बेटावरील कष्टकरी समाजातील काही लोकसमूह धारबांदोड्यातील नवे या गावात स्थलांतरित झाले. अन्न धान्याची लागवड करत हा गाव स्वयंपूर्ण बनला होता, त्यामुळे दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी दुसऱ्या गावावर अवलंबून राहण्याची गरज अभावानेच भासायची.
शेतात कसल्याच रासायनिक घटकांचा वापर न करता पारंपरिक भाताची लागवड केली जात असे. कधी भातशेतीला कीटकबाधा झाली असे जाणवले तर इथले कष्टकरी, धाडसी लोक बिळारानाकडे वाटचाल करायचे. ही गुंफा, किंदळ, कारो, हैद, अशा वृक्षांच्या आच्छादनात वेढलेली असल्याने ही जागा बिळारान म्हणून नावारूपाला आली. या गुंफेत वटवाघुळांचा संचार असायचा. त्यांची विष्ठा गोळा करण्यासाठी काही जाणकार लोक लाकडाच्या साहाय्याने गुंफेत उतरून दिव्याच्या मदतीने चालत आत जायचे.
वाघळाची विष्ठा शेताला कीटकांपासून मुक्त करते व अन्नधान्याची वाढ चांगली होते अशी त्यांची धारणा होती. गावात निघालेला पिंगळी मांडावर पोहोचेपर्यंत दुपार होते. त्यानंतर आनंदाने शिगमो खेळला जातो. गावडी, घाडी, मालन, केळी, कुंभारीण, कोंबडी यांची नक्कल करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
मडक्या घेऊन आलेली कुंभारीण मांडावरच आग पेटवून त्या मडक्या भाजते व बाजूला असलेल्या लोकांना वाटते. मातीपासून नाना तर्हेची साधने बनविण्याचे कौशल्य ज्यांनी साध्य केले ते कुंभार. नवेतील पाईक देवाला अर्पण केलेले घोडे असोत किंवा गोपाळदेवासमोर वादन करीत असलेल्या छोटेखानी मातीच्या मूर्ती असोत, वादळ, वारा, पावसाचा मारा सहन करीत, झाडाच्या सावलीत या मूर्ती अजूनही कधीकाळी इथे वास्तव्य करत असलेल्या कुंभार समाजाचा परिचय करून देतात.
गावातील गोपाळदेवाबद्दल लोकांना विशेष आकर्षण आहे. जेथे कधीकाळी जंगलाची जाळपोळ करून नाचणी पेरली जायची त्या जागी जांभ्या दगडावर छोटेखानी असंख्य मातीच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये काही माणसे शहनाई, तर काही चर्मवाद्य वाजवताना दाखवलेले आहेत. देवाच्या नावाने आंबा, फणस, हैद अशी राखून ठेवलेली झाडे या परिसरात आहे. कधी कुमेरी शेती करत असताना भल्या पहाटे कुणाला बासरीचे सूर ऐकायला आले तर तो धन्य मानायचा.
त्यामुळेच लोकांनी त्याला कृष्णाच्या स्वरूपात पाहून गोपाळदेव असे नाव दिले असावे. कधी गोबार झरीच्या शीतल पाण्यात ते आंघोळीसाठी जायचे तर कधी वाद्यांचा गजर करीत नाचणीच्या शेतीमधून वाट काढत, डोंगर उतरून थेट खापऱ्यादेवाच्या जागेकडून पाईक देवाची भेट घेण्यासाठी निघायचे. धालोमधील विशेष पात्र म्हणजे सावज.
पूर्वी जंगलात वास्तव्य करणाऱ्या समाजात सावज मारण्याची प्रथा होती. ही एक सामूहिकरीत्या आयोजित केली जाणारी शिकारीची परंपरा. काही मुले काळी कांबळ पांघरून जंगली जनावारासारखे वेश धारण करतात व जनावराप्रमाणे हात पाय जमिनीवर ठेवून चालतात. तेव्हा त्याच्यावर मुसळाने प्रहार करीत असताना बाहेरून कुणीतरी बंदुकीच्या गोळीचा आवाज करून सावज मारल्याचे दृश्य दर्शविले जाते. कधीकाळी इथे आदिवासी जमातीचे वास्तव्य होते.
धालोत्सवात व इतर धार्मिक विधीतून सध्या इथे वास्तव्यास असलेल्या लोकांच्या पूर्वजांनी त्यांचे वर्चस्व नष्ट करून आपले बस्तान मांडले. तेथे असलेले खुटी हे दैवत आदिवासी जमातीच्या इतिहासाची प्रचिती आणून देते. पेडणे ते काणकोणपर्यंत गोवाभर जेथे जेथे धालोत्सव साजरा केला जातो त्या ठिकाणी धालो गीतात समान दुवे असल्याचे जरी दिसत असले तरी प्रत्येक ठिकाणी भौगोलिक, सामाजिक परिस्थितीनुसार या गाण्यातले वेगळेपण दिसून येते.
‘आषाढ महिना कार्तिक महिना, मालनी पूनवेन आनंद झाला’ हे गीत गोवाभर प्रामुख्याने गायले जाते परंतु त्यानंतर जी गीते गायली जातात त्यातून जुन्या काळचा सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहास दृष्टीस पडत असतो. साकोर्ड्यातील नवे हा गाव आजही वृक्षवेलींच्या सांनिध्यात आणि बारमाही वाहणाऱ्या रगाडो नदीच्या पाण्याने समृद्ध झालेला आहे आणि त्याचेच दर्शन इथल्या धालो गीतातून होत असते. नवेतील धालोत्सवात शेती बागायती आणि अन्य कष्टाची कामे करणाऱ्या महिला सहभागी होतात आणि आपल्या परिसरातल्या निसर्ग आणि पर्यावरणाच्या घटकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.