शिरोडा हा माझा गाव विविधतेने नटलेला आहे. चोहोबाजूंनी डोंगर कपारी काय वर्णावी शिरोडा गावची गाथा. श्री देव शिवनाथ, देव रवळनाथ, देवी महामाया, देव मंडलेश्वर देवी श्री कामाक्षी अशी अनेक मंदिरे. श्री कामाश्री देवीची महती काय वर्णावी. पोर्तुगिजांच्या राजवटीत श्री कामाक्षी देवी राय ह्या गावी स्थापन झाली होती. त्या वेळी बाटाबाटीच्या काळात देवी बारा वांगडी (सोबती) सोबत नदी ओलांडून शिराेडा गावी आली.
शिरोडा गाव श्री देव शिवनाथच्या अधिपत्याखाली होते. जागेसाठी परवानगी मागण्यासाठी देवी शिवनाथ देवाकडे गेली, तेव्हा देव शिवनाथाने श्री देव रवळनाथाकडे बोट दाखविले. देवी श्री रवळनाथाकडे गेली. देव रवळनाथाने सांगितले, की मी श्रीफळ फेकून मारणार, ज्या जागी ते पडेल, तेच तुझे स्थान असेल.
देवाने श्रीफळ फेकून मारले ज्या जागी ते स्थिरावले तेच ते आजच ‘थळ’ म्हणून ओळखतात. फळ मारून थळ जोडले, अशीही कामाश्री देवीची आख्यायिका. तिच्या प्रांगणातच माझा जन्म झाला. मी स्वतःला भाग्यवान समजते.
तिच्याच अंगाखांद्यावर खेळून मी लहानाची मोठी झाले. देवी कामाक्षी आईची महती काय वर्णावी. बाराही महिने तिच्या मंदिराच्या ठिकाणी उत्सव चालू असतात. दर महिन्याच्या अमावास्येला हजारोंच्या संख्येने भाविक मंदिरात हजेरी लावतात. नवसाला पावणारी देवी, अशी तिची महती सर्वदूर पसरली आहे.
दर्शन घेऊन मग प्रांगणात पाच प्रदक्षिणा घालून भक्त आपले नवस फेडीत असतात. मला अभिमान आहे की, मी शिरोड्याची आहे, म्हणून लग्न होऊन सासरी गेल्यावरही माहेरचा मोह लेकीला सुटत नाही. तसा तो मलाही सुटत नाही. श्री श्री रविशंकर गुरुदेवांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ मध्ये २०११ साली जोडली गेले.
आध्यात्मिक उन्नतीचा, मनःशांतीचा मार्ग आपल्याला यायोगे लाभू शकतो, ही जाणीव झाल्याने मी श्री श्री श्री रविशंकर यांच्या त्यांच्याच प्रेरणेने मी कविता लिहू लागले. माझे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले. अशोक बोरकरांच्या प्रेरणेने तयार झालेल्या मडगावच्या ‘काव्य मैफल’चाही भाग झाले. मी, श्री देवी कामाक्षीचा आणि श्री सरस्वतीचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळो, अशी मनोमन प्रार्थना करते.
शीला दिनेश काकोडकर, कवयित्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.