एकेकाळी घराघराच्या उंबरठ्याचे भूषण असणाऱ्या रांगोळीने आज आपले रूप पूर्णपणे बदललेले आहे. आज ती केवळ दरवाजाबाहेरची एक आकर्षक भौमितिक आकृती राहिलेली नाही. घरगुती उंबरठा सोडून तिने आज व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश केला आहे.
वेगवेगळ्या शुभप्रसंगी रांगोळी रेखाटण्यासाठी रांगोळी कलाकारांना आज अगत्याने निमंत्रण मिळत आहे. अलीकडच्या काही वर्षात गोव्यात रांगोळी कलेचे वर्गही स्थापन झाले आहेत. रांगोळी हे आर्थिक कमाईचे साधन ठरत असल्याने अनेकजण आज रांगोळी कलेचे औपचारिक शिक्षण घेताना दिसत आहेत.
गोव्याचे सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार भूमेश नाईक यांनी रांगोळी कलेच्या प्रचारासाठी आणि तिला व्यावसायिक रूप आणून देण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. रांगोळीमध्ये त्यांनी विविध प्रयोगही केले आहेत. ते सांगतात, 'गणेशोत्सवाच्या काळात रांगोळी कलाकारांना निमंत्रणे यायला सुरुवात होतात. दिवाळीपर्यंत त्यांना खूप मागणी असते.'
फक्त धार्मिक सणांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये नव्हे तर वाढदिवस, लग्न समारंभ, कॉर्पोरेट इव्हेंट्स अशाही प्रसंगी आज रांगोळी सजावटीचा महत्त्वाचा भाग बनत चालली आहे. गोव्यातील अनेक रांगोळी कलाकारांनी रांगोळी या कला प्रकारावर आज इतके प्रभुत्व मिळवले आहे की फक्त गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पुणे, मुंबई, रत्नागिरी, सावंतवाडी या शहरांमध्ये, कर्नाटकमधील कारवार, बेंगलोर आदी शहरांमध्ये तसेच तेलंगणातील हैदराबाद या शहरात देखील त्यांना रांगोळी घालण्यासाठी बोलावले जाते.
‘पोर्ट्रेट रांगोळी’ हा रांगोळी कलेतील सध्याचा नवीन ट्रेंड आहे. रांगोळीतील हे नाविन्य अनेकांना आगळे वेगळे वाटते. त्यामुळे पोर्ट्रेट माध्यमात कुशल असलेल्या रांगोळी कलाकारांना खूप मागणी असते. लग्न समारंभात वधूवरांचे पोर्ट्रेट रांगोळी या माध्यमात पाहणे लोकांना आवडते त्याचप्रमाणे लहान मुलांच्या वाढदिवसाला त्यांचीही पोट्रेट्स निमंत्रितांचे लक्ष वेधून घेत असतात.
परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींचा संगम रांगोळीत होत असल्याने या माध्यमाला आपोआपच स्वीकारले जात आहे. ३x३ फूट या आकारापासून ३०-४० फूट लांबीच्या भव्य आकाराची देखील रांगोळी असते. रांगोळी रेखाटनासाठी ५ हजारांपासून सुरुवात होऊन ५० हजारांपर्यंत रक्कम आकारण्यात येते. अर्थात रांगोळीचा दर रांगोळीच्या आकारानुसार ठरतो. भूमेश सांगतात की, काही रांगोळींसाठी त्यांनी एक लाख रुपये दर देखील आकारला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.