Rabindranath Tagore
७ मे हा महान बंगाली कवी, गीतकार रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस. भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत 'अमर सोनार बांग्ला' चे लेखक रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 1861 साली पश्चिम बंगालमधील जोरसांको, कोलकाता येथे झाला. रवींद्रनाथ टागोर यांना कबिगुरु आणि गुरुदेव या नावांनीही ओळखले जाते.
साहित्यनिर्मितीसोबत टागोरांनी सातत्याने शांततेचा प्रसार केला.त्यांनी शांततेचा अर्थ व्यापकपणे मांडला, आणि त्यासाठी जगभरात आपले विचार प्रसृत केले. टागोरांचे मत होते की, शांती केवळ युद्धाचा अभावाने नव्हे, तर प्रेम आणि ऐक्याच्या माध्यमातून प्रकट होते. त्यांच्या दृष्टिकोनानुसार, मानवतेच्या एकत्र येण्यानेच सशक्त आणि शाश्वत शांतीची निर्मिती होऊ शकते. त्यांच्या जयंतीनिमित्त्य आपण त्यांच्या या विषयासंदर्भातील विचारांना उजाळा देऊ.
रवींद्रनाथ टागोर यांचा ठाम विश्वास होता की, जोपर्यंत मोठ्या आणि सामर्थ्यशाली राष्ट्रांनी आपल्या तांत्रिक प्रगतीच्या व वर्चस्वाच्या जोरावर छोट्या राष्ट्रांवर नियंत्रण ठेवण्याची आणि त्यांच्यावर प्रभुत्व प्रस्थापित करण्याची लालसा सोडलेली नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने जागतिक शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही.
त्यांच्या मते, युद्ध हे विसाव्या शतकाच्या प्रारंभी विकसित झालेल्या आक्रमक पाश्चात्त्य भौतिकवादाचे अपरिहार्य परिणाम होते. या भौतिकवादाने विज्ञानाला आध्यात्मिकतेपासून दूर केले आणि त्यामुळे काही राष्ट्रांनी संपूर्ण जगाला विनाशाच्या खाईत ओढले.
टागोरांच्या मते, शांतता तेव्हाच शक्य आहे, जेव्हा सर्व विविध वंश आणि राष्ट्रे आपली स्वतंत्र ओळख आणि वैशिष्ट्ये जपण्यास मोकळे असतील. पण हे करत असताना सर्वजण प्रेमाच्या बंधनाने मानवतेच्या एका सामायिक मूळाशी जोडलेले असावेत. रवींद्रनाथ टागोर यांनी मांडलेले शांततेचे मूलभूत तत्त्वज्ञान लेनिन यांच्या विचारांशी जवळचे होते.
टागोरांचे संवेदनशील कवीमन ब्रिटिशांनी बोअर युद्धात (1899-1902) दाखवलेली दडपशाही व चीनमधील उठावात (1899-1901) पश्चिमेकडील धर्मप्रसारकांनी घेतलेला हस्तक्षेप पाहून व्यथित झाले होते. जगभरातील साम्राज्यवादी राष्ट्रांची ही घृणास्पद वृत्ती त्यांनी ‘भारती’, ‘बंगदर्शन’ आणि ‘साधना’ या नियतकालिकांमधील राजकीय निबंधांमधून जोरदारपणे मंडळी आणि त्याचा निषेध व्यक्त केला.
‘पूर्व आणि पाश्चिमात्य संस्कृती’ या मे 1901 मध्ये ‘बंगदर्शन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या निबंधात त्यांनी लिहिले:
“राष्ट्रहित जेव्हा इतक्या अतिरेकाने फुगते की त्यातून सर्व प्रकारचे नैतिकतेचे भानच हरपते. स्वार्थातून शत्रुत्व निर्माण होते. आज हे शत्रुत्व युरोपीय संस्कृतीच्या पटलावर काट्यांसारखे स्पष्ट दिसते. हेच लक्षण आहे की युरोपातील राष्ट्रे आता एकमेकांशी पृथ्वीच्या वाटणीसाठी भांडतील…”
‘विरोधाभासी तत्त्वे’ या सप्टेंबर 1901 मध्ये प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या निबंधात ते म्हणतात:
स्वार्थाच्या संघर्षामुळे माणूस आंधळा होतो. इंग्रजांनी आशियात कुठली संधी मिळवली की फ्रेंचांना वाटते की इंग्रज बळकट होत आहेत. एका राष्ट्राची वाढती ताकद इतर राष्ट्रांना नेहमीच अस्वस्थ करते. परिणामी, अंध विरोध, द्वेष, आणि सत्य दडपले जाणे हे अपरिहार्य ठरते.”
जगभरात एक श्रेष्ठ सर्जनशील कलावंत म्हणून प्रसिद्ध असले तरी टागोरांचे युद्ध आणि शांततेविषयक विचार सुरुवातीला केवळ भारतापुरतेच मर्यादित होते. परंतु नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेचे समर्थक आणि युद्धविरोधी विचारवंत म्हणून अधिक प्रसिद्ध झाले.
ऑगस्ट १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले. टागोरांसारख्या संवेदनशील व दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वाला हे भीषण संकट मानवजातीवर कोसळणार हे आधीच जाणवले होते. हे भय त्यांनी चार्ल्स अँड्रूज यांच्याशी व्यक्त केले होते. युद्ध सुरू होण्याच्या काही आठवडे आधीच त्यांनी "The Destroyer" (विनाशक) ही कविता लिहिली, ज्या माध्यमातून त्यांनी आपली चिंता व्यक्त केली होती.
युरोपमध्ये युद्धाची सुरुवात झाल्यानंतर निर्माण झालेल्या अस्वस्थतेत टागोरांनी एक कवितासंग्रह लिहिला, जो भारत आणि इंग्लंडमध्ये एकाचवेळी प्रकाशित झाला. या मालिकेतील पहिली कविता होती "द बोटमॅन" ), ज्याचा अर्थ त्यांनी आपल्या मित्राला पुढे स्पष्ट केला की, शांत अंगणात धुळीत बसून वाट पाहणारी स्त्री ही 'बेल्जियम'चे प्रतीक होती. त्यानंतर "द ट्रम्पेट", "द ओअर्समेन" या कविताही त्यांनी लिहिल्या
15 जुलै 1915, युद्धाच्या कठीण काळात, टागोरांनी अँड्र्यूजला लिहिलं:
“युरोपला कधी समजेल का की या युद्धाचा उगम तिच्या स्वतःच्या आदर्शांवरील वाढत्या अविश्वासात आहे – ज्याच्यामुळे ती महान झाली? तिने त्या दिव्य तेलाचा साठा संपवला आहे, जो तिच्या दिव्याला उजाळा देत होता. आता ती त्या तेलावरच अविश्वास ठेवते, जणू काही तो दिवा तेवत ठेवण्यासाठी आवश्यकच नव्हता.”
टागोरांनी युद्धाच्या दरम्यान जपानला भेट दिली, आणि त्याच अनुभवावर आधारित त्यांच्या 'नॅशनलिझम' (राष्ट्रवाद) या पुस्तकाचा पाया रचला.
त्यात त्यांनी लिहिलं:
“राष्ट्र म्हणजे एखाद्या समाजाचे राजकीय व आर्थिक संघटन – जे एका यांत्रिक उद्देशासाठी घडवले जाते... पण जेव्हा विज्ञान आणि संघटनेच्या परिपूर्णतेच्या साह्याने ही शक्ती वाढते आणि संपत्तीचे पीक घेते, तेव्हा ती आपल्या सीमा झपाट्याने ओलांडते. ती आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये संपत्तीच्या लालसेने, परस्पर स्पर्धेने आणि एकमेकांच्या शक्तीची भीती निर्माण करते. ही स्पर्धा थांबत नाही – संघटना वाढते, स्वार्थ सर्वोच्च बनतो. माणसाच्या लोभ आणि भीतीचा फायदा घेत ती संपूर्ण समाजावर राज्य करत जाते.”
टागोर यांचा ठाम विश्वास होता की, शांती म्हणजे केवळ युद्ध नसणे नव्हे. युद्ध हे पाश्चिमात्य आक्रमक भौतिकवादाचे आणि अध्यात्मापासून वेगळ्या पडलेल्या विज्ञानाचे अपरिहार्य परिणाम आहेत – ज्यामुळे जगाचा बहुतांश भाग “विध्वंसाच्या खालच्या खड्ड्यात लोटला जातो.”
राष्ट्रवादाची उपासना या सदरातून टागोरांनी हे स्पष्टपणे मांडले आणि 1916 साली जपानहून अमेरिकेला भेट देताना सुमारे व्याख्यानांमधून हे संदेश दिले:
“माझ्या मते, हे युद्ध म्हणजे अति भौतिकवादाचे फळ आहे – जिथे आदर्श हा समरसतेवर नव्हे, तर स्वार्थावर आधारित आहे. भांडवलदार मजुरांमध्ये मतभेद आहेत कारण भांडवलदार केवळ स्वतःसाठीच कार्य करतात – त्यामुळे शांतता तात्पुरतीच राहते. राष्ट्रांचाही स्वार्थ तसाच आहे.
टागोरांनी पर्याय म्हणून असा मार्ग सुचवला – स्वतंत्र वैयक्तिक उन्नती, स्वतःबद्दलचा आदर, सर्जनशीलता, प्रेम, सौंदर्य, निसर्गाशी सुसंवाद आणि आध्यात्मिक आकांक्षा यावर आधारित जीवनशैली. अमेरिकेतील शांततेप्रेमी आणि उदारमतवादी नागरिकांमध्ये या विचारांना मोठा प्रतिसाद मिळाला, जे आजही शांतिनिकेतनच्या संग्रहालयात असलेल्या त्यांच्या पत्रव्यवहारातून दिसते. मात्र मुख्य प्रवाहातील वृत्तपत्र वाचणाऱ्या सामान्य जनतेने याला एक काल्पनिक कवीचे स्वप्न समजून फेटाळले.
त्यांनी याबाबत युरोप व अमेरिका दौऱ्यात वारंवार भाष्य केले –
"प्रेमाव्यतिरिक्त कोणतेही साम्राज्यवाद चुकीचे आहे. प्रेम छोट्या राष्ट्रांना व विविध वंशांना एका टोपलीत ठेवलेल्या लाकडासारखे एकत्र आणते, पण ते एकरूप होत नाहीत; फक्त एकत्र ठेवलेले असतात, पण एकता नसते."
१९२०-२१ दरम्यानच्या दौऱ्यात टागोरांचे मन ‘आंतरराष्ट्रीय संस्थे’च्या संकल्पनेने झपाटले गेले होते, जी पुढे ‘विश्वभारती’ म्हणून उभी राहिली. त्यांच्या मते, पूर्व आणि पश्चिम एकत्र येऊन समान बंधुत्वात सामील होतील, तेव्हाच जगात शांती येईल. त्यांनी विश्वभारती ही संस्था असे ठिकाण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती जिथे जगभरातील श्रेष्ठ बुद्धीमतांच्या देवाणघेवाणीद्वारे निर्माणात्मक विचारांची देवाणघेवाण होईल.
युरोपनंतर ते अमेरिकेकडे वळले, कारण युरोप अजूनही राष्ट्रीय अहंकार आणि प्रांतीय सीमांत अडकलेला होता. त्यांनी लिहिले –
“आपण जगातील सर्व संस्कृतींच्या समन्वयासाठी एक विशाल मंच तयार केला पाहिजे, जिथे प्रत्येक संस्कृती दुसऱ्यांकडून घेईल आणि त्यांना काही देईल. ही तुलनात्मक अभ्यासातून होणारी समायोजन आणि बौद्धिक सहकार्याची प्रगती, हीच येणाऱ्या युगाची गुरुकिल्ली ठरेल.”
१९३०च्या दशकात फॅसिझम आणि नाझीवाद वाढत असताना टागोरांची लीग ऑफ नेशन्सवरील विश्वास हरपत गेला. विशेषतः मुसोलिनीने अबिसिनिया (इथिओपिया) वर आक्रमण केल्यावर, लीगने कोणतीच ठोस कारवाई केली नाही. १९३३ मध्ये जर्मनीतील हिटलरने अल्पसंख्यांक संरक्षण नियमांना नाकारून, यहुद्यांचे हक्क काढून घेतले. यानंतर जर्मनीने लीगमधून बाहेर पडले व इतर हुकूमशाही राष्ट्रांनीही त्याचा पाठपुरावा केला.
१९३१-१९३९ दरम्यान युरोप आणि आग्नेय आशियातील राजकीय स्थिती अस्थिर झाली. इटली, जर्मनी, स्पेन, आणि जपान यांचे साम्राज्यवादी आक्रमण वाढत गेले, आणि लीग ऑफ नेशन्स निष्प्रभ ठरली.
१९३५ मध्ये Henry Barbous आणि Romain Rolland यांच्या नेतृत्वाखाली पॅरिसमध्ये ‘वर्ल्ड पीस काँग्रेस कमिटी’ स्थापन झाली, आणि भारतात त्याचे एक केंद्र टागोर, गांधीजी आणि इतर नेत्यांच्या सहभागाने तयार झाले. तरीही युरोप आणि आग्नेय आशियात युद्धाची स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात टागोरांचे अंतःकरण पूर्णतः त्या हिंसक युगाच्या विरोधात उठले. त्यांनी लिहिले:
“सर्वत्र नागीण श्वास घेत आहेत, विषारी निःश्वास टाकत,
शांततेची मृदु भाषा केवळ खोचक विनोद वाटेल.
पण मी निघण्यापूर्वी
मानवघरांतील त्या योद्ध्यांना साद घालतो
जे राक्षसांविरुद्ध लढण्यास सिद्ध होत आहेत.”
१९३६ मध्ये ब्रुसेल्स येथे झालेल्या वर्ल्ड पीस काँग्रेसमध्ये टागोरांनी संदेश पाठवला:
“आपण शांती मिळवू शकत नाही, जोपर्यंत आपण तिची किंमत देत नाही – म्हणजे बलाढ्यांनी लोभ सोडायला हवा आणि दुर्बलांनी धैर्य शिकायला हवे.”
३० सप्टेंबर १९३८ रोजी ‘म्युनिक करार’ झाला. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आणि इटली या देशांनी चेकोस्लोव्हाकियाच्या उपस्थितीशिवाय तिच्या सुदेटेन प्रदेशाचा जर्मनीला ताबा दिला. टागोर हे पाहून फार व्यथित झाले आणि त्यांनी एक कविता लिहिली:
“मूक, नम्र आणि दुर्बल जीवांचे बलिदान
जे बलवानांच्या मेजवानीस अर्पण केले जाते,
मांस फाडणाऱ्या दातांनी चिरडले गेलेले,
मातेला रक्ताच्या चिखलाने माखले गेले.
या विध्वंसाच्या झंझावातातून
एके दिवशी महान शक्तीने युक्त शांतता प्रकट होईल,
आपण घाबरणार नाही,
हे दुःख झेलून शेवटी विजय आपलाच होईल.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.