वाळपई: शिरोली, केरी सत्तरी येथील मूर्तिकार रोहिदास बाबूसो शेटकर यांची ‘बाबल्याची शाळा’ अर्थात ‘बाबूसो’ या नावाने प्रसिद्ध असलेली गणेशमूर्ती चित्रशाळा लोकप्रिय आहे. चार पिढ्यांपासून पूर्वजांनी चिकण मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कला जोपासली आहे.
त्यांचे पणजोबा, आजोबा, वडील आणि आता आपण ही कला जपली आहे, अशी माहिती मूर्तिकार रोहिदास बाबूसो शेटकर यांनी दिली.
आज लोक उठावदार दिसतात म्हणून ‘पीओपी’ मूर्ती पूजेला लावतात, पण हे योग्य नाही. मातीच्याच मूर्तीचे पूजन केले पाहिजे, तेव्हाच गणेश बाप्पांची खरी पूजा केल्याचे समाधान मिळते, असे रोहिदास बाबूसो शेटकर म्हणाले.
यावर्षी आपण १८० मूर्ती बनविल्या आहेत. दरवर्षी गणेशमूर्तीची मागणी वाढत असते. पण जास्त मूर्ती करणे आता परवडत नाही. मूर्ती बनविण्यासाठी माती पायाने मळावी लागते. त्यासाठी कामगार मिळत नाहीत, मिळाले तर त्यांची मजुरी परवडत नाही. आमची शाळा १२० वर्षापूर्वीची आहे. तेव्हा पासून गणेशमूर्ती बनविल्या जातात. सरकारने अद्याप आम्हाला माती मळणी मशीनचा लाभ दिलेला नाही. वडील होते तेव्हा २२० ते २३० पर्यंत मूर्ती बनवित होते. आता कामगार मिळणे मुश्किल झाल्याने १८० पर्यंत मूर्ती तयार करतो.
आपण डिचोलीहून एक ट्रक माती आणतो आणि पहिला पाऊस सुरू झाला म्हणजे माती मळायला सुरुवात करतो. सरकारतर्फे सबसिडी भेटते पण सरकारने मला माती मळणे मशीन उपलब्ध करून द्यावे.
काही दिवसावर गणेश चतुर्थी सण येऊन ठेपला आहे.आता जास्त अशा गणेशमूर्तीचे रंगकाम पूर्ण झाले आहे. सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. तरीही लोक त्याच मूर्तीकडे आकर्षित होतात. पीओपीच्या मूर्तीमुळे माती पासून गणेशमूर्ती बनविणाऱ्या कितीतरी गणेश चित्रशाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशी स्थिती त्यांच्यावर कधीच येऊ नये यासाठी पूर्वजांनी घालून दिलेली परंपरा चालू ठेवावी. पर्यावरणाची हानी करणाऱ्या पीओपीच्या मूर्ती न घेता मातीच्याच गणेश मूर्ती पूजाव्यात.
मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तींची पूजा करण्याची प्रथा आपण कायम राखणे आवश्यक आहे, ही शिकवण माझ्या वडिलांनी दिली. आमच्या शाळेत फक्त चिकण मातीच्याच मूर्ती बनविल्या पाहिजेत, ती सुद्धा स्वतः बनवलेली. बाहेरची आणून विकू नये, अशी सक्त ताकीद त्यांनी कुटुंबाला दिली आहे. त्यांचीच आज्ञा पाळून मी माझ्या शाळेत चिकण मातीच्याच मूर्ती बनवितो. बाहेरच्या मूर्तीला घरात प्रवेश देत नाही. आजकाल बाजारात सुबक, सुंदर, हलक्या म्हणून विकल्या जाणाऱ्या ‘पीओपी’च्या गणेशमूर्तीला लोक जास्त प्रमाणात प्रोत्साहन देतात. या मूर्ती आकर्षक दिसल्या तरी आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी व पाण्यात विसर्जन केल्यामुळे पाण्यातल्या जीव जंतूंना हानिकारक आहेत, अशी प्रतिक्रिया रोहिदास बाबूसो शेटकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.