Janmashtami 2025 date and time: भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा होणारा गोकुळाष्टमी अर्थात कृष्णजन्माष्टमीचा पवित्र सण यंदा १६ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. याच दिवशी रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला, अशी धार्मिक मान्यता आहे. हा दिवस श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या प्रती भक्ती व्यक्त करण्याचा एक खास प्रसंग असतो. भक्तजन या दिवशी उपवास करतात आणि पूर्ण श्रद्धेने श्रीकृष्णाची पूजा करतात.
यावर्षी, अष्टमी तिथी १५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होईल आणि १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजून ३४ मिनिटांनी समाप्त होईल. जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजून ४ मिनिटांनी सुरू होऊन १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहील, म्हणजेच एकूण ४३ मिनिटांचा हा शुभकाळ असेल.
सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर, श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमेला गंगाजल आणि दुधाने अभिषेक केला जातो. त्यांना नवे वस्त्र घालून, फुले, फळे, मिठाई आणि विशेषतः लोण्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. मध्यरात्री १२ वाजता कृष्णजन्म झाल्यानंतर विशेष पूजा आणि आरती केली जाते. उपवास करणाऱ्या भक्तांनी दिवसभर धान्याचे सेवन टाळावे आणि उपवास सोडताना फळे किंवा शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
रोहिणी नक्षत्र १७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजून ३८ मिनिटांनी सुरू होऊन १८ ऑगस्ट रोजी ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत राबणार आहे. जन्माष्टमी हा केवळ श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्याचा सण नाही, तर जीवनात धर्म, नैतिकता आणि प्रेमाचे आदर्श जपण्याची प्रेरणा देतो. देशभर या दिवशी भजन-कीर्तन, रासलीला आणि श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित देखावे सादर केले जातात, ज्यामुळे या सणाची शोभा आणखी वाढते.
पौराणिक कथेनुसार, मथुरा नगरीचा राजा कंस अत्यंत क्रूर होता. देवकीचा आठवा मुलगा आपला वध करेल, अशी आकाशवाणी ऐकून भयभीत झालेल्या कंसाने देवकी आणि तिचे पती वासुदेव यांना कारागृहात डांबले. त्याने त्यांची पहिली सात अपत्ये जन्माला येताच मारून टाकली. पण, आठव्या पुत्राचा जन्म होणार असताना मध्यरात्री, कारागृहाची दारे आपोआप उघडली आणि वासुदेवांनी श्रीकृष्णाला सुरक्षितपणे गोकुळात नंद आणि यशोदा यांच्या घरी पोहोचवले. त्यानंतर श्रीकृष्णाने कंसाचा वध करून अधर्माचा नाश केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.