Jatrotsav Matav Med Shri Shantadurga Temple Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

माटव मेड! गोव्याच्या जत्रेतील असा विधी ज्याशिवाय व्यापारी दुकानही थाटत नाहीत

Goa Culture: गोव्यातील पारंपरिक जत्रांमध्ये आर्थिक व्यवहारांना पूरक ठरणारे अनेक धार्मिक विधी प्राचीन काळापासून आजही पाळले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा विधी म्हणजे ‘माटव मेड’ किंवा मुहूर्तमेढ.

Sameer Panditrao

अभिदीप देसाई

गोव्यातील पारंपरिक जत्रांमध्ये आर्थिक व्यवहारांना पूरक ठरणारे अनेक धार्मिक विधी प्राचीन काळापासून आजही पाळले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा विधी म्हणजे ‘माटव मेड’ किंवा मुहूर्तमेढ, जो श्रीशांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीच्या फातर्पे येथील जत्रेच्या सुरुवातीस केला जातो. फातर्प्याची जत्रा ही गोव्यातील सर्वांत मोठ्या जत्रांपैकी एक आहे. ती केवळ धार्मिकदृष्ट्याच महत्त्वाची नसून व्यापारी आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे.

‘माटव मेड’ विधी पौष शुद्ध प्रतिपदेला आकार उदेगी मंदिरासमोर पार पडतो. या विधीशिवाय जत्रेसाठी कोणतेही दुकान किंवा बाजार उभारले जात नाही. यामुळे ‘माटव मेड’ हा जत्रेच्या बाजार पेठेचा औपचारिक प्रारंभच मानला जातो. ‘माटव मेड’ विधीमध्ये श्रीशांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचे महाजन (नाईक देसाई) आणि पांझरकणी गावचे गावकर एकत्र येतात. आकार उदेंगी मंदिरासमोर आंब्याच्या लाकडाचा खांब उभारून मंडप तयार केला जातो.

मंडपात आंब्याच्या पानांचे तोरण लावून सजावट केली जाते. पुजारी आणि पांझरकणीचा गावकर यांच्याद्वारे आंब्याच्या खांबाची पूजा केली जाते. आकार उदेंगीची पूजा होते गार्‍हाणे घालून साखर, तूप आणि लाडू यांचा नैवेद्य आकार उदेंगी देवाला दाखवला जातो आणि हा प्रसाद व्यापारी, भक्त आणि उपस्थितांना वाटला जातो. यानंतर कुंकळ्ळी गावचे संस्थापक मूळ पुरुष असलेल्या श्रीसत्पुरुषाला ३२ पानांचा विडा दिला जातो. देवी शांतादुर्गेला नारळ अर्पण केला जातो आणि जत्रा सुखरूप पार पडावी व व्यापाऱ्यांना आर्थिक भरभराट लाभावी, अशी प्रार्थना केली जाते.

‘माटव मेड’ हा केवळ धार्मिक विधी नसून जत्रेतील व्यापारिवर्गासाठी शुभ संकेत मानला जातो. या विधीद्वारे व्यापाऱ्यांना आर्थिक भरभराट आणि सुरक्षित व्यापारासाठी देवीची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. गोव्यातील आणि बाहेरील व्यापाऱ्यांसाठी फातर्प्याची जत्रा म्हणजे मोठा आर्थिक केंद्रबिंदू आहे. हा विधी जत्रेतील बाजारपेठेची सुरुवात करण्याच्या परवानगीचे प्रतीक मानला जातो.

‘माटव मेड’ विधीने महाजन (नाईक देसाई) आणि पांझरकणीचे गावकर यांच्यातील परस्पर सांस्कृतिक आणि सामाजिक नाते अधोरेखित होते. या वर्षी हा विधी उमेश गावकर यांनी पार पाडला. आपल्या पूर्वजांकडून चालत आलेला हा विधी ते मागील १२ वर्षांपासून करत आहेत.

विशेष म्हणजे आकार ऊदेंगी मंदिरासमोर उभारलेला हा मंडप होळीपर्यंत तसाच राहतो. होळीच्या सणादरम्यान गडे उत्सव विधीमध्ये श्रीशांतादुर्गा फातर्पेकरीण देवीचे महाजन हा मंडप लुटतात. या परंपरेमुळे फातर्पा व कुंकळ्ळी या दोन शेजारील गावांमधील ऐतिहासिक आणि धार्मिक नाते दिसून येते!

फातर्प्याची जत्रा केवळ धार्मिक उत्सव नसून ती प्राचीन गोव्यातील व्यापारी आणि आर्थिक व्यवहारांची आठवण करून देते. ‘माटव मेड’हा विधी या व्यापाराला शुभ संकेत देत व्यापाऱ्यांचे आणि भाविकांचे धार्मिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करतो. ‘माटव मेड’ हा फक्त जत्रेच्या विधीचा भाग नसून, तो गोव्याच्या पारंपरिक बाजारपेठेतील व्यापारी महत्त्व अधोरेखित करणारा सोहळा आहे. जत्रेतील बाजारपेठा आजही पारंपरिक परंपरांशी नाते ठेवून आहेत. ज्यामुळे गोव्याच्या संस्कृतीचे आणि अर्थव्यवस्थेचे वैभव कायम राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: हत्तींकडून खानापुरात नासधूस सुरू

Mhadei River: 'म्हादई' प्रश्नी गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयात मागणार दाद! विधानसभा चिकित्सा समितीच्या बैठकीत निर्णय

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे सेपाक टाक्रो प्रेम!

दारूतून पाजले गुंगीचे औषध; गोव्यात सलून चालवणाऱ्या महाराष्ट्रातील 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Aguada: 'खराब हवामानात बोट खोल समुद्रात गेलीच कशी'? आग्वाद क्रूझ घटनेची गंभीर दखल; बंदर कप्तान खाते करणार कडक कारवाई

SCROLL FOR NEXT