Actors writers wend on Strike at Hollywood: जर तुम्ही हॉलिवूड चित्रपटांचे शौकीन असाल आणि अनेक चित्रपट, वेबसीरीज, शोंची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा थोडी लांबू शकते. कारण सध्या हॉलिवूड उद्योग अडचणीत आला आहे.
इंडस्ट्रीतील बड्या आणि प्रसिद्ध कलाकारांनी संपाची घोषणा केली असून लेखकांनंतर कलाकारांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यात अभिनेता सिलियन मर्फी, एमिली ब्लंट, फ्लोरेन्स पग आणि तीन वेळा ऑस्कर विजेती मेरील स्ट्रीप यांचाही समावेश आहे.
हॉलिवूड हे ठिकाण जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योगाचे केंद्र म्हणून विकसित झाले आहे. तथापि, गेल्या काही दिवसांमध्ये हॉलीवूड चर्चेत आले आहे तेथील कलाकारांनी पुकारलेल्या संपामुळे. हा चित्रपट उद्योग सध्या संकटात आहे.
संप कशासाठी?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा चॅट GPT मुळे नोकऱ्या धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. त्याचा सर्वाधिक फटका छायाचित्रकार, व्हिडिओ निर्माते आणि लेखकांना बसणार आहे. तिघेही मनोरंजन क्षेत्रातील आहेत. या भीतीतूनच हा संप सुरू झाला आहे.
लेखकांनी मागितली नोकरीच्या सुरक्षेची हमी
सर्वप्रथम, लेखकांनी त्यांच्या नोकरीची सुरक्षा आणि सुरक्षितता याबाबत विचारणा केली. कारण आता स्क्रिप्ट AI स्वतःच लिहील, असे बोलले जाऊ लागले होते. याशिवाय पगार, कमाईतील हिस्सा, नफा याबाबत अभिनेते, लेखक, दिग्दर्शक यांचे काही आक्षेप होते. आधी त्यांच्यासाठी मागणी करण्यात आली आणि नंतर सुनावणी न झाल्याने संपाचा झेंडा फडकावला गेला.
संपाची व्याप्ती आणि सहभागी कलाकार
हॉलिवूडच्या चित्रपटांप्रमाणेच या संपाची व्याप्तीही मोठी आहे. या संपाकडे विक्रमी म्हणून पाहिले जात आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, 63 वर्षांनंतर पहिल्यांदाच हॉलिवूडचे लेखक आणि अभिनेते एकाच वेळी संपावर गेले आहेत. सुमारे 160,000 कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारे स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड शुक्रवारी सामील झाले. मनोरंजन उद्योगात आधीच वाढत्या कामगार संघर्षामुळे बेरोजगार असलेल्या हजारो चित्रपट आणि टीव्ही कामगारांसाठी ही एक मोठी आपत्ती ठरत आहे.
रायटर्स गिल्ड 2 मे पासून संपावर आहे
तर, रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका 2 मे पासून संपावर आहे आणि तेव्हापासून अनेक प्रमुख टीव्ही कार्यक्रम बंद करावे लागले आहेत. जेन फोंडा, सुसान सरंडन, रॉब लोव आणि मार्क रफालो हे लोकप्रिय कलाकार यांनी आधीच यापुर्वीच लेखकांना पाठिंबा दिला आहे.
संप कोणा विरोधात?
हा संप प्रामुख्याने अलायन्स ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्सच्या विरोधात आहे. जे अनेक मोठ्या शॉट स्टुडिओ आणि उत्पादन कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते. संपात सहभागी झालेले लोक केवळ कामापासून दूर राहिले नाहीत, तर चित्रपट महोत्सव, प्रमोशन, स्क्रीनिंग आणि अवॉर्ड शो यांसारख्या कार्यक्रमांवरही त्यांनी बहिष्कार टाकला आहे.
युनिव्हर्सल स्टुडिओ, वॉर्नर ब्रदर्स, पॅरामाउंट स्टुडिओ, डिस्ने यांसारख्या प्रोडक्शन स्टुडिओविरोधात हा संप आहे. यासह, तो नेटफ्लिक्स, अॅमेझॉन इत्यादी स्ट्रीमिंग सेवांच्या विरोधातही आहे.
काय परिणाम होणार?
संप असाच सुरू राहिला तर त्याचा व्यापक परिणाम होऊ शकतो. कलाकार नसल्यामुळे मालिका आणि चित्रपटांचे शुटिंग कोलमडते. जुन्या स्क्रिप्टवर काम करायला लेखक नसले तरी चालू शकते पण कलाकार नसले की टाईमटेबल बिघडते.
संपकऱ्यांचे आक्षेप
मूळ वेतन वाढवावे. स्ट्रीमिंग सेवेतून मिळणाऱ्या कमाईत वाटा द्यावा. स्टुडिओने ही मागणी फेटाळून लावल्याचे रायटर्स युनियनने म्हटले आहे. स्वत: रेकॉर्ड केलेल्या ऑडिशन्ससाठी मानधन मिळावे, अशी मागणी कलाकारांकडून होत आहे.
एआय च्या वापरावर बंदी घालावी, अशी लेखकांची इच्छा आहे. प्रत्येक शोमध्ये किमान 06 लेखक ठेवावेत आणि किमान 13 आठवड्यांच्या कामाची खात्री असावी.
AI च्या मदतीने, मृत कलाकारांना पडद्यावर आणले जाईल किंवा कलाकारांना न घेता, त्यांच्या जुन्या कामगिरीच्या आधारे नवीन सामग्री तयार केली जाईल, अशीही चर्चा आहे.
कोणत्याही चित्रपटात पार्श्वभूमीत दिसणारी पात्रे अनेक असतात. पण आता स्टुडियो या पाठीमागे दिसणाऱ्यांना नियुक्त करू इच्छित नाही. तिथेही एआयची मदत घेण्याचा स्टुडियोंचा विचार आहे. याला अॅक्टर्स युनियनचा विरोध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.