Thunderbirds Jet Crash: अमेरिकेच्या वायुसेनेचे थंडरबर्ड्स डेमॉन्स्ट्रेशन स्क्वॉड्रनचे एक लढाऊ जेट दक्षिणी कॅलिफोर्नियाच्या वाळवंटी भागात कोसळले. बुधवारी (3 डिसेंबर) प्रशिक्षणाच्या वेळी हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेची माहिती देताना हवाई दलाने सांगितले की, अपघातादरम्यान पायलट विमानाबाहेर यशस्वीरित्या इजेक्ट होण्यात यशस्वी झाला, त्यामुळे तो सुरक्षित आहे. सैन बर्नार्डिनो काउंटी फायर डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, या अपघातात पायलटला किरकोळ दुखापती झाल्या असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नेवाडा येथील नेलिस एअर फोर्स बेसने जारी केलेल्या निवेदनानुसार, F-16C फायटिंग फाल्कन हे लढाऊ विमान बुधवारी सकाळी सुमारे 10:45 वाजता कॅलिफोर्नियाच्या नियंत्रित हवाई क्षेत्रात प्रशिक्षण मिशनवर असताना दुर्घटनाग्रस्त झाले. फायर डिपार्टमेंटने सांगितले की, लॉस एंजेलिसपासून सुमारे 290 किलोमीटर उत्तरेस असलेल्या मोजावे वाळवंटी प्रदेशातील ट्रोना क्षेत्राजवळ विमान अपघाताची (Accident) सूचना मिळाली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पायलट सुरक्षित इजेक्ट झाल्याने कोणतीही मोठी जीवितहानी टळली.
कॅलिफोर्नियाच्या वाळवंटी प्रदेशात झालेल्या या विमान अपघाताच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. अपघाताच्या परिस्थितीबद्दल पुढील सविस्तर माहिती 57व्या विंग पब्लिक अफेअर्स कार्यालयाकडून लवकरच जारी केली जाईल. विशेष म्हणजे, याच ट्रोना क्षेत्राजवळ 2022 मध्येही नौदलाचे एक एफ/ए-18ई सुपर हॉर्नेट जेट दुर्घटनाग्रस्त झाले होते, ज्यात पायलटचा मृत्यू झाला होता.
थंडरबर्ड्स स्क्वॉड्रन त्यांच्या हवाई प्रदर्शनातील फॉर्मेशन्स आणि अचूकतेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. या स्क्वॉड्रनचे पायलट प्रशिक्षण घेताना एकमेकांपासून काही इंचांच्या अंतरावर विमान उडवण्याचा सराव करतात. थंडरबर्ड्स टीमची स्थापना 1953 मध्ये झाली. ही टीम लास वेगासजवळच्या नेलिस एअर फोर्स बेसवरुन हंगामी अभ्यास करते. येथे F-16 फाल्कन, F-22 रॅप्टर आणि A-10 वॉर्थॉगसारखी विमाने तैनात आहेत. थंडरबर्ड्सच्या प्रदीर्घ इतिहासात यापूर्वीही डझनभर अपघात नोंदवले गेले आहेत.
अमेरिकेचे F-16 फायटर जेट यापूर्वीही अपघाताचे शिकार झाले आहे. याचवर्षी (2025) ऑगस्ट महिन्यात पोलंडमध्ये एका एअर शो रिहर्सलदरम्यान F-16 लढाऊ विमान कोसळले होते. त्या दुर्घटनेत दुर्दैवाने पायलटचा मृत्यू झाला होता. दरम्यान, कॅलिफोर्नियातील या अपघातात पायलट सुरक्षित वाचल्यामुळे अमेरिकेच्या वायुसेनेला दिलासा मिळाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.