Chinese Super Cow: चीनने दावा केला आहे की त्यांच्या शास्त्रज्ञांनी 'सुपर काउ'चे यशस्वी क्लोनिंग केले असून 3 बछड्यांना जन्म देण्यात यश आले आहे. सुपर गाय सामान्य गायींच्या तुलनेत खूप जास्त दूध देऊ शकते. सुपर गायीमुळे चीन दुग्ध उत्पादनात जगातील आघाडीचा देश बनू शकतो, असा दावा चीनी प्रसारामाध्यमांतून करण्यात आला आहे.
सुपर गायींचे क्लोनिंग यशस्वी झाल्यानंतर चीनच्या डेअरी उद्योगाला परदेशातून प्रगत जातीच्या गायी आयात करण्याची गरज भासणार नाही, असा दावा तेथील सरकारी प्रसारमाध्यमांतून करण्यात आला आहे.
चीनी शास्त्रज्ञांनी त्यांच्या सुपर गायीचे 3 क्लोन तयार केले आहेत. या गायी जास्त प्रमाणात दूध देऊ शकतात. नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फॉरेस्ट्री सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी 23 जानेवारी रोजी सुपर काउच्या तीन वासरांचे यशस्वी क्लोनिंग केले.
तिन्ही वासरांचे क्लोन हॉलस्टीन फ्रिजियन जातीच्या गायींपासून करण्यात आले होते. गायीची ही प्रजाती नेदरलँडमध्ये आढळते. होल्स्टीन फ्रिजियन जातीच्या गायी मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक मानल्या जातात.
या जातीची गाय वर्षभरात 18 टन किंवा आयुष्यात 100 टन दूध देण्यास सक्षम असते. यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरच्या मते, 2021 मध्ये यूएसएमध्ये एक गाय दररोज जेवढे दूध देईल त्यापेक्षा हा आकडा अंदाजे 1.7 पट आहे
क्लोन केलेल्या वासरांपैकी पहिले वासरू 30 डिसेंबर रोजी सीझेरियन पद्धतीने जन्माला आले होते, त्याचे वजन 56.7 किलो (120 पौंड) होते. शास्त्रज्ञांनी उच्च दूध देणाऱ्या गायींच्या कानाच्या पेशींमधून 120 क्लोन केलेले भ्रूण तयार केले आणि त्यांना सरोगेट गायींच्या गर्भाशयात ठेवले.
चीनचे सरकारी माध्यम ग्लोबल टाईम्सने या प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ जिन यापिंग यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'सुपर काउज'चे यशस्वी क्लोनिंग हे एक मोठे काम आहे. दूध उत्पादनाच्या क्षेत्रात चीनचा जगातील आघाडीच्या देशांमध्ये समावेश करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे.
या प्रकल्पाच्या यशामुळे चीनला गाईंच्या अतिशय चांगल्या जातीचे जतन करता येईल, जे आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरेल.
चीनमध्ये सध्या 10,000 गायींपैकी केवळ 5 गायी त्यांच्या आयुष्यात 100 टन दूध देण्यास सक्षम असतात. म्हणूनच चीनमधील 70 टक्के दुधाळ गायी विदेशातून आयात केल्या जातात.
जिन यापिंग म्हणाले की, 'चीनच्या परदेशी गायींवर अवलंबून राहण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी आम्ही 1,000 हून अधिक सुपर गायींच्या प्रजननावर भर देत आहोत. यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील. दरम्यान, चीनने अलिकडच्या वर्षांत प्राण्यांच्या क्लोनिंगमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे.
गेल्या वर्षी, चीनमधील प्राणी क्लोनिंग कंपनीने जगातील पहिला क्लोन केलेला आर्क्टिक लांडगा तयार केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.