Madina Bus Fire Incident: सौदी अरेबियातील मदिनाजवळ उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसने डिझेल टँकरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृतांमध्ये बहुतांश यात्रेकरू तेलंगणा राज्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाच्या (CMO) माहितीनुसार, अपघातावेळी ही बस मक्का येथून मदिनाकडे प्रवास करत होती. मृत पावलेल्यांमध्ये हैदराबादमधील अनेक रहिवासी असल्याची शक्यता आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तातडीने दिल्लीतील अधिकाऱ्यांना सतर्क केले असून, रियाधमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत.
तेलंगणाचे मुख्य सचिव रामकृष्ण राव यांनी हैदराबादमधील निवासी आयुक्त गौरव उप्पल यांना तत्काळ अपघातात राज्याच्या किती लोकांचा समावेश आहे, याची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सचिवालयात नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे.
हैदराबादचे खासदार असदद्दुदीन ओवैसी यांनी या अपघातावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रियाधमधील भारतीय दूतावासातील उप-मिशन प्रमुख अबू मतेन जॉर्ज यांच्याशी चर्चा केली.
ओवैसी म्हणाले "मी केंद्र सरकारला, विशेषत: परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना विनंती करतो की मृतदेह परत भारतात आणण्याची व्यवस्था करावी आणि जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करावी." ओवैसी यांनी दोन हैदराबाद-आधारित ट्रॅव्हल एजंट्सशी संपर्क साधून प्रवाशांचे तपशील दूतावास आणि परराष्ट्र सचिवांना दिले आहेत.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही या अपघातात भारतीय नागरिकांच्या झालेल्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पीडित कुटुंबांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. एक्सवर पोस्ट करत जयशंकर म्हणाले, "सौदी अरेबियातील मदिना येथे भारतीय नागरिकांचा अपघात झाल्याने खूप दुःख झाले आहे.
रियाधमधील आमचा दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास या अपघातामुळे बाधित झालेल्या भारतीय नागरिकांना आणि कुटुंबांना पूर्ण सहकार्य करत आहेत." दुःख असलेल्या कुटुंबांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केली तर जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना देखील केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.