अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच एका खळबळजनक अहवालाने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. पाकिस्तानने अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत इराणच्या लष्करी विमानांना आपल्या एअरबेसवर आश्रय दिल्याचे समोर आले आहे. या अहवालामुळे पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला धोका दिल्याची चर्चा रंगली आहे.
अमेरिकन अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या सुरुवातीला जेव्हा अमेरिका आणि इराण दरम्यान युद्धविरामाची चर्चा सुरू होती, त्याच काळात इराणने आपली अनेक महत्त्वाची विमाने पाकिस्तानच्या रावलपिंडी येथील 'नूर खान एअरबेस'वर हलवली होती.
यामध्ये प्रामुख्याने 'RC-130' या विमानांचा समावेश आहे, जी गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी आणि पाळत ठेवण्यासाठी वापरली जातात. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी इराणने ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर, इराणने आपली काही नागरी विमाने अफगाणिस्तानातही सुरक्षिततेसाठी पाठवली आहेत.
हे वृत्त समोर आल्यानंतर पाकिस्तानने तातडीने हे दावे फेटाळून लावले आहेत. "नूर खान एअरबेस हे शहराच्या मध्यभागी आहे, तिथे इतकी मोठी विमाने लपवून ठेवणे अशक्य आहे," असा युक्तिवाद पाकिस्तानी अधिकार्यांनी केला आहे.
दुसरीकडे, तालिबाननेही अफगाणिस्तानात इराणी विमानांच्या अस्तित्वाचा इन्कार केला आहे. मात्र, अमेरिकन सिनेटर्सनी या अहवालाची गंभीर दखल घेतली असून, जर हे सत्य आढळले तर पाकिस्तानसोबतच्या संबंधांचा पुनर्विचार करण्याचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्येच अमेरिका आणि इराण दरम्यान समोरासमोर शांतता चर्चा झाली होती, जी पूर्णपणे अपयशी ठरली. इराणने युद्धातील नुकसानीची भरपाई आणि 'होर्मुज'मधील नाकेबंदी संपवण्याची मागणी केली होती.
मात्र, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा हा प्रस्ताव 'अस्वीकार्य' असल्याचे म्हणत फेटाळून लावला आहे. पाकिस्तान एकीकडे मध्यस्थीचा आव आणत असताना दुसरीकडे इराणला मदत करत असल्याने ट्रम्प प्रशासन संतापले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.