Pakistan Blasphemy Violence Christian Families Flee: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून एक अत्यंत संतापजनक आणि मानवी मनाला सुन्न करणारी घटना समोर आली. एका ख्रिश्चन व्यक्तीवर ईशनिंदेचा खोटा आरोप केल्यानंतर उन्मत्त मुस्लिम जमावाने त्याचे घर आणि औषधाचे दुकान पेटवून दिले. या हिंसेनंतर निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणामुळे 35 ख्रिश्चन कुटुंबांनी आपले हक्काचे घर सोडून जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पलायन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पंजाबमधील घडियाल कलां गावात घडली असून, येथे कामरान मसीह नावाचा 40 वर्षीय ख्रिश्चन नागरिक एक छोटीशी फार्मसी (दुकान) चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
स्थानिक मुस्लिम नागरिकांनी कामरान मसीह यांच्यावर एका व्हॉट्सॲप ग्रुपवर ईशनिंदेचा आशय असलेला व्हिडिओ शेअर केल्याचा गंभीर आरोप केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी एका दिवसापूर्वीच कामरान मसीह यांना अटक केली होती. 'क्रिश्चियन डेली इंटरनॅशनल-मॉर्निंग स्टार न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, मसीह यांच्या अटकेची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच त्यांच्या कुटुंबावर आणि गावातील इतर ख्रिश्चन कुटुंबांवर हल्ल्याची भीती निर्माण झाली. मसीह यांच्या घरासमोर आणि दुकानाजवळ जमलेल्या शेकडो मुस्लिम नागरिकांनी जोरदार निदर्शने केली आणि काही वेळातच त्यांच्या दुकानाला व घराला आग लावून दोन्ही इमारती जळून खाक केल्या.
या घटनेनंतर मानवाधिकार संघटनांनी आणि कायदेशीर तज्ज्ञांनी पाकिस्तानच्या (Pakistan) अत्यंत कठोर ईशनिंदा कायद्यांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. तज्ज्ञांच्या मते, या कायद्याचा वापर बऱ्याचदा वैयक्तिक वाद किंवा जुन्या वादांचा बदला घेण्यासाठी केला जातो.
'व्हाइस ऑफ पाकिस्तान माइनॉरिटी' या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील ईशनिंदा कायदा हा तिथला अत्यंत वादग्रस्त आणि संवेदनशील विषय बनला आहे. सरकारी यंत्रणा आणि कायदे लागू करणाऱ्या संस्था या कायद्याचा होणारा गैरवापर रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत, ज्यामुळे अल्पसंख्याक समुदायाचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. न्यायव्यवस्था निर्दोष नागरिकांना अशा खोट्या आरोपांपासून संरक्षण देण्यात अपयशी ठरल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे.
यापूर्वी डाउन सिंड्रोमने ग्रस्त असलेली एक अल्पवयीन ख्रिश्चन मुलगी रिमशा मसीह हिच्यावरही असाच खोटा आरोप लावला गेला होता, जो नंतर पुराव्यांअंती खोटा असल्याचे सिद्ध झाले होते. मानवाधिकार संघटनांनी पाकिस्तान सरकारकडे ईशनिंदा प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्याची, खोटे आरोप करणाऱ्यांना कठोर कायदेशीर शिक्षा देण्याची आणि धार्मिक अल्पसंख्याकांचे जीवन सुरक्षित करण्याची जोरदार मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.